#WeCareForPune : समस्या सोडविण्यासाठी वारजे-कर्वेनगरवासी झाले सज्ज

waraje
waraje

पुणे  : गेल्या बावीस वर्षांपासून रखडलेले वारज्यातील अग्निशामन केंद्र, काकडे सिटी ते जिजाई गार्डन येथील रद्द झालेला उड्डाण पूल, नागरिकांच्या जिव्हाळ्याची भाजी मंडई, आंबेडकर चौकात होणारी वाहतूक कोंडी, वारजे उड्डाण पुलाजवळ लागलेल्या सहा सीटर रिक्षांमुळे होणारी कोंडी, असे वारजे भागातील विविध प्रश्‍न सजग नागरिकांनी पोटतिडकीने मांडले. 

निमित्त होते "सकाळ संवाद' आयोजित बैठकीचे. विभागनिहाय प्रतिबिंब पुरवणी सुरू झाल्यानंतर अनेक नागरिक स्थानिक समस्या, विधायक उपक्रम प्रसिद्धीसाठी पाठवीत असतात. वाचकांचा कानोसा जाणून घेण्यासाठी सकाळ संवाद उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील प्रश्‍न जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. या वेळी नागरिकांनी विविध प्रश्‍न उपस्थित करून सूचना ही केल्या. ही बैठक आंबेडकर चौकातील बी स्क्वेअर हॉल येथे पार पडली. 

वारजे परिसराचा विस्तार होत असताना या भागातल्या पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्याने दैनंदिन जगण्यात अनेक अडचणी असल्याच्या भावना सर्वांच्याच मनोगतातून व्यक्‍त झाल्या. कर्वेनगर चौकातील उड्डाण पूल झाल्यानंतर सुद्धा गर्दी कमी झालेली नाही. कारण त्या पुढे होणारा उड्डाण पुलच रद्द करण्यात आला. त्यामुळे हा प्रश्‍न कायम आहे. रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. पदपथावर अतिक्रमणे, सेवा रस्त्यांचे प्रश्‍न, पोलिस चौकीजवळ वर्षांनुवर्ष धूळ खात पडलेली असंख्य वाहने, स्वच्छतागृहांचा अभाव, शाळेची वाहने रस्त्यात उभी राहत असल्याने होणारी वाहतूक कोंडी, सुसज्ज दवाखान्याचा अभाव, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे, अतुलनगर येथील कचऱ्याचा प्रश्‍न, खराडी ते शिवणे रस्ता अर्धवट अशा विविध प्रश्‍नांचा पाढाच नागरिकांनी या वेळी वाचून दाखवला आणि "सकाळ'च्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून आमचे जगणे सुसह्य करावे अशी विनंती केली. या वेळी विजया देव, विनायक लांबे, गणेश गोकुळे, विजय साळुंखे, ज्ञानेश्‍वर हांडे, दत्तात्रय जाधव, दत्तात्रय बनसोडे, वासुदेव भोसले, प्रताप क्षीरसागर, नितीन पाटील, अमीर शेख, सुधाकर मोडक, चंद्रशेखर देशपांडे, सागर फाटक, हमीद शेख, अनंत पायगुडे, जयंत मोरे, सचीन अंभोरे, महादेव गायकवाड, गोपाळ राठोड, अमर बराटे, अमित सोंडकर, आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी विलास बिर्ला, शिवाजी घाडगे यांचे सहकार्य लाभले. 

''वारजे ते गणपती माथा या रस्त्यावर पदपथ असून देखील त्याचा उपयोग नाही. त्यामुळे नागरिकांनी चालायचे कुठून? अनेक बेवारस गाड्याही रस्त्यावर लागत असतात. याच गाड्यांमध्ये कोणी जर बॉंब ठेवला तर याला जबाबदार कोण? अशा शहराला स्मार्ट सिटी म्हणायचे का?''
- संजय वाल्हेकर, तपोधाम परिसर 

''डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकूण सहा रस्ते येऊन मिळतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. येथे होणारा उड्डाण पूल रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कर्वेनगर चौकात उड्डाण पूल होऊनही उपयोग झाला नाही.''
- के. डी. पवार, ब्रह्मचैतन्य सोसायटी 
 

