कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज

कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज

सातशे चौसष्ट महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने 1857 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशीरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब, अभ्यासमंडळ व प्राध्यापकांच्या नियुक्तीस होणारा विरोध हा मूलतः विद्यापीठाचा वाढलेला पसारा कारणीभूत आहे. परीक्षांच्या ऑनलाईन निकालांमध्ये प्रचंड गोधळ झाल्याने विद्यापीठाची पुरती बेअबू झाली आणि कुलगुरुंना जावे लागले. मुंबई विद्यापीठाची स्वतःची अशी परंपरा व प्रतिष्ठा होती, परंतु अाता राजाबाई टॉवरला प्रचंड धक्के सहन करावे लागत आहेत.

गोव्याच्या सीमेवरील दोडामार्ग महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना 550 कि. मी. अंतरावरील विद्यापीठाच्या कामाकरिता मुंबई येथे जाणे अवघड आहे. कोंकणातील रत्नागिरीमधील 45, सिंधुदुर्गमधील 38,  दक्षिण रायगडमधील 20 अशी मिळून एकूण 103 महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोंकण विद्यापीठ स्थापन करणे ही काळाची गरज आहे. डॉ. राम ताकवले समितीने मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाचे विभाजन करुन स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची सूचना केली आहे. तसेच त्यागराजन समितीने प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ निर्माण करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक विद्यापीठात किमान 100 महाविद्यालयांच्या निकषांमध्ये कोंकण विद्यापीठाचा समावेश होऊ शकतो. वास्तविक कोंकणासारख्या दुर्गम व सोयी नसलेल्या भागात विद्यापीठ असावे, असे ज्ञात आयोगाने सांगितले आहे. देशातील शैक्षणिक धोरणाचा तसेच जागतिक संकल्पनेचा विचार करता, लहान विद्यापीठांची वाढ झाल्यास विद्यापीठ अधिक कार्यक्षमतेने काम करुन शैक्षणिक विकास गतीने होण्यास मदत होईल.

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोंकणातील स्थानिक गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील. यामध्ये समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच व्यापारी जहाज वाहतुकीसंबंधी अनेक अभ्यासक्रम सुरु करता येईल. कोकणच्या किनारपट्टीवर एकही मत्स्यविद्यापीठ नाही. तसेच बंदर विकासाला लागणारे मनुष्यबळ पुरविणारा एकही अभ्यासक्रम उपलब्ध नाही. आज कोकणात बंदर व जहाज व्यवसायात 25 ते 30 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, परंतु प्रशिक्षित उमेदवार नसल्याने कोंकणातील तरुण बेकार राहण्याची शक्‍यता अधिक आहे. चेन्नईच्या मेरीटाइम विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरु करण्यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने अपेक्षा फोल ठरविल्या आहेत. सिंधुस्वाध्याय सारखे कोर्सेस बंद पडले, तर रेल्वेला लागणाच्या तंत्रज्ञांसाठी नवीन कोर्सेस उपलब्ध झाले नाहीत. उपकेंद्राला पूर्णवेळ को-ऑर्डीनेटर नाही. तसेच अॅकेडेमिक सुरपरवायझर उपलब्ध नाही. थोडक्‍यात उपकेंद्रात लोकसहभाग नाही. विविध विभागांसाठी प्रोफेसर व रीडर्स नेमतांना भारतामधील विविध भागांतून अभ्यासू व्यक्तींची निवड करता येईल. जेणेकरुन ज्ञानाचे आदानप्रदान होईल. कोकणचे निसर्गसंपन्न व शांत वातावरण संशोधनाला अधिक पोषक होईल.

आज मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमावर शहरी पगडा आहे. कोंकण विद्यापीठातील अभ्यासक्रमाची निवड करतांना कोंकणी संस्कृतीचा प्राधान्याने विचार करता येईल. कोंकणातील या दोन्ही जिल्ह्यांत भौगोलिक सलगता तसेच शैक्षणिक प्रश्न समान आहेत. कोंकणामध्ये परीक्षेमधील कॉपीचे प्रमाण शून्य असल्यामुळे परीक्षा व्यवस्थेची गुणवत्ता अधिक वाढीस लागेल. प्रवास, वेळ, खर्च वाचल्याने प्रशासनामध्ये अधिक कार्यक्षमता निर्माण होईल. देश व विदेशांतील विद्यापीठांशी स्वतंत्रपणे करार करुन कम्युनिटी कॉलेजसारखे प्रकल्प यशस्वीपणे राबविता येतील. अभ्यासमंडळातील सदस्य संख्या कमी करुन बाहेरील विद्यापीठातील प्रतिनिधीत्त्व वाढविता येईल. यास्तव अभ्यास मंडळात अभ्यासू प्राध्यापकांची कमतरता जाणवणार नाही. कोंकणात अनेक प्राध्यापकांचा अनुभव व सखोल ज्ञान व दूरदृष्टी यांचा उपयोग विद्यापीठाला दिशा देण्याचे काम करील. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागांसाठी प्रोफेसर व रीडर्स नेमताना भारतामधील विविध भागांतून अभ्यासू व्यक्तींची निवड करता येईल. जेणेकरून ज्ञानाचे आदानप्रदान होईल. कोकणचे निसर्गसंपन्न व शांत वातावरण संशोधनाला अधिक पोषक होईल. 

कोकणामध्ये नव्याने स्थापन झालेल्या कोकण बोर्डातील दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सलगपणे सहा वर्षे महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकणातील विद्यार्थी बुद्धिमान होतेच, परंतु कोकण बोर्डामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर त्यांचे स्थान अधोरेखित झाले. कोकणातील विद्यार्थी, हुशार, प्रामाणिक, कष्टाळू असल्याने कोंकण विद्यापीठ देखील स्वतःचे असे स्वतंत्र असे स्थान निर्माण करुन कालांतराने आपल्या स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहून दमदारपणे वाटचाल करेल. कोकणातील दापोलीच्या कृषी विद्यापीठाने तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाने दमदार पावले उचलली आहेत.

सोलापूर या केवळ एका जिल्ह्याकरिता राजकीय दबावामुळे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाले. नांदेडमधील स्वामी रामानंदतीर्थ, गडचिरोलीमधील गोंडवाना तसेच जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे उभी आहेत. यास्तव राजकीय प्रभाव आणि पाठिंबा असेल तर विद्यापीठ नजिकच्या टप्यात दृष्टीक्षेपात येऊ शकते. कोकण विद्यापीठाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत येणाऱ्या अडचणींवर मात करुन त्यातूनच वाट काढण्याची तयारी कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दाखविली पाहिजे. कोकणातील लोकप्रतिनिधी, सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक,  प्राध्यापक, संघटना, विद्यार्थी संघटना, विद्यापीठाच्या मागणीसाठी एकवटल्या आहेत. कॉलेजमधील विद्यार्थी या चळवळीत उतरल्यामुळे चळवळीला बळ मिळाले आहे. टिळक, आंबेडकरांच्या कोंकणात स्वतंत्र कोंकण विद्यापीठ झाल्यास विद्यार्थ्यांना स्वत:चे असे हक्काचे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल. प्राध्यापकांना नवी संधी उपलब्ध होईल. संशोधनाला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वाव मिळेल. यातूनच कोंकण विद्यापीठाची एक नवी शैक्षणिक संस्कृती तयार होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com