अन् कासव संवर्धनाची मोहीम बाळसे धरू लागली !

अन् कासव संवर्धनाची मोहीम बाळसे धरू लागली !

प्रदीप डिंगणकर, एक असे व्यक्तिमत्व जे बघताक्षणीच आपल्या विचारांनी दुसर्‍याला प्रेमात पाडून घेईल. गेली दोन तप विविध जंगली प्राणी, पक्षी व सर्प यांचे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनचे (बचाव आणि पुनर्वसन) काम हा माणूस करतोय. पण या माणसाचे ना कुठे नाव ना चर्चा! “एकला चलो रे” हे शीर्षक खरोखरच सार्थ ठरवणारा. या माणसाने आतापर्यंत कधीच प्रसिद्धी मिळवण्यासाठी काम केले नाही किंवा इतरांसारख्या तथाकथित आपण या क्षेत्रातील तज्ञ असल्याचा आव आणून आपली पोळी भाजण्याचा ढोंगी डाव कधी साधला नाही.

गेली दहा वर्षे किंवा त्याही थोडे आधीपासून डिंगणकर व त्याचा सहकारी राकेश पाटील यांनी सुरू केलेली सागरी कासव संवर्धन व संरक्षण मोहीम आता कुठे दोन वर्षांपासून बाळसे धरू लागली आहे. त्याने गेल्या वर्षी जवळपास 650 तर या वर्षी अंदाजे 450 कासवाची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडली आहेत.

त्याचे इप्सित आता काही प्रमाणातच साध्य झाले असले तरी दरवर्षी यातील त्याचे यश वाढणारच आहे. यात शंका नाही. हे प्रदीप आणि सहकार्‍यांनी घेतलेल्या अपार कष्टांचे फळ आहे. यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांची विचारसरणी बदलणे, कासवांची घरटी संरक्षित करण्यासाठी तसेच त्यातील अंडी, कोल्हे-कुत्रे व स्थानिक अंडी गोळा करणारे यांच्यापासून वाचवणे, यासाठी किनार्‍यावरती जागता पहारा देणे, घरट्यांना कुंपण घालणे, त्यासाठी स्वतःच्या पदरच्याच पैशांनी साधनसामग्री जमवणे, स्वतःचे कुटुंब तसेच व्यवसायाकडे दुर्लक्ष अशा एक ना अनेक अडचणींना तोंड देऊन, प्रदीपचे कासव संवर्धनाचा उद्देश साध्य झाला आहे. यामध्ये त्याचा कोणताही स्वार्थ नाही.

आजच्या घडीला र्‍हास होत असलेली जैवविविधता आणि पैसा व स्टेटस् यासाठी लागणारी स्पर्धा यातून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अशी कामे करणारी माणसे फारच दुर्मिळ आहेत. आपण चाकोरीबद्ध जीवन सोडून अशी कामे हाती घेऊ शकत नसलो तरी प्रदीपसारख्या माणसाच्या कामाला प्रसिद्धी देऊन त्यांच्या कार्याला किमान हातभार नक्कीच लावू शकतो. तुम्हालाही जर असे काही हटके संवर्धनाचे काम करण्याची इच्छा असेल तर प्रदीप डिंगणकर यांना संपर्क करू शकता.

रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सनेसुद्धा गेली 23 वर्षे अ‍ॅनिमल रेस्क्यू आणि रिहॅबिटिलेशन कार्ये हाती घेऊन ती पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या वाटचालीमध्ये गावागावातील शाळांमधून सर्पप्रदर्शन, सापांविषयीचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक उपक्रम, सागरी कासव बचाव मोहीम, जखमी कासवांवर आैषधोपचार, सागरी गरुड संवर्धन व संरक्षण, जखमी प्राण्यांवर उपचार तसेच वन विभागाच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची एक ना अनेक कामे आजपर्यंत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्थेने केली आहेत. हा प्रयत्न भविष्यातही अविरत चालूच राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com