माणूस चुकतो मगच शिकतो

डाॅ आनंद गुरव 
बुधवार, 31 जानेवारी 2018

कधीकधी नवनिर्मितीसाठी जुन्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. या यजनातुनच, या कर्मातुन, या त्यागातून अनुभवरुपी ज्ञानार्जन होत असते. आणि हा अनुभव गवसला की यांना स्वर्गीय आनंद होतो.

माणूस चुकतो मगच शिकतो

आप्त वाक्य, जेष्ठांचा उपदेश हरेकवेळी तो अवलंबेल असे नसते. जुन्या संदर्भातील अनुभव जलदगती ने बदलत असलेल्या समाजपुरुषाला लागू पडतील असेही नसते. 
किंबहुना खुपशी ध्येयवेडी माणसे प्राणांतिक साहसे स्वानुभूती पदरी पडण्यासाठी पदरचा पैसा व वेळ दवडून करताना दिसतात. Just do it म्हणत शारिरीक पीडा सोसण्यात धन्यता मानतात. No pain no gain म्हणतात. 

शर्यतीत, लढाईत झालेल्या इजा - यातना कौतुकपरत्वे कथन करतात. ही आवलिया माणसे बर्फाच्छादित पर्वत पठारे पादाक्रांत करतात. न थकता न कंटाळता त्यांचे हे व्रत अविरत सुरू असते. आयुष्य यज्ञ आहे व शरीर साधन आहे. हे यांचे तत्वज्ञान. यात यांना कुजत बासे होत येणारे मरण त्याज्य असुन विकासाने प्रगल्भ होणे स्विकार्ह आहे.

या यज्ञात प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार ही आहुती आहे.
या अगणित चाललेल्या कर्मयज्ञामध्ये खूपशा आहुतीचा, अगणित द्रव्यापव्ययाचा, बिजगणिताचा सोस ही व्यक्तीमत्वे ठेवत नाहीत कारण या कर्मयोग्यांचे लक्ष स्वानुभूतीकडे, आत्मज्ञानाकडे लागलेले असते. कधीकधी नवनिर्मितीसाठी जुन्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. या यजनातुनच, या कर्मातुन, या त्यागातून अनुभवरुपी ज्ञानार्जन होत असते. आणि हा अनुभव गवसला की यांना स्वर्गीय आनंद होतो. अशा सर्वयज्ञांची, सर्व कर्मांची परिणती फलित अनुभूती ज्ञानामध्ये होते असे म्हणतात. आणि हे अनुभवज्ञान झालेल्या मुमुक्षू पुढे सर्व तोकडे पडतात. लौकीक शिक्षणे जरी कमी असली तरीही, ही माणसे अचंबित प्रगती करतात. लता मंगेशकर, कर्मवीर भाऊराव पाटील, बापू जाधव, ही माणसं जास्त शाळा शिकली नाहीत पण त्यांचं अनुभवविश्व समृध्द होतं.

यासाठीच आपण आपले अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी झटुया. आयुष्याची आव्हाने शिक्षणाचा भाग म्हणून स्विकारू या. आपल्या अशा आयुष्यात अर्थार्जन नक्कीच होणार आहे. कारण आपल्या अनुभूतीचा तो हक्क आहे.

Web Title: Dr. Anand Gurav article