महर्षी महेश योगींचे प्रेरक तत्त्वज्ञान

डॉ. सुनील बी. पाटील
गुरुवार, 11 जानेवारी 2018

भावातीत ध्यान पद्धतीचे प्रणेते ब्रह्मलीन महर्षी महेश योगी यांची १२ जानेवारी २०१८ रोजी जन्मशताब्दी. त्यानिमित्त कोल्हापुरातील भावातीत ध्यान साधक समूहाच्या वतीने एक समारंभ शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० वाजता आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त... 

‘जीवन हे आनंदासाठी आहे’ असा संदेश घेऊन विज्ञान शाखेचा एक पदवीधर तरुण गुरूच्या शोधात बाहेर पडला. त्या तरुणाला ब्रह्मानंद सरस्वती हे गुरू भेटले. १४ वर्षे गुरूंची सेवा करून या तरुणाने जीवनाचे अंतिम सत्य शोधले. गुरूंच्या कृपेने त्याने एक पारंपरिक ध्यान पद्धती भावातीत ध्यान पद्धती Trancendeutal Meditation - TM प्रसारित केली. साऱ्या देशभर आणि हळूहळू जगाच्या कानाकोपऱ्यात या ध्यानाचा प्रसार केला ते महर्षी महेश योगी. 

१२ जानेवारी २०१८ ही महर्षींची जन्मशताब्दी. महर्षी महेश योगी यांनी भावातीत ध्यान पद्धती आणि सिद्धी कार्यक्रमाचा जगभर प्रचार-प्रचार केला. या ध्यान पद्धतीवर सुमारे ७०० संशोधन प्रबंध जगभरातील विविध विश्‍व विद्यापीठातून प्रकाशित झाले. हे ध्यान मनःशांती अध्यामिक उन्नती आणि संपूर्ण आरोग्यासाठी वरदान आहे हे सिद्ध झाले. 

अमेरिकेतील डॉ. रॉबर्ट किथ वालेस या संशोधकाने फिजिऑलॉजी ऑफ मेडिटेशन या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली. महर्षींनी महर्षी आयुर्वेद, महर्षी स्थापत्यशास्त्र, महर्षी गंधर्व वेद, महर्षी ज्योतिष, महर्षी अरोमा थेरपी अशा विविधांगी प्राचीन भारतीय विज्ञानाची जगाला ओळख करून दिली. जगाच्या काना कोपऱ्यात योग आणि आयुर्वेद पोहोचवला. 

भावातीत ध्यानाच्या नित्य अभ्यासाने सत्‌प्रवृत्ती वाढीस लागते. हिंसाचार, गुन्हेगारी, चोऱ्या, दरोडे यामध्ये घट होते असा सिद्धांत ‘महर्षी इफेक्‍ट’ या नावाने मांडला आणि स्वीकारला गेला. 

महर्षींनी भगवद्‌गीतेवर लिहिलेली इंग्रजी भाषेतील टीका खूप गाजली. तसेच महर्षींनी लिहिलेले ‘सायन्स ऑफ बिईंग अँड आर्ट ऑफ लिव्हिंग’ हे पुस्तक जगभर प्रसिद्ध झाले. मानवी जीवनात अंतर्बाह्य आनंद मिळवता आला पाहिजे. १०० टक्के आध्यात्मिक आणि १०० टक्के आधिभौतिक अशी २०० टक्के आनंदी अवस्था भावातीत ध्यानाच्या नियमित अभ्यासाने प्राप्त होते, असा सिद्धांत आहे. 

मध्य प्रदेशातील जबलपूरजवळील एका छोट्या खेड्यात, एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या महर्षींनी जगाला एक नवीन दिशा दिली. जात, धर्म, पंथ, लिंग, वय या पलीकडे जाऊन सगळ्या मानवतेला एकाच भावातीत ध्यानाचा मार्ग आणि मंत्र  दिला. आज अमेरिका येथे महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट, नेदरलॅंड येथे महर्षी युरोपिअन रिसर्च युनिव्हर्सिटी, स्वित्झर्लंड येथे महर्षी वेदिक युनिव्हर्सिटी, भोपाळ मध्य प्रदेश येथे महर्षी वेद विज्ञान विश्‍व विद्यापीठ, छत्तीसगड येथे महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्‍नॉलॉजी ही उच्च शिक्षण देणारी विद्यापीठे आणि देशभर शेकडो महर्षी विद्यामंदिर ही शाळांची साखळी नवा समाज घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. 
निसर्गाच्या नियमानुसार, पर्यावरणाचा समतोल साधत नियमित योग आणि ध्यानाचा अभ्यास करणारा एक नवा समाज आणि पृथ्वीवर स्वर्ग ही कल्पना महर्षींनी मांडली. संपूर्ण जगात विश्‍वशांती राष्ट्र हे स्वतंत्र व्यवस्थापन महर्षींनी सुरू केले. भारतीय शास्त्र, कला यांचा जगभर प्रसार केला. सन २००८ साली महर्षींनी आपले देहरूपातील कार्य थांबवले. 
येणाऱ्या हजारो पिढ्यांना महर्षींचे जीवन, तत्त्वज्ञान आणि त्यांची शिक्षण प्रेरणा देत राहील यात शंका नाही. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली.

Web Title: Dr. Sunil B. Patil article