''सत्तावीस वर्षांपूर्वी अतिक्रमण विभागाने एन.डी.ए. रस्त्यावरील इमारतीवर कारवाई केली होती. ती कारवाई अर्धवट अवस्थेत झाली होती. त्यामुळे ती कधी पडेल हे सांगता येत नाही. या परिसरात सार्वजनिक स्वच्छता गृहांची सुविधा नाही.''
- बाबा खान, वारजे जकात नाका 
 

''महापालिकेने आंबेडकर चौकातील उड्डाण पूल कोणासाठी रद्द केला हे सांगितले पाहिजे. येथील सिग्नल बंद आहेत. रस्त्यावर भाजीवाले बसत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.''
- निवृत्ती येनपुरे, तेजोवलय सोसायटी 
 

''हा भाग महापालिकेत जाऊन अनेक वर्षे झाली. तरीही येथे अग्निशामन केंद्र नाही. उड्डाण पूल निर्माण होत आहे. परंतु त्याचे नियोजन व्यवस्थित नाही.''
- अमीर शेख, वारजे माळवाडी 
 

''पोलिसांचा धाक नसल्याने अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने आपली वाहने चालवतात. त्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागते. तसेच येथे अद्यापही भाजी मंडई नाही. वारजे भागात नाट्य संस्कृतीला बळ मिळण्यासाठी दोनशे ते अडीचशे लोकांसाठी छोटे नाट्यगृह असावे.'' 
- वि. दा. पिंगळे, मेघवर्षा सोसायटी 
 

महामार्गावरील सेवा रस्ते ताबडतोब केले पाहिजे. तसेच येथील राडारोडा ही उचलला गेला पाहिजे. 
- नवनाथ गुंडाळ, विघ्नहर्ता सोसायटी 
 

''तिरुपतीनगर ते डुक्कर खिंड महामार्ग डीपी रस्त्याचे काम त्वरित होणे गरजेचे आहे. शाळेच्या बसेस आमच्या सोसायटीच्या जागेवर बेकायदेशीर उभ्या असतात. झाडांचा पालापाचोळा सफाई कर्मचाऱ्यांनी झाडणे गरजेचे आहे.''
- माधुरी तळेले, गिरीश सोसायटी 
 

''गिरीश सोसायटीच्या मोकळ्या जागेवर अनधिकृत शाळा आहे. महापालिकेने त्याचा वापर थांबवला पाहिजे.''
- उदय हर्षे, गिरीश सोसायटी 
 

''नागरिक पाण्याचा अपव्यय करतात. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केल्यास त्यांना धमकी दिली जाते. हायवे सर्व्हिस रस्त्यावर पदपथांवर वाहने लावली जातात. त्यामुळे चालता येत नाही.'' 
- राजेश नाना काटे पाटील, अतुलनगर 
 

''कर्वेनगर चौकात वाहतूक कोंडीमुळे येथील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना त्रास होतो. पोलिसांना पत्र दिले तर फक्त दोन दिवस वाहतूक सुरळीत होते. पुन्हा तशीच परिस्थिती असते.'' 
- मच्छिंद्र नरके, कर्वेनगर 

''सिमेंटच्या रस्त्यांमुळे तापमानात वाढ होते. जमिनीत पाणी मुरत नाही. मग हा आग्रह कशासाठी? महापालिकेच्या चांगल्या कामांना शहिदांची नावे द्यावीत. कोणाच्याही नातेवाइकांची नकोत ''
- डॉ. राजेंद्र खेडेकर, अतुल नगर 
 

''वारजे पुलाखाली मजुरांची गर्दी होत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्याची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. आंबेडकर चौकातील सर्कल थोडे मागे घेतल्यास तेथील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते.'' 
- सचिन बराटे, वारजे गाव 

''चैतन्य नगरी टेकडी परिसरात जाताना महिलांना सुरक्षित वाटत नाही. टवाळखोर, गुंड मवाली येथे असतात. अनेकदा छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.'' 
- प्रवरा कुलकर्णी, अभिनेत्री, चैतन्य सोसायटी 
 

''कमिन्स कॉलेज रस्त्यावर रात्रीच्या वेळी मद्यपी असतात. त्यामुळे तेथून जाता असुरक्षित वाटते.''
- दिनकर चौधरी, कर्वेनगर 
 

''राजाराम पूल येथील डीपी रस्ता अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. तसेच कर्वेनगर शैक्षणिक संस्थेतील जवळील रस्ता रुंद होणे गरजेचे आहे.''
- प्रवीण दुधाणे, कर्वेनगर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com