रुस्तम-ए-हिंद, मीच !

रुस्तम-ए-हिंद, मीच !

साधारण २०-२१ वर्षापूर्वीची एक आठवण. आम्ही तेव्हा पुण्यातील रास्ता पेठेत एका वाड्यात राहत होतो. तेव्हा मला शाळेत चांगले मार्क्स मिळायचे आणि गल्लीमध्ये हुशार मुलांसाठी जे एक आदराचे स्थान असायचे, त्या स्थानी मी सुद्धा होतो. पुढे मग रमणबागेत जेव्हा गेलो तेव्हा माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. हुशार मुलांच्या पंगतीत बसणारा मी अचानक साधारण हुशार म्हणून गणला जाऊ लागलो. शाळेत तसा फारसा चमकू पण नाही शकलो. उरलं सुरलं अवसान आठवी मध्ये इंग्रजी माध्यम घेतल्यावर गळून पडले. तरीही खूप प्रयत्न केल्यावर ७४ टक्के घेऊन मी दहावी पास झालो. एव्हाना आपण खूप साधारण व्यक्ती आहोत आणि आयुष्याचे विशेष काही करू शकणार नाही असा न्यूनगंड मनात पक्का तयार झाला होता. दहावी झाली आणि वाडिया कॉलेजमध्ये पाउल ठेवले, ते हा न्यूनगंड मनात घेऊनच. मनावर सारखे एक प्रकारचे दडपण असायचे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे, काहीही करून लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहावे लागणार हे आणखी मोठे सत्य, भय बनून माझ्या समोर उभे होते. या सर्वात भर म्हणजे शरीराने सुद्धा मी अतिश्यय किडकिडीत आणि अशक्त होतो. कुणीही डोळे वटारावे आणि मी मान खाली घालून चडफडत तिथून निघून जावे अशी माझी अवस्था होती. एकूणच माझ्या मनातला न्युनगंडाचा राक्षस अहोरात्र थैमान घालायचा. कसेही करून मला या सर्व परिस्थिती वर मात करायची होती. पण कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता.

एक दिवस माझी भेट गल्लीतल्या माझ्यापेक्षा वयाने फारच मोठ्या दोन मुलांबरोबर झाली. रास्ता पेठेत असलेल्या समर्थ व्यायाम मंदिरात ते दोघे नियमित जायचे. आणि मग मी सुद्धा त्यांच्याबरोबर व्यायामाला जाऊ लागलो. सुरुवातीला खूप त्रास झाला पण हळू हळू ते शारीरिक कष्ट अंगवळणी पडले. मग दोन वर्षात ‘अरे तू व्यायाम करतोस का?’ असे प्रश्न ऐकून मन सुखावू लागले. मग व्यायामाला नवख्या मुलांकरिता मी एक आदर्श बनू लागलो. गल्लीतल्या माझ्या वयाच्या मुलांची समर्थ मध्ये गर्दी होऊ लागली. पण आपण काही तरी वेगळे आणि सर्वप्रथम करून दाखवले या आनंदात आता माझ्यातल्या न्युनगंडा ची व्याप्ती कमी कमी होऊन लयाला गेली. इतर मोठी मुले जे वजन उचलतात आणि जे repetitions मारतात त्या लेवलला मी पोचलो. आता मला स्वर्ग दोन बोटे उरला होता. घायल, कमांडो अशा सिनेमाची तर पारायणे झाली होती. कमावलेली ताकद कुठेतरी दाखवावी अशी खुमखुमी सतत व्हायची. सुदैवाने आणि आई-वडिलांनी केलेल्या चांगल्या संस्कारांमुळे, वाममार्गापासून मात्र दूर राहिलो. 
आमच्या वाड्यामध्ये एक कुटुंब राहायचे – आई – वडील आणि त्यांच्या तीन मुली. संपूर्ण गल्ली त्यांना मामा – मामी म्हणून संबोधायचे. मामा कुठे तरी लोखंडी सामानाच्या वर्कशॉप मध्ये काम करायचे. साधारण ६ फुट उंची, धिप्पाड शरीर आणि अवजड सामान उचलून झालेले पिळदार शरीर. लांब केस तेल लावून पूर्ण मागे फिरवलेले, रंग तांबूस गोरा, झुपकेदार मिशा, आणि कहर म्हणजे, भरपूर दारू पिऊन लालबुंद झालेले त्यांचे मोठाले डोळे. चिडले कि यांच्यासमोर कुणीच टिकत नसे. तर हे मामा रोज संध्याकाळी कामावरून येताना दारू पिऊन यायचे आणि बहुतेक वेळा आपला सर्व राग आपल्या बायकोला बदडून बाहेर काढायचे. हे मारणे चालू असायचे तेव्हा आख्खा वाडा ते डोक्यावर घ्यायचे. मुली मात्र कुठेतरी किंवा कुणाच्या तरी घरी जाऊन लपायच्या. मामांनी मुलींना शोधून त्यांना मारू नये म्हणून मामी स्वतः त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या लाथा बुक्क्या सहन करायच्या. सर्वांना हळहळ व्हायची पण दारूने आणि रागाने माथे भडकलेल्या या अशा माणसाला अडवणार तरी कोण?

