काळानुरुप हवा स्थापत्यशास्त्र शिक्षणपद्धतीत बदल 

काळानुरुप हवा स्थापत्यशास्त्र शिक्षणपद्धतीत बदल 

अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. पण या व्यतिरिक्त शिक्षण ही सुद्धा मानवाची चौथी मुलभूत गरज आहे. आजचे भारतीय शिक्षण हे मुख्यत्वे 10+2+3, 10+2+4 व 10+5 ह्या पॅटर्न मध्येच पहायला मिळते. त्यातील प्रामुख्याने 10 वी व 12 वी ह्या दोन वर्गानांच सर्वत्र अति महत्त्व दिले जाते. 10 वी नंतर जवळ जवळ सर्वच पालकांना आपल्या पाल्याने "शास्त्र' ह्या शाखेतच प्रवेश घेऊन पुढे इंजिनियरिंग व मेडीकल ह्या केवळ दोनच शाखेमध्ये जाऊन मोठे नाव, पैसा कमवावा हीच पालकांची मनोकामना असते. एकदा का आपला पाल्य 12 वी मध्ये जेईई, सीईटी, नाटा व निट ह्या प्रवेशपरीक्षेमध्ये चांगल्या रॅंकला आला रे आला की, त्यांना आपला पाल्य उत्कृष्ठ अभियंता व निष्णात डॉक्‍टर ह्या दोनच व्यक्तिरेखेमध्ये जळी, स्थळी काष्टी पाषाणी दिसत असतो. 

खरेतर इंजिनियरींग व मेडीकल ह्या दोन भिन्न शाखा पण त्यातील शास्त्रीय पद्धत ही एकच किंवा समान असल्याचे जाणवते आणि अगदी तोच खरे आहे. मेडीकल शाखा म्हणजे मानवी शरीराचे अभियांत्रिकी शास्त्र आणि इंजिनियरींग शाखा म्हणजे बांधकामाचे वैद्यकीय शास्त्र असेच म्हणजे रास्त वाटते. खरेतर सिव्हील इंजिनियरींग हे अवघड मेडीकल सायन्सच आहे. कारण सिव्हील इंजिनियरींग हे कोणत्याही प्रकारच्या स्ट्रक्‍चरच्या तब्बेतीविषयीचे शास्त्र आहे पण ते शिक्षण मेडीकल सायन्सप्रमाणे शिकविले जात नाही आणि हाच ह्या दोन शाखामधील मुलभूत फरक आहे. 

डॉक्‍टर हा मानवी शरीराचा स्थापत्य अभियंता तर स्थापत्य अभियंता हा कॉक्रीट व स्टील स्ट्रक्‍चरचा (निर्जीव शरीराचा) डॉक्‍टर असेच संबोधणे खरेतर यथोचित आहे. आज 12 वी नंतर मेडीकल सायन्स ह्या शाखेमध्ये प्रवेश घेतला तर जवळ जवळ पाच वर्षे पदवी घेण्यासाठी लागतात. त्यानंतर त्यांना एक वर्षे ऍक्‍च्युअल शहरी व ग्रामीण प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याचप्रमाणे 12 वी नंतरचे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण प्रात्यक्षिकासोबतच शिकविले जाते. म्हणजेच काय जवळजवळ सहा वर्षे मेडीकलचा विद्यार्थी प्रात्यक्षिकासोबत आपली ज्ञानाची बॅक भरत असतो आणि अगदी याच्या विरुद्ध दिशेला स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण आपणास पहाण्यास मिळेल. 12 वी नंतर स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करण्यासाठी फक्त चार वर्षे लागतात. पण ही चार वर्षे त्या विद्यार्थ्यांना फक्त वर्गीय शिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे प्रयोगशाळेत मॉडेलवर प्रात्यक्षिके घेतली जातात. इंजिनियरींगचे शिक्षण चालू असतानाच कॅंपस प्लेसमेंट सेलमधून त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते आणि पालकांचे 10 वीमध्ये बघितलेले गोड स्वप्न एकदम साकार होते. 

