मॅरेज काऊन्सिलिंग : काळाची गरज

ॲड. पृथ्वीराज नारायण कदम
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

आज इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकवरूनही विवाह जमवला जात आहे. तसेच मॅरेज ब्युरोमार्फत ऑनलाईन स्थळे सुचवण्याचा जमाना आहे; परंतु त्याचे फायदे-तोटे आहेत. सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून, पती-पत्नीतील किरकोळ मतभेदांमुळेदेखील जोडपी न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेताना दिसतात. या पार्श्‍वभूमीवर मॅरेज काऊन्सिलिंग समाजाची गरज बनली आहे.
 

खरंतर भारतीय विवाह संस्थेला जागतिक पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त आहे. भारतीयामधील विवाह बंधनाला एक पवित्र नातं मानले जाते. भारतात वैवाहिक संबंध हे केवळ दोन व्यक्तीमधील न मानता दोन कुटुंबातील संबंध असे मानले जातात. पाश्‍चिमात्य देशासारखे विवाह म्हणजे एक करार ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये नाही. तंत्रज्ञान व आधुनिक समाज व्यवस्थेमुळे नातेसंबंधाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे.

जोडपी इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकवरूनही विवाह जमवत आहेत; परंतु त्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत, हे वधू-वरांच्या पालकांनी लक्षात घ्यायला हवं. तथापि सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून, पती-पत्नीतील किरकोळ मतभेदांमुळेही जोडपी न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतात. एखादा कौटुंबिक अगर वैवाहिक वाद जेव्हा कोर्टात जातो, तेव्हा त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त होते, तो वाद खासगी राहात नाही. कोर्टाचे कामकाज पती-पत्नी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहतात. त्यांचे रेकॉर्ड बनत राहते व नाती दुभंगून कधीही न जुळणारी बनतात.  

घटस्फोटांचे अस्वीकार्यता या आणि अशा अनेक बाबींमुळे घटस्फोट होत आहेत. घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यास सामाजिक समस्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैवाहिक संबंध, दृढ, आपुलकीचे, प्रेमाचे व निरंतरचे ठेवण्यासाठी लग्नापूर्वी प्रि-मॅरेज काऊन्सिलिंग आणि लग्नानंतर मॅरेज काऊन्सिलिंगची गरज भासत आहे. लग्न होऊन मधुचंद्रानंतर एखमेकांतील अस्पष्ट असणारे गुण-दोष जोडप्यांना स्पष्ट दिसू लागतात व जोडीदारास दोषांसोबत स्वीकारण्याची मनाची तयारी नसल्याने संबंध टोकास जातात, कधीही न जुळणारे बनतात. त्यामुळे जोडीदार निवडताना आणि निवडल्यानंतर प्रि-मॅरेज काऊन्सिलिंग करण्याची गरज भासते.

प्रि-मॅरेज काऊन्सिलिंगच्या सत्रामध्ये भाग घेतल्यानंतर जोडीदारांना विवाहापूर्वीच एकमेकांना समजून घेण्यास मदत होते व भविष्यातील गुंतागूंत अथवा मतभेदांना अगोदरच फाटा देता येतो. प्रि-मॅरेज काऊन्सिलिंगमध्ये संस्कारातील अंतर व मतभेद यांचे प्रमाण खालच्या पातळीवर आणण्यात मदत होती. तसेच विवाहापूर्वी वधू-वर एकमेकांसमोर उघड न करता एकमेकांपासून काही अपेक्षा ठेवून असतात व त्या अपेक्षा विवाहानंतर पूर्ण झाल्या नाहीत की नात्यामधील गोडवा संपून, वाद-विवाद वाढतात. प्रि-मॅरेज काऊन्सिलिंगमध्ये जोडीदारांना एकमेकांकडून विवाहानंतरच्या अपेक्षा, आवड-निवड याबाबत उघडपणे बोलण्यास व्यासपीठ प्राप्त होते.

लग्नानंतर काऊन्सिलिंग हेदेखील महत्त्वाची भूमिका बजावते. पती-पत्नीतील तुटू पाहणारे नाते योग्य वेळी समुपदेशनच्या माध्यमातून पुन्हा एकजीव होते. फॅमिली कोर्टामध्ये धाव घेण्यापूर्वीही  जोडप्यांना काऊन्सलिंगद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला जातो. मॅरेज काऊन्सलिंगमध्ये पती-पत्नीच्या दरम्यानच्या समस्यांचा अभ्यास केला जाऊन त्याबाबत योग्य तो व परिणामकारक सल्ला दिला जाऊ शकतो. मॅरेज काऊन्सिलिंगद्वारे-पती-पत्नीमधील भांडणाचे मूळ शोधून तसेच प्रसंग टाळण्याबाबत मार्गदर्शन मिळू शकते. मुलांच्या संगोपन  व त्यांच्या भविष्याच्या जबाबदारीची जाणीव जोडप्यांना करून दिली जाते. त्यामुळेही जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त करता येणे शक्‍य होते. 

प्रि-मॅरेज काऊन्सिलिंगच्या योग्य मार्गदर्शनामुळे ग्रहताऱ्यांच्या स्थितीपेक्षा मानसिक स्थिती, स्वभाव लक्षात घेऊन योग्य सल्ला दिला जाऊ शकतो. तसेच लग्नानंतर मॅरेज काऊन्सिलिंगच्या माध्यमातून समुपदेशनाने दोन कुटुंबांतील तुटणारे रेशीमबंध पुन्हा साधण्याचे पवित्र कार्य होते.

 

Web Title: Ad. Pruthivraj Narayan Kadam article

टॅग्स