डाउन्स सिंड्रोम, एक व्यापक दृष्टिकोन !

डॉ. दीप्ती चव्हाण
बुधवार, 21 मार्च 2018

भारतात डाउन्स सिंड्रोम हा ८०० ते १००० पैकी एका मुलामध्ये आढळतो. डाउन्स सिंड्रोमने ग्रासलेल्या व्यक्तींची संख्या बरीच आहे; पण त्याबद्दल जागरूकता कमी असल्याने याची नोंदणी केली जात नाही. डाउन्स सिंड्रोमचे वर्गीकरण ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाउन यांनी केले होते. २१ मार्च हा दिवस ‘जागतिक डाउन्स सिंड्रोम दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त...

डाउन्स सिंड्रोमच्या मुलांच्या चेहऱ्याची ठेवण एक विशिष्ठ प्रकारची असते. उदा. मंगोलियन डोळे, बसके नाक, अंडा आकार ओठ, डोळ्यातील कमी अंतर वगैरे. शारीरिकदृष्ट्या त्यांच्या स्नायूमधील लवचिकता व ताकत साधारणतः कमी असते. या मुलांची उंची व एकूण वाढ ही इतर मुलांपेक्षा कमी असते. जन्मतः डाउन्स सिंड्रोममध्ये हृदय, कान, जठरांतर्गत, थाइराइड व श्‍वसनाविषयी आजार दिसून येतात.

डाउन्स सिंड्रोम हा जगात सर्वसाधारणपणे आढळणारा गुणसूत्रामधील दोष आहे. याला ट्रॉयसोमी २१ असे म्हणतात. गर्भवती स्त्रियांमध्ये १३-१४ आठवड्यांच्या आत डाउन्स सिंड्रोम स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. सर्व गर्भवती स्त्रियांनी या चाचण्या करून घेणे आवश्‍यक असते.  

सर्वसाधारण डाउन्स सिंड्रोमच्या मुलांची शारीरिक व मानसिक वाढ धिम्या गतीने होत असल्याने ही मुले इतर मुलांपेक्षा मागे पडतात. पूर्वी डाउन्स सिंड्रोमच्या व्यक्तीचा जीवन कालावधी २५ वर्षे होता; पण  आता तो ६० वर्षांपर्यंत वाढला आहे.

डाउन्स सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये भाषेचे आकलन व समज यापेक्षा भाषेचा वापर करण्यास अडचणी येतात. स्नायूमध्ये लवचिकता व ताकतीची कमतरता असल्यामुळे ही मुले मागे 
पडू शकतात. 

त्वरित निदान व उपचार यावर डाउन्स सिंड्रोमच्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य अवलंबून राहते. ० ते ३ वर्ष या कालावधित जर निदान व उपचार चालू केले, तर बाळाच्या विकासासाठी आदर्श ठरते. स्पेशल नीड्‌स चाइल्ड असूनही डाउन्स सिंड्रोममध्ये रेमेडियल थेरपीच्या मदतीने शैक्षणिक यश मिळवणे साध्य होते. डाउन्स सिंड्रोमकडे अपंगत्व म्हणून न बघता मुलाची नॉर्मल वाढ होण्यासाठी दक्षता घेऊन उपचार केल्यास फायदा होऊ शकतो. 
 

Web Title: Esakal Citizen Journalism Dr. Dipti Chavan article