स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाचा पूर्ण कोर्स जर मेडीकल सायन्स सारखा अवलंबिला तर जगात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडेल. यातून उत्कृष्ठ व जाणते स्थापत्य अभियंता तयार होतील यात तीळ मात्र देखील शंका नाही. उदाहरणार्थ कॉंक्रीट हा विषय आपण विचारात घेतला तर विद्यार्थ्याला साईटवर प्रात्यक्षिक पहाणे उचित आहे, पण आज ही स्थिती कोणत्याही स्थापत्य महाविद्यालयात निदर्शनास येत नाही. कारण कॉलेजमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे कॉंक्रीट करणे शक्‍य नाही. विद्यार्थ्यांना फक्त त्यामध्ये सिमेंट वाळू, खडी व पाणी यांचे मिश्रण आहे, एवढेच त्यांना माहित असते, पण प्रत्यक्ष साईटवर ते कसे बनविले जाते? ते कोणत्या पद्धतीने पाईल, स्लॅब, बीम कॉलम व शियर वॉल मध्ये ओतले जाते? त्यामध्ये व्हायब्रेटर कसा चालविला जातो? त्याचा परफॉर्मन्स काय? त्याचा वॉटर-सिमेंट रेशो काय? तसेच सिमेंट -अग्रीगेट रेशो काय? इत्यादी विषयी सर्वच विद्यार्थी अनभिज्ञच असतात. या सर्व प्रश्‍नांच्या त्वरीत उत्तरासाठी कॉंक्रीट हा विषय मेडीकल सायन्सच्या प्रात्यक्षिकाप्रमाणे शिकविणे अपेक्षित आहे, आणि जर तसे केले तर खरोखरच आजच्या कॉंक्रीटच्या युगात अभूतपूर्व क्रांती घडेल आणि बांधकाम क्षेत्रात सुवर्णयुग उवतरेल आणि याचा लाभ ग्राहकांना मिळेल. 

कॉंक्रीट तयार करणे आणि कॉंक्रीटची इमारतीमधील व्यावहारीकता ही अगदी अगदी मानवी शरीरातील हृदय व त्याची कार्ये यांच्याशी तंतोतंत निगडीत आहे. मेडीकलच्या विद्यार्थ्यांना बायपास सर्जरी विषयीचे सायन्स शिकविताना प्रत्यक्षात रुग्णाची शस्त्रक्रिया चालू असतानाचा व्हिडीओ दाखविला जातो त्याचप्रमाणे त्या सर्जरीच्या पूर्तयारीची संपूर्ण माहिती दिली जाते.

अगदी या धर्तीवर स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना साईटवर प्रत्यक्षात कॉंक्रीट चालू असताना कॉंक्रीट हा विषय शिकवला किंवा त्या साईटच्या व्हिडीओ दाखविला तर कॉंक्रीटचे व्हायब्रेशन, कॉंक्रीटच्या वॉटर-सिमेंटचे प्रमाण, तसेच weigh-hatching, slum Tcot इत्यादी विषयी इतंभूत माहिती मिळेल. ह्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना मिळेल. प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकापेक्षा साईटवरचे चित्रीकरण लगेच आत्मसात होते. 

आज मितीला कोणत्याही अभियांत्रिकी कॉलेजमधून स्थापत्य अभियंता ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला Bar Bending schedule, रेट ऍनालेसिस, Quantity survey, Estimation, Valuation Pile concrcte, shutteving, vibvalion of concrat, sechional views इत्यादी विषयी फक्त जुजबी माहिती असते. "सर्व्हे' या विषयी तर काहीच माहिती नसते, Soil Mechanics बद्दल तर काय विचारूच नका आणि याहीपुढे Imgation व Environmetal विषयी काहीच गंध नसतो. म्हणूनच स्थापत्य अभियांत्रिकी हे शास्त्र वर्गात शिकविण्यासारखे कदापी नाही. हे शास्त्र प्रत्येक चालू शासकीय साईटवर क्‍लासरुम बनवून त्याठिकाणीच वर्ग घेतले पाहिजेत किंवा साईटवरचा व्हीडीओ वर्गात दाखविला पाहिजेत. पाईल कॉक्रीटमध्ये व्हायब्रेटर का वापरत नाहीत? Pile Flushing कसे केले जाते? त्याचप्रमाणे पाईल drilling कसे व कधी बंद करावयाचे? uplift pressure म्हणजे काय इत्यादी अनेक शंका नुकतीच पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला पडत असतात. आणि या सर्व शंकेचे निरसन करायचे तर प्राध्यापकांना नाकेनऊ येतात. जर पाईप फाऊंडेशनचे प्रत्यक्ष काम चालू असताना त्याचठिकाणी थेअरी शिकवली तर अशा बालीश शंकेची सरबत्ती प्राध्यापकांवर होणार नाही. हे विषय साईटवर शिकवले तर प्रत्येक पदवीधारकांला बेसिक माहिती एकदम पक्की होईल. याचे कारण तर एकदम सोपे आहे व ते म्हणजे ""चित्रीकरण'' लगेचच लक्षात येते व कायमचे आठवणीत राहाते. 

