मन... वास्तव की भ्रम?

डॉ. सुभाष के. देसाई
बुधवार, 14 मार्च 2018

ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांच्या ‘मन वास्तव की आभास’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. १८) न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते होत आहे, यानिमित्त...

जागतिक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी फार प्राचीन काळापासून चालत आलेली एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी जीवनात जाणीव शक्तीचे खरे स्वरूप भौतिक आहे की मानसिक? आतापर्यंत मन हे मानवी जीवनातील अनेक रहस्ये स्पष्ट करण्यासाठी वापरलेले गृहीत तत्त्व होते. डॉ. सिंगमंड फ्रॉईडने या क्षेत्रात केलेल्या क्रांतीने पाश्‍चात्य संस्कृतीवर सखोल ठसा उमटवला. १९९६ नंतर मात्र शास्त्रज्ञ अशा निष्कर्षाला पोचले की, संशोधनाच्या दृष्टीने पाहिले तर संपूर्ण फ्रॉईडच्या मांडणीला प्रायोगिक सत्यता नव्हती आणि त्याचे अनेक दावे उदा. इड, इगो, सुपरइगो आणि असेच विचार निराधार ठरले आहेत.

फ्रॉईडनंतर कॉगनिटिव्ह, बिहेव्हिअरल, ह्यूमॅनिस्टिक ॲप्रोचीस सिद्धांत पुढे आले; पण सर्वानुमते मनाची सर्वमान्य व्याख्या आणि मनाचे स्पष्ट गुणधर्म कोणीच मांडले नाहीत.
सध्या मेंदूच्या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, १०० बिलियन मज्जापेशी आणि रसायने ही आपल्या भावना, संवेदना आणि शिकणे, विचार याला कारणीभूत असतात. शास्त्रज्ञ आता मशीन लर्नींग सॉफ्टवेअर बनवत आहेत. मानवी मेंदूचा वापर रिव्हर्स इंजिनिअरिंग या तंत्राने करून सॉफ्टवेअर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्याद्वारे फोटोग्राफ आणि व्हिडिओ मानवाप्रमाणे वाचता येईल. 

मानसशास्त्राकडून न्यूरॉलॉजीकडे बदललेले हे नवे विश्‍वचित्र मानवी जीवनावर दुरगामी परिणाम ठरणारे आहे. मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षण क्षेत्राच्या पायालाच त्याने सुरूंग लावला आहे. 

AI  किंवा MI, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन अंतःस्फूर्ती म्हणजे निसर्गशक्तीचे अनुकरणच असते. नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ रेप्युटर यांनी त्याला ‘मॉर्फोजानिक फॉर्म ऑफ दि युनिव्हर्स’ असे म्हटले आहे. प्रत्येक मानवी अवयवाची वाढ आणि कार्य या पूर्वनियोजित नकाशाप्रमाणे होत असते. मन हे वास्तवात नसून तो भ्रम आहे. आता वेळ आली आहे की, मानसशास्त्राचे विलिनीकरण मज्जासंस्थाशास्त्रामध्ये व्हायला हवे.

नम्रपणे मला सुचवायचे आहे की, मनाचे तत्त्वज्ञान (Philosophy of Mind) ऐवजी मेंदूचे तत्त्वज्ञान Philosophy of Brain  हे शीर्षक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात वापरले जावे. आता जागतिक तत्त्वज्ञ मंडळीवर अशी महत्त्वाची जबाबदारी येऊन ठेपली आहे की, त्यांनी विज्ञान क्षेत्रातील सल्ला द्यावा की, या नवनव्या शोधामुळे समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा. केवळ मूठभर संशोधकांचा किंवा ताबेदारांचा फायदा हे ध्येय ठेवू नये. 
 

Web Title: Esakal Citizen Journalism Dr. Subhash Desai Article