नैसर्गिक फुलोत्सव...

नैसर्गिक फुलोत्सव...

अपरांत भूमी अर्थात कोकण पूर्वेला सह्याद्री तर पश्चिमेला अथांग सागर. याच पर्शरामभूमीवरील सड्यांवर अर्थात कातळांवर सध्या नैसर्गिक फुलोत्सव पहायला मिळतो. अनेक प्रकारची रंगसंगती घेवून हे सडे, पिवळे, पांढरे, गुलाबी तर काही पठारे कंच हिरवीगार दिसतायत. रंगारींच्या कुंचल्यातही न मिळणारे रंग या कातळांवर निसर्गाने रेखाटलेत ! कुठे सोनकी तर कुठे सीतेची आसवे तर कुठे तेरडे रानोमाळ फुललेली.

वार्‍याच्या हळुवार झुळकेवर डोलणारी ही फुलं कवी मनाला वेड लावतात, चित्रकारांना खुणावतात तर प्रेमी युगुलांना डोळा मारतात. स्वच्छ रंगीबेरंगी आकाश, लख्ख प्रकाश छायाचित्रकारांना भुरळ घालतो. कोणती छबी कशी घेऊ हेच त्यांना कळत नाहीसे होतं! भू मातेच्या या विविधरंगी ल्यालेल्या या रंगमंच्याचा हेवा आकाशालाही वाटू लागतो. रंगीबेरंगी, वेगवेगळे आकार घेऊन ढगही दाद देतात, वरुणराजालाही मोह आवरत नाही हलकेच सळसळत शिडकाव करत, या नजर लागलेल्या रंग रंगुल्या सान सानुल्यांना पुन्हा टवटवीत करून निघून जातो.

परतीच्या वाटेला जायचे का बहिणाबाई! थांबना! शिघ्र कवी म्हणतात ना, तुला आता काही सुचणार नाही! असे माझे उपरोधिक बोलणे झोबलं! ऐक तर म्हणत एक एक शब्द शब्दबद्ध झाले.

निळी जांभळी तांबूस पिवळी

फुलती खुलती हलती डुलती

तर्‍हेतर्‍हेची रानफुले ही मनामनाला भुरळ घालती

कुठे डवरती घन गुच्छांतुन

कुठे तरारती उंच तु-यांतुन

कुठे विलसती इवलीइवली 

तृणपात्यांच्या हिरवाईतून

रंग तयांचे लोभसवाणे

नटते सजते अवघी सृष्टी

दूर दूरवर रानोमाळी

सौंदर्याचे निर्झर फुटती

रानातवनात रानाचेच गाणे

घुमवित जातो रानातील वारा

रानात श्रावण अलगद शिंपतो

वृक्षवेलींवर रानपावसाच्या धारा

नको मानवाचा इथे हस्तक्षेप

फुलांचे हे वन असावे सुंदर

नको वणव्यात करू त्यांची राख

प्रेमाने जपूया रुपाचे डोंगर

वा वा सुंदरच ताई! निसर्गाची ही सप्तरंगी उधळण फक्त काही दिवसांचेच आयुष्य घेऊन उमललेली ही रानफुलं आपल्याला निख्खळ आनंद देत देत मन प्रसन्न करत नवी उभारी देतात. शांताताई शेळक्यांचे हे गीत ओठी येते मग मोठ्याने म्हणावेसे वाटते!  रंग रंगुल्या सान सानुल्या, गवतफुला रे गवतफुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा ! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com