औद्योगिक विकासाला प्रबळ इच्छाशक्तीची गरज

औद्योगिक विकासाला प्रबळ इच्छाशक्तीची गरज

राधानगरीचे हवामान थंड व आल्हाददायक असून दक्षिण महाराष्ट्रातील एक अद्ययावत परिपूर्ण पर्यटन स्थळ असून नजीकच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा व गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने या भागात कर्नाटक, महाराष्ट्र, कोकण, गोवा या परिसरातून पर्यटकांची नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. परंतु राधानगरी तालुक्‍यात औद्योगिक प्रकल्प नसल्यामुळे व लोकप्रतिनिधींच्या धरसोड व उदासीन भूमिकेमुळे गावोगावी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कामधंद्याकरिता कोल्हापूर, कागल, इचलकरंजी, पुणे, मुंबई या शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. तेथे मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर त्यांना संसाराचा गाडा हाकावा लागतो. 

कोल्हापूर जिल्ह्याचे पूर्व भागातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल या चार तालुक्‍यांत मुबलक साखर कारखाने, सूत गिरण्या, शिक्षण संस्था व औद्योगिक वसाहती प्रकल्प यांचे जाळे पसरलेले आहे. मात्र पश्‍चिम भागातील राधानगरी तालुका औद्योगिक वसाहतीपासून वंचित राहिला आहे. राधानगरी तालुका डी प्लस झोनमध्ये येत असून उद्योगधंद्याकरिता शासनाच्या आवश्‍यक त्या सोयी सवलती मिळू शकतात. 
 राधानगरी तालुक्‍यात मुबलक जमीन, राज्यमार्ग, दळणवळण सुविधा, वीज, पाणीपुरवठा या तत्सम भौतिक सुविधा उपलब्ध असताना राधानगरी औद्योगिक वसाहत प्रकल्प का रेंगाळला, याचे आश्‍चर्य वाटते.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात संपूर्ण राधानगरी व भुदरगड तालुक्‍याचा आणि आजरा जि. प. मतदारसंघाचा समावेश असून फक्त आजरा येथे लघु औद्योगिक वसाहत कार्यरत आहे. नजीकचे भुदरगड तालुक्‍यात आकुर्डे येथे औद्योगिक वसाहत मंजूर होते. मात्र राधानगरीलाच सापत्नभावाची वागणूक का दिली जाते, हा प्रश्‍न आहे.

या तालुक्‍यातील दुर्गमानवाड व काळम्मावाडी परिसरातील भूगर्भात बॉक्‍साईटचे प्रचंड साठे आहेत. या साठ्यांची क्षमता पाहता राधानगरी तालुक्‍यात बॉक्‍साईट, ॲल्युमिनियम प्रकल्प होणे गरजेचे आहे. परंतु पुरेशा राजकीय दबावाअभावी हा कारखाना परराज्यात कर्नाटकमध्ये बेळगाव येथे झाला. त्याचा येथील तरुणांना काहीच उपयोग होत नाही. राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा येथील बॉक्‍साईटचे प्रचंड साठे पाहता राधानगरीत बॉक्‍साईट प्रकल्प झाल्यास येथील बेकारीस आळा बसणार आहे. 

राधानगरी तालुक्‍याचे पश्‍चिम भागात मुबलक, वन व औषधी वनस्पती असल्याने या ठिकाणी औषधी वनस्पती प्रकल्प उभारणीस चांगली संधी आहे. आपला भारत देश कृषिप्रधान असल्याने या बागातील विविध फळे व पिके पाहता अन्नप्रक्रिया उद्योग, दुग्ध प्रक्रिया प्रकल्प, रंगनिर्मिती उद्योग व फूडपार्क वगैरे प्रकल्प उभारल्यास सुशिक्षित बेकारांना या भागात रोजगार निर्मीती होऊ शकेल. आपला भारत देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली असताना तालुक्‍यातील अनेक लोकप्रतिनिधींनी मतांच्या जोरावर मुंबई, दिल्ली गाठली. मात्र इथल्या औद्योगिक विकासाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे राधानगरी तालुका औद्योगिक वसाहतीपासून वंचित राहिला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीचा पाया घातलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९०८ च्या सुमारास भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले राधानगरी धरण उभारले. राधानगरीच्या पाण्यावर राधानगरी व कोल्हापूरकडील पूर्व भाग सुजलाम सुफलाम झाला; मात्र राधानगरीचा पश्‍चिम भाग औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यटनदृष्ट्या मागास असून विकासापासून वंचित राहिला आहे.

राधानगरीच्या पूर्व भागातील व शेजारच्या कागल तालुक्‍यात ४ साखर कारखान्यांसह शैक्षणिक प्रकल्प व औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला आसल्यामुळे त्याची दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे. पूर्वीपासून चालू असलेला राधानगरी तालुका संघ व अलीकडेच सुरू झालेला फराळे येथील महाडिक साखर कारखाना वगळता सगळे प्रकल्प भुदरगड, कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात असल्याने राधानगरी तालुकाच औद्योगिक वसाहतीपासून मागास का, असा संतप्त सवाल बेरोजगार तरुणांकडून सध्या विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे राधानगरी तालुक्‍यातील भावी तरुण वर्गाच्या भवितव्याचा गांभीर्यपूर्वक व सकारात्मक दृष्टीने विचार करून राधानगरी औद्योगिक वसाहत मंजूर होणेकरिता सर्व जाणकार व सुज्ञ मंडळींनी यथाशक्ती प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.

राधानगरीत पाठपुरावा सुरू असलेली कामे

  •  भारत राखीव बटालियन व पोलिस प्रशिक्षण केंद्र 

  •  राधानगरी तालुका एम.आय.डी.सी. प्रकल्प 

  •  राधानगरी येथे प्रांत कार्यालय 

  •  महसूल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत 

  • कोल्हापूर-राधानगरी, निपाणी-देवगड राज्यमार्ग विस्तार 

  •  राधानगरी पर्यटन हब मंजूर करणे 

  •  राधानगरी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणे 

  •  कृषी विद्यापीठ स्थापन करणे 

  •  धरणास राष्ट्रीय स्मारकाचा 

  • दर्जा देणे 

  •  अभियांत्रीकी महाविद्यालय 

  •  लघु पशु चिकित्सालय मंजूर करणे 

  •  ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र

  •  वृद्धाश्रम स्थापना

  •  राधानगरी पोलिस उपअधीक्षक कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com