पन्हाळा -पावनखिंड पदभ्रमंती..

पन्हाळा -पावनखिंड पदभ्रमंती..

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात पदभ्रमंती करण्यासाठी आणि या वीररत्नांच्या पवित्र स्मृतिस उजाळा देण्यासाठी  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून जवळपास 1200 च्या आसपास मोहीमवीर दरवर्षी सहभागी होतात.  मी गेल्या पाच वर्षांपासून माझ्या शाळेतील इतिहास शिक्षक श्री. खटावकर सर यांच्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनातून सहभागी होत आहे.

प्रचंड पाऊस, निसरड्या पायवाटा, पन्हाळ्यावरील गडद धुके, मसाई पठारावरील तुफान वारा यांचा सामना करत, मसाई पठारावर डुलणारी लहान लहान रानफुले, भातशेतीच्या बांधांवरून चालत भाताची डुलणारी रोपं बघत, अनेक वाड्या-वस्त्या, जंगले, ओढे, डोंगरातून कोसळणारे धबधबे बघत जवळपास 47 किमीचे अंतर कसे पार पडते ते कळत सुद्धा नाही. पावनखिंडीतील शुरविरांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या पराक्रमांनी अंगावर रोमांच उभे राहाते.

पन्हाळ्यावर बाजीप्रभूंच्या पुतळ्याजवळ सर्व मोहीमवीर एकत्र येतात. बाजीप्रभूंच्या पुतळ्याला अभिवादन करून मोहीमेची सुरूवात होते. फुटका नंदी मार्गे पन्हाळा उतरताना मोहीमवीरांचा कस लागतो. त्यानंतर थोडं अंतर पार केल्यावर एक उभा डोंगर चढून गेल्यावर म्हाळुंगे गावातून मसाई पठारावर आपण पोहोचतो. पठारावर पोहोचल्यावर नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण हिरवागार परिसर पाहायला मिळतो. या परिसरात खोलगट भागात साचलेली छोटी छोटी तळे, त्याच्या आजूबाजूला चरणारी जनावरं, उन्ह-पावसाचा खेळ बघत, एखाद्या कड्याजवळ येणाऱ्या उलट्या धबधब्यांचे फवारे अंगावर झेलत मोहिम  मसाई मंदिर येथे पोहोचते. तेथे थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा चालायला सुरवात होते. कुंभारवाडी पार केल्यावर खोतवाडी येथे दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतला जातो.

मांडलाईवाडी, करपेवाडीचा धनगरवाडा पार करत निलगिरीच्या जंगलातून जाताना किर...किर...किड्यांचा आवाज कानात गुंजत राहातो. मार्गावरील वाड्या-वस्त्यावरील एकूण स्थानिक लोकजीवन पाहील्यानंतर आपलं शहरी लोकजीवन खूपच सोप्पं आहे हे कळतं. पण या निसर्गरम्य परिसर पाहताना शहरातील धकाधकीच्या जीवनातील शीन एकदम नाहीसा होतो. या लोकांचे जीवन जवळून पाहण्यासाठी त्यांच्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी एकदिवस त्यांच्या सोबत राहावे असे निश्चितच वाटते. मोहिमेचा टप्पा लांब असल्याने एक दिवस आंबेवाडीत राहावे लागते. त्यामुळे येथील वाड्या वस्त्यातील राहाणेही अनुभवायाला या मोहिमेत मिळते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवराआवर करुन चहा-नाश्ता करून मोहीमवीर पावनखिंडींच्या दिशेने पुन्हा सुरु होते. रिंगेवाडी, पाटेवाडी, सुकामाचा धनगरवाडा पार केल्यावर पावनखिंडेचे वेध लागतात. म्हसवडे, धनगरवाडा पार करून पांढरेपाणी येथे आपण पोहोचतो. येथे एसटीबस येत असल्याने वनातील जीवनातून आपण आपल्या नागरीवस्तीत आल्याचा भास होतो. इथे चहा बिस्कीट घेऊन चालून थकून जड झालेली पावले उचलत दुपारी एक-दीड च्या सुमारास पावनखिंडीत आपण पोहोचतो. येथील पराक्रमाचा इतिहास आठवताच अंगामध्ये एक रोमांच उभे राहाते. कसे लढले असतील मावळे, कसा पराक्रम गाजवला त्यांनी, स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले परिश्रम आठवले की आपण किती सुखी जीवन त्यांच्यामुळे जगत आहोत याची आठवण होते. यासाठी ही मोहिम पुन्हा पुन्हा करावी असे वाटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com