पुणेकरांनो सावधान! अपघाताच्या नावाने होतेय लूट 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 June 2019

पुणे : शहरासह उपनगरांमध्ये वेगवेगळे फंडे वापरून लुटारुंनी नागरिकांना लुटल्याच्या घटना रोज घडत आहेत. आता नवीन एक फंडा रुजत चालला आहे. अपघात करून पैशांची मागणी करण्याचा हा पहिलाच नवा फंडा लुटारुंच्या टोळींनी अवलंबला आहे. अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी सारसबागेपाशी घडली. 

पुणे : शहरासह उपनगरांमध्ये वेगवेगळे फंडे वापरून लुटारुंनी नागरिकांना लुटल्याच्या घटना रोज घडत आहेत. आता नवीन एक फंडा रुजत चालला आहे. अपघात करून पैशांची मागणी करण्याचा हा पहिलाच नवा फंडा लुटारुंच्या टोळींनी अवलंबला आहे. अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी सारसबागेपाशी घडली. 

सारबागेजवळील लक्ष्मी मंदिरापाशी काही अज्ञात तरुणांनी दत्ता कोहिनकर यांना अशाचप्रकारे लुटण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही आमच्या गाडीला धडक दिली आहे. त्यामुळे त्याचे पैसे द्या, असे सांगत त्यांनी कोहिनकर यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पैसे नाही दिले म्हणून दमदाटी, आरडाओरडा करून वाद घातला. या टोळीत पाच ते सहा जण होते. प्रत्येक जण त्यांच्याकडे पैशांसाठी हुज्जत घालत होता. काही वेळा नंतर कोहिनकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस येताहेत याची कुणकुण लागताच लुटारुंनी तेथून पोबारा केला. 

याबाबत कोहिनकर म्हणाले, "अशा टोळ्या सध्या शहरासह उपनगरात कार्यरत आहेत. एखाद्या गाडीला मुद्दामहून धडक द्यायची आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करायची, असा त्यांचा बेत असतो. कधी कधी वाहनचालकाशी एक जण वाद घालत असतो. त्याचे बाकी साथीदार वाहनातील मौल्यवान साहित्य पळवतात. हे लोक हिंदी भाषिक आहेत. असाच एक प्रकार कोथरूडमध्ये मारणे पेट्रोलपंपाजवळ घडला होता. नागरिकांनी अशा लोकांपासून सावध राहावे व पोलिसांशी संपर्क साधावा. 

''नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये. असा प्रकार निदर्शनास किंवा आपल्यासोबत घडत असेल तर तत्काळ हेल्पलाइन क्र. 100 वर संपर्क साधावा. सर्व मदत केली जाईल. ''
- अशोक कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful pune Citizen! you may Looted by fooling as accident