विवेकनिष्ठ शिक्षण - उच्च शिक्षणाचा नवीन आयाम 

विवेकनिष्ठ शिक्षण - उच्च शिक्षणाचा नवीन आयाम 

शिक्षण प्रक्रियेत प्रामुख्याने बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक या तीन क्षेत्रानुसार विद्यार्थांचा सर्वागिण विकास करण्यावर भर द्यावा, असे अनेक शिक्षण आयोगांने आपल्या शिफारशीमध्ये नमूद केले आहे. पण आजची परिस्थिती बघितली तर बोधात्मक व क्रियात्मक क्षेत्राचाच विकास करण्यावर शिक्षक व पालक यांचा अधिक भर असलेला दिसून येतो. यातून विद्यार्थांच्या भावनिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. हे महाराष्ट्र शासनाने मानसशास्त्रीय शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या नविन अद्यादेशाद्वारे निश्‍चित सिद्ध होत आहे. 

शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वागीण विकास होय. यामध्ये बौद्धिक, भावनिक, क्रियात्मक, सामाजिक, शारीरिक विकास घडत असतो. यामधील बौद्धिक व भावनिक विकास हा व्यक्तीच्या विवेकनिष्ठ किंवा अविवेकनिष्ठ विचारांवर अवलंबून असतो. विवेकनिष्ठ विचार हा शिक्षणाची इतर ध्येय साध्य करण्यासाठी गरजेचा आहे. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन या सर्वांना योग्य दिशा देण्यासाठी या विवेकनिष्ठ विचारांची गरज आहे. विद्यार्थांना अशा विवेकनिष्ठ विचारातून योग्य दिशा मिळाल्यानेच त्यांना भावनिक व मानसिक त्रासातून दूर करता येईल. यामुळे समाजाचा व राष्ट्राचा विकास साधता येईल. 

विवेकनिष्ठ विचार -
अल्बर्ट एलिस यांचे मते आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांपेक्षाही त्या घटनांचा आपण जो अर्थ लावत असतो व त्याचे काही मूल्यमापन करत असतो, त्यानुसार आपल्या भावना व वर्तन घडत असते त्यालाच विवेकनिष्ठ विचार म्हणतात. विवेकनिष्ठ विचार हे कृतीयुक्त, बोधात्मक व वास्तविक विचार असतात. तसेच ते तर्कशुद्ध, ध्येय सुनियोजीत, लवचिक व वास्तववादी असतात. 

विवेकनिष्ठ शिक्षण - 
अविवेकनिष्ठ विचारांच्या जागी विवेकनिष्ठ विचार रुजवून त्यांना विवेकनिष्ठ विचारांचे प्रशिक्षण देवून त्यांची भावनिक अस्वस्थता दूर करु शकतो. यासाठी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी विवेकनिष्ठ मानोसपचाराचे उपयोजन वेगवेगळया स्तरावर, घटनांवर, तसेच इतर मानसिक, भावनिक प्रश्‍न दूर करण्यासाठी केले आहे. यामधील एक म्हणजे विवेकनिष्ठ शिक्षण होय. Rational Emotive Education (REE) या प्रयोगामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांमधील विवेकनिष्ठ विचार विकसनासाठी अनेक उपक्रम तयार करुन विद्यार्थांमध्ये कशाप्रकारे विवेकनिष्ठ विचार विकसित होतात. हे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे. याचा वापर आपणास अभ्यासक्रमामध्ये, वर्ग अध्यापणामध्ये कार्यकृती देवून करता येईल. विद्यार्थांमध्ये विवेकनिष्ठ विचार रुजवण्यास त्याची निश्‍चितच मदत होईल. 

विवेकनिष्ठ शिक्षणाची गरज -
विद्यार्थी स्तरावर मनात अनेक भावनिक कलह सुरु असतात. यातूनच ते विवेकनिष्ठ अथवा अविवेकनिष्ठ दृष्टीकोन जोपासतात. विद्यार्थांच्या मनात आत्मघातकी भावना निर्माण करणाऱ्या अविवेकनिष्ठ विचारांची जाणीव त्यांना करुन देवून त्यांच उच्चाटन करणे, स्वतःमधल्या गुणदोषासकट स्वतःचा स्विकार करणे, इतरांशी सलोख्याचे संबध राखणे आणि मार्गात येणाऱ्या अडचणींशी आत्मविश्‍वासपूर्वक मुकाबला करणे यासाठी विवेकनिष्ठ विचारच मदत करत असतात त्यामुळे त्याच्यामधील अशा विवेकनिष्ठ विचारांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. 

विवेकनिष्ठ शिक्षण हे विवेकनिष्ठ विचार पद्धतीचे माध्यम वा प्रक्रियात्मक साधन आहे. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती ही भावनