माडगूळवेडे गदिमा!
कवी ग. दि. माडगूळकर यांचे आजपासून (ता. १) जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त...
अनेक दिग्गज लेखक छोट्या-छोट्या खेड्यांतून जन्मले आणि त्यानंतर शहरांत जाऊन स्थायिक झाले. गदिमा याला अपवाद ठरले. त्यांचे माडगूळप्रेम अद्वितीयच. ‘माडगूळ’ म्हणजे त्यांना जीव की प्राण. त्यांचे शरीर पुण्यातील ‘पंचवटी’मध्ये, मात्र त्यांचे पंचप्राण माडगूळमध्ये अशी त्यांच्या मनाची अवस्था असे.
गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) हे माडगूळचे कुलकर्णी. जन्म १ ऑक्टोबर १९१९ चा. ‘माडगूळ’ गाव हे वर्षानुवर्षे दुष्काळी छायेतलं. माडगूळमध्ये पावसाचे प्रमाण कमी. जवळजवळ ओसाड व निर्जन भागच जास्त; पण म्हणतात ना, सौंदर्य दृश्यात नसतं. ते बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं. हेच सूत्र पकडून गदिमा माडगूळविषयी लिहितात, ‘‘अभिमान वाटण्यासारखी कोणतीही गोष्ट माझ्या गावात नाही. पण, ते लोककवी ‘श्रीधरा’च्या नाझऱ्याजवळ वसत आहे हे काय कमी झालं! माणसाची पारख जर त्याच्या मित्रमंडळींवरून करतात तर गावाची पारख त्याच्या सहवासी नगरावरून का करू नये? ‘
राम विजय’, ‘हरी विजय’, ‘पांडवप्रताप’ यांसारखे ग्रंथ बाळबोध ओवीत सांगणारा श्रीधर माझ्या गावापासून अवघ्या अडीच मैलांवर होऊन गेला, याचाही मला अभिमान वाटतो. ‘पुष्पसंगे मातीस वास लागे’ श्रीधरांच्या जन्मानं नाझरे सुगंधित झालं आहे. त्या सुगंधाचा सौम्य दरवळ माझ्या गावापर्यंत खचित यावा, तेही थोडं सुगंधित व्हावं, हे साहजिकच नाही का?’’
माडगूळच्या पूर्वेस खंडोबाचे पुरातन मंदिर आहे. या खंडोबाविषयी गदिमांच्या मनात अपार श्रद्धा होती. तेवढाच जिव्हाळा दलित समाजाच्या ‘तक्क्या’ या टुमदार इमारतीबद्दल होता. रात्रीच्या वेळी तेथे होणारी भजने गदिमांनी अनेकदा पाहिली, ऐकली आहेत. तेथील भजनाचे स्वर आणि विषय त्यांच्या कानात अजून स्मरत आहेत. या स्मरणातून ‘काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ’ या गाण्याचा जन्म झाला.
माणदेशी माणूस जितका गोड तितकाच चिवट आहे. गावातल्या माणसांसारखीच तिथली घरेही काटक आहेत. उन्हा-पावसाला ती अक्षरशः धाब्यावर बसवितात! कुठल्याही संकटानं तिथल्या माणसाचं वा घरांचही धाबं दणाणत नाही. माडगूळ गावात वेगवेगळ्या जाती-धर्मामध्ये विलक्षण सामंजस्य व प्रेम आहे. ब्राह्मणांच्या घरी गणपती बसल्यावर मोमीनांची खाला त्याला हात जोडते. चावडीत ताबूत तयार झाला म्हणजे त्याला मलिद्याचा नैवेद्य कुलकर्ण्यांच्या घरून जातो. ब्राह्मणांची मुलं अलाव्याभवती नाचतात आणि मुस्लिमांमधील तरुण गणपतीच्या मिरवणुकीपुढे गदगाफरी खेळून दाखवितात.
गदिमांचे माडगूळमधील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे कडुनिंबाचा पार. कारण, गदिमांच्या बालपणातले असंख्य ‘मंतरलेले दिवस’ या कडुनिंबाखालीच फुलले होते. कैक गुढीपाडव्यांना त्यांनी या पारावरच्या निंबाची पालवी खाल्ली होती. पिकलेल्या निंबोळ्यांनी कुरकुल्या भरून याच पाराखाली ते आंब्यांच्या व्यापाराचा खेळ खेळले होते. बालवयात रांगेत उभा राहून परवचा म्हणण्यापासून, प्रौढ वयात जमलेल्या गावकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं? हे समजावून सांगण्यापर्यंतचं त्यांचं वक्तृत्व याच निंबाखाली मोहरलं आहे. मोठेपणी या कडुनिंबावरून ‘अमृतवृक्ष’ नावाची एक दीर्घ संगीतिका गदिमांनी लिहिली. वर्षातून जानेवारीत गदिमा माडगूळच्या भेटीला न चुकता जात. या काळात माणदेशमध्ये सगळीकडे शाळूची पिके डोलत असतात. कणसांमध्ये हुरडा तयार झालेला असतो. शाळूचा हुरडा हा तर गदिमांचा वीक पॉइंट.
माडगूळच्या मातीचा सुगंध नाकात शिरताच गदिमांचं कवी मन कसं काय स्वस्थ बसू शकेल? गावाजवळील ‘बामणाचा पत्रा’ हे त्यांचं आवडतं ठिकाण. खंडोबाच्या मंदिराकडे तोंड करून ते लिहायला बसत. बऱ्याचशा साहित्यकृतींचा जन्म ‘बामणाचा पत्रा’ येथे झालेला आहे. माडगूळविषयी ते लिहितात, ‘‘माझं गाव गोकुळासारखं आनंदी आहे, असं मी म्हणत नाही. तिथं दुःख आहे. हेवेदावे आहेत. पण, मला ते दिसत नाहीत. मला माझ्या गावचं मोठेपण तेवढं दिसतं. कारण मी स्वतःला त्या गावाचं लेकरू म्हणवितो.
दुःखकष्टातूनही जीवनातला आनंद वेचण्याची वृत्ती मला त्या गावच्या मातीनं दिली. पुढचे सातही जन्म मला या खेड्यात लाभावे. स्वतःइतकाच मला माझ्या गावाचा अभिमान आहे. अंगावर रोमांच उभे करणारे गदिमांचे हे माडगूळप्रेम. गावच्या प्रेमापोटी कुलकर्णी हे आडनाव मागे पडले व त्या ठिकाणी ‘माडगूळकर’ हेच नाव झळकू लागले. खेड्यापाड्यातून नोकरी वा व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले वर्षातून एकदा गावच्या यात्रेला हजेरी लावतात. गावच्या सुख-दुःखात समरस होण्याचा गदिमांचा आदर्श या तरुणांनी आचरणात आणावा.