रास्तापेठेमध्ये भाजी मंडई जवळ एक देशी दारूचा गुत्ता होता. (कदाचित आताही असेल, समाजातली अशी कीड लवकर संपत नाही) संध्याकाळी तिथे थांबून मगच स्वारी घराकडे यायची. मामा झोकांड्या घेत घराकडे चालू लागले कि हि बातमी कुणी न कुणीतरी त्यांच्या घरी पोचवायचे. “मामा येत आहेत, खूप दारू पिलेत”. मग मुलींची आणि मामींची पळापळ व्हायची. काही वेळेला सगळे पळून कुणाच्या न कुणाच्या तरी घरात लपलेले असायचे आणि मामा पूर्ण वाड्यात हाका आणि शिव्या देऊन त्यांना बोलावत फिरायचे. शेवटी स्वयंपाकाच्या वेळी तरी मामींना घरी जावेच लागे. आणि मग घरात धुडगूस व्हायचा. एक तर आधीचा राग आणि मग मला फसवून लपून बसल्याचा वेगळा राग. अशा दोन्ही रागांचा परिणाम मामींना लाथा बुक्क्या आणि अर्वाच्य शिव्या खाऊन सहन करावा लागे. 

अशाच एका संध्याकाळी मामा दारू पिऊन आले. आणि मग घरात नेहमीसारखा दंगा चालू झाला. इतकी वर्षे आई वर होणारा अत्याचार बघून मुली सुद्धा अधून मधून प्रतिकार करायचा प्रयत्न करू लागल्या होत्या. अर्थात त्या तीघींचा एकत्र प्रतिकार देखील मामांच्या राक्षसी ताकदी समोर तोकडा पडे. तर असा हा प्रतिकार चालू असताना त्या संध्याकाळी मामांच्या हाताला मधली मुलगी सापडली. वयाने माझ्याच बरोबरीची. आणि मग काय, बघता बघता ते तिला मारत, ओढत बाहेर ओट्यावर घेऊन आले. संपूर्ण गल्ली तेव्हा रस्त्यावर हा प्रकार बघायला जमलेली. मी नुकताच व्यायाम शाळेतून घरी आलेलो. मारामारीचा आणि रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकून मी आणि आई बाहेर आलो. त्या वेळी मामांनी त्या मुलीला मागून पकडले होते. उजवा हात गळ्याभोवती होता आणि त्या मगर मिठीत तिला आता गुदमरू लागले होते. माझ्या आईला राहवले नाही आणि ओरडतच मला म्हणाली – “अरे बघतोस काय नुसता जा सोडव तिला नाहीतर मरेल ती”. क्षणाचाही विलंब न करता मी जिना उतरून ओट्यावर आलो. आणि जसे मामांनी तिला पकडले होते तसे मी त्यांना पाठीमागून पकडले, एका हाताने तिच्या गळयाभोवतालचा फास सोडवला. तशी ती मुलगी उरलेली ताकद एकटवून तिथून पळून गेली.

आता कापरे भरायची वेळ माझी होती. कारण एव्हाना मामांनी चिडून मागे वळून माझा चेहरा पहिला होता. त्यांच्या डोळ्यातली ती जरब आणि पराजय झाल्याचा संताप स्पष्टपणे जाणवत होता. पण आता हातपाय गाळले तर माझा मुडदा पडेल आणि सोडवायला कोणीही येणार नाही ह्याची कल्पना तेव्हाच आली. आणि मग मी पूर्ण ताकदीनिशी मामांना खाली पाडून त्यांचे दोन्ही हात पाठीमागे कंबरेवर ओढून घेऊन दाबून ठेवले. एखादा मल्ल प्रतिस्पर्ध्यावर स्वार व्हावा तसा मी त्यांच्या अंगावर बसलो होतो. आपल्याला काहीच हालचाल करता येत नाहीये हे पाहून त्यांनी नांगी टाकली आणि वाड्यातली इतर मोठी माणसे आल्यावर त्यांनी ह्या गोंधळाला त्या दिवसापुरता पूर्णविराम दिला.

श्रीयाळशेठ जसा एका दिवसाचा राजा झाला होता, तसा एका संध्याकाळचा रुस्तम-ए-हिंद झालो होतो, मीच ! आज मागे वळून बघताना मनात विचारांचे काहूर माजते. त्याकाळची तरुण पिढी कशा परिस्थितीतून तावून सुलाखून बाहेर पडली. बरेचसे वाममार्गाला जाऊन संपले. ठराविक काहीजण ज्यांच्यावर चांगले संस्कार झाले, ते जिंकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com