स्थापत्य अभियंत्या plate load Test ची फक्त जुजबी माहिती असते त्याचप्रमाणे Soil bearing pressure ची अजिबातच माहिती नसते, पण याच्या अगदी विरुद्ध डॉक्‍टरला बीपी व ईसीजीची 100 टक्के माहिती असते. plate load test मध्ये soil bearing pressure मोजले जाते आणि त्या दाबावरून कोणत्याही इमारतीचा व स्ट्रक्‍चरचा पाया ठरविला जातो. अगदी तसेच रक्तदाव व ईसीजीच्या ग्राफवर माणसाची सर्वांगिण चिकित्सा केली जाते. मग सांगा! स्थापत्य अभियंत्याला साईटवर soil bearing pressure कसे मोजायचे याचे साईटवर प्रात्यक्षिक दाखविले जाते काय? तर याचे पण उत्तर "नाही' हेच आहे. डॉक्‍टर माणसाचा रक्तदाब, ईसीजी काढू शकतो, त्याचे वाचण करू शकतो पण आज स्थापत्य अभियंता soil bearing pressure शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक अभियंत्याने Plate load test चे साईटवर प्रात्यक्षिक पण पाहिलेले नसते किंवा केलेले पण नसते. या ठिकाणापासूनच बऱ्याच अभियंत्याची अधोगती सुरू होते. 

स्थापत्य अभियांत्रिकी हे शास्त्र मुळापासूनच शिकण्याचे शास्त्र आहे. याकरीताच ते शास्त्र साईटवरच प्रात्यक्षिकामार्फतच आत्मसात केले पाहिजेत. वैद्यकीय शाखेमध्ये निष्णांत होण्यासाठी जशी एमडी सर्जनची सोय आहे अगदी त्याच धर्तीवर अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सुद्धा एम. ई. व एम. टेक. ची सोय आहे. पण त्याची सुद्धा योग्य ती कार्यवाही प्रात्यक्षिकामार्फत केली जात नाही. यामुळे अभियंत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे थांबविण्यासाठी रामबाण उपाय आहे तो म्हणजे "प्रत्यक्ष साईटवर प्रशिक्षण व शिक्षण.' 

मेडीकल सायन्समध्ये फक्त एका मानवी शरीराचे असंख्य वेगवेगळे सर्जन असतात. उदा Nevo, Heart, Ortho, Eye Spcialist, ENT Surgon, Skin Spcialist, Nephro Surgeon, Dentist, Ortho Dentist, Cosmetic Surgcon, Gynac, तसेच जनरल सर्जन इत्यादी अगदी तसेच बांधकाम शास्त्रात सुद्धा असणे आवश्‍यक आहेत. पण आजमितीला बांधकामशास्त्रामध्ये फक्त Structural Consultant, Architect, MEP इतकेच सर्जन म्हणा किंवा स्पेशालिस्ट म्हणा कार्यरत असतात. पण हे चित्र बदलले पाहिजे. त्यासाठी इमारत बांधकामामध्ये Water proofing Expert, Concrete Expert, Foundation Expert, Water Havvesting Expert, Future maintainance Expert, painting Expert इत्यादी सर्जनची मदत घेतली पाहिजे. 

"सर्व्हे' हा विषय वर्गात शिकविताना जुनी पुराणी "डंपी लेव्हल व थेडोलाईट' याचाच परिचय दिला जातो, पण आजमितीला सर्व्हेमध्ये अद्यावत यंत्रणा आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने Total staion, LIDSRE SURVEY, DRON SURVEY, SCANNER यांचा समावेश होतो पण या सर्व यंत्रणेंची यथोचित माहिती कोणालाच अवगत नसते. "ना प्राध्यापकांना ना विद्यार्थ्यां.' प्रत्येक पेशंटचे वजन, उंची, वय व छाती, नाडी मोजली जाते आणि ते प्रत्येक डॉक्‍टरला मोजता येते, पण आज प्रत्येक स्थापत्य अभियंत्याला Total Station ने लेव्हल घेणे किंवा Point Demarket करणे जमत नाही. जसे वजन, उंची व नाडी माणसाही बाह्य मोजमापे आहेत, अगदी तसेच contour survey व क्षेत्रफळ हे दोन घटक बांधकाम क्षेत्रामध्ये महत्त्वाचे मुद्दे मानले जातात. त्यावरुनच बांधकामाचे प्रत्यक्षात नियोजन केले जाते. याकरीताच "सर्व्हे' हा विषय महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर शिकविण्यापेक्षा प्रत्यक्ष रोडवर, इमारतीच्या कार्यस्थळी, रेल्वे लाईन तसेच स्टेशन, धरण, टनेल, शहरे, कॅनॉल, मेट्रो, मोनो इत्यादी साईटवरच प्रत्यक्ष प्रात्याक्षिकामार्फतच शिकविला पाहिजे आणि प्रत्येक अभियंत्याने त्याचे कार्यस्थळी प्रात्यक्षिक केले पाहिजेत. 

आज मुंबईसारख्या शहरामध्ये जागतिक दर्जाचे प्रकल्प चालू आहेत. त्यामध्ये मेट्रो, रेल, मोनोरेल,आंतरराष्ट्रीय विमानतळ, उत्तुंग इमारती, कॉंक्रीटचे रोड, भुमिगत गटारे, पाणी वाहण्याचे बोगदे, फ्लायओव्हर बुलेट ट्रेन, लेक टॅपिंग व डबल उड्डान पुल इत्यादींचा समावेश होतो. पण आजपर्यंत कोणाच्या नजरेस स्थापत्य अभियांत्रिकी मुले मेट्रो किंवा फ्लाओव्हरच्या साईटवर कॉंक्रीट पोअरींगच्या वेळी किंवा पाईल फाऊंडेशनच्या वेळी प्रात्यक्षिके करत आहेत. याची उदाहरणे डोळ्यासमोर आली आहेत का? याचे पण उत्तर "नाही' हेच आहे. 

आज वर्गामध्ये फक्त कॉंक्रीट मिक्‍सर व त्यांनी लिफ्ट याचेच थेअरीच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. पण गेल्या कित्येक वर्षापूर्वी ट्रान्सिट मिक्‍सर, बॅचिंग प्लेट, रेडी मिक्‍स कॉन्क्रिट, कॉन्क्रिट पंप इत्यादी अद्यावत तंत्र बांधकाम क्षेत्रात आले आहे. पण त्याची साथी ओळख सुद्धा आज कोणत्याही स्थापत्य अभियंत्याला मिळत नाही. इतकी तफावत आज स्थापत्य शास्त्रात पहायला मिळते. एमआयओ, एम 15 व एम 7.5 हे कॉंक्रीट केव्हाच कालबाह्य ठरले आहे आणि वर्गामध्ये आज तेच शिकविले जाते. एम 50, एम 60 आणि एम 100 दर्जाचे सुद्धा कॉंक्रीट मेट्रो तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे. पण ते कसे बनवितात याची काडीमात्र कल्पना आजच्या नव्या स्थापत्य अभियंत्याला तर नाहीच नाही पण त्याचबरोबर जुन्या जाणत्या अनुभवी स्थापत्य अभियंत्यांना सुद्धा नाही. यांची अत्यत खंत वाटते. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पिण्याचे पाणी कॉंक्रीटमध्ये वापरायचे ठरले आहे, पण आज रहिवाशी इमारतीच्या बांधकामासाठी कोणताही प्रकल्प अधिकारी पिण्याचे पाणी वापरत नाहीत आणि याच दोषी तंत्रामुळे आजपर्यंत बांधलेले तसेच पुढे बांधली जाणारी सर्व स्ट्रक्‍चर्स देखभालीसाठी अत्यंत तापदायक तसेच धोकादायक ठरत आहेत. 

मेडीकल सायन्समध्ये पेशंटच्या सर्व चाचण्या करुन त्याचे सर्व रिपोर्ट रुग्णांच्या हवाली केले जातात, पण आज इमारतीमधील प्रत्येक फ्लॅटधारकाकडे आहे का त्याच्या घरची "स्ट्रक्‍चरल डायरी किंवा कुंडली'? आणि हीच मुख्य तफावत इमारतीच्या ऑडीटसाठी आज तापदायक तसेच क्‍लीष्ठ ठरली आहे. 
खरेतर विधात्याकडे डॉक्‍टर आणि स्थापत्य अभियंता यांचा एकच साचा उपलब्ध आहे, पण त्यांची नंतरची जडणघडण म्हणजेच शिक्षणाची पद्धत 
व प्रशिक्षणाची पद्धत यामध्ये खूपच तफावत आढळते. मेडीकल सायन्सच्या धर्तीवर स्थापत्य अभियंत्याला डॉक्‍टरांसारखी प्रात्यक्षिके करण्यास मिळाली तर बांधकाम क्षेत्रात अभूतपूर्व "बांधकाम क्रांती' घडेल. 

स्थापत्य अभियंत्याला "बांधकामाचा डॉक्‍टरच' म्हणणे उचित ठरेल. मेडीकल सायन्स शाखेचे तंत्र व प्रात्यक्षिकांच्या पद्धतीद्वारे शिकवण्याची कला स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रामध्ये अवलंबणे अत्यंत आवश्‍यक आहे. एक डॉक्‍टर त्यांच्या शैक्षणिक कालखंडामध्ये असंख्य पेशंटची तपासणी तसेच त्यांच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करत असतो किंवा बघत असतो. पण एक स्थापत्य अभियंता त्यांच्या शैक्षणिक कालखंडामध्ये एकाही स्ट्रक्‍चरचे प्रत्यक्ष चालू बांधकाम पाहत नाही किंवा त्यातील कॉंक्रीट कसे केले जाते किंवा त्याचे फाऊंडेशन काय आहे, यांची देखील सखोल माहिती करून घेत नाही. हीच तफावत ह्या दोन भिन्न सायन्समध्ये आपणास मुख्यत्वे आढळते. "प्रात्यक्षिकासोबत शिक्षण व प्रशिक्षण' हीच पद्धत आज योग्य आहे आणि ह्याच पद्धतीचा आज स्थापत्य शास्त्रास अवलंब केला तर निष्णांत डॉक्‍टरांसारखे निष्णांत स्थापत्य अभियंते घडतील. 

खरे पाहता छत्रपती शिवाजीराजे हे एक निष्णांत हाडाचे स्थापत्य अभियंता होते. त्यांनी बांधलेले बरेच गड व किल्ले आज 400 वर्षानंतरसुद्धा सुस्थितीत आहेत. पण आज बांधलेल्या इमारती जेमतेम मेताकुटीला येऊन 50 वर्षे तग धरतात. छत्रपतींची मार्गदर्शक नजर स्थापत्य अभियांत्रिकीच्या सर्वच विषयावर सखोल अभ्यास करत होती. म्हणूनच छत्रपतींचे बरेच किल्ले तसेच राजधानी आजच्या आदर्श शहरासारखे होते. गडावरील पिण्याच्या पाण्याची तसेच इतर वापराच्या पाण्याची व्यवस्था शिवाजी महाराजांनी अत्यंत विचारपूर्वक निसर्गांच्या ऋतुचक्राच्या सखोल अभ्यासाअंती केली होती. म्हणूनच स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासामध्ये बांधकामाची स्टॅबिलीटी कशी असावी, याबद्दलचे शिक्षण व प्रात्यक्षिके गडकिल्ल्यावरच जाऊन दिले पाहिजेत. यांचा खूप फायदा अभियंत्यांना मिळेल याची मला खात्री वाटते. धरणाची माहिती धरणावरच दिली पाहिजे. विमानतळाची माहिती विमानतळावरच दिली पाहिजे. टनेलची माहिती टनेलच्या साईटवरच दिली पाहिजेत. उत्तुंग इमारतीची माहिती इमारत बांधकाम चालू असतानाच कार्यस्थळी दिली पाहिजेत तरच निष्णांत आणि जाणते स्थापत्य अभियंते तयार होतील. 

शिक्षणमंत्र्यांनी आता असा हा बदल घडवून आणला पाहिजे, नाहीतर एकीकडे यांत्रिकी युगामध्ये "क्रांती' घडत आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणामध्ये अधोगती प्रारंभ करत आहे याचे विदारक चित्र नजिकच्या काळातच निदर्शनास येईल. म्हणूनच त्वरित त्याच्यावर उपाय योजले पाहिजेत. चांगले निष्णांत जाणते स्थापत्य अभियंते घडविण्यासाठी मेडीकल सायन्सच्या धर्तीवर "प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका' कालबाह्य ठरवून "कार्यपत्रिका' व कार्यपुस्तिका हातात घेली पाहिजे. "प्रात्यक्षिकामार्फतच शिक्षण व प्रशिक्षण' ह्याच पद्धतीचा अवलंब शंभर टक्के केला पाहिजे. आज मुंबईमध्ये सात मजली इमारती कालबाह्य ठरलेल्या आहेत आणि त्यांच्या जागी आज उत्तुंग टोलेजंग इमारती जन्माला येत आहेत. आंतरराष्ट्रीय शहरामध्ये साधे रस्ते कालबाह्य ठरून त्यांच्यावर मोनो मेट्रोसारखे प्रकल्प उदयास आलेले आहेत. बुलेट ट्रेन, नद्या जोडणी प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत.म्हणूनच स्थापत्य अभियंता हा या सर्व प्रकल्पाचा "महत्त्वाचा भाग' किंवा "कणा' आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खरोखरच स्थापत्य अभियंता देशाचा "तारणहार' ठरू शकतो. 

( लेखक स्थापत्य अभियंता आहेत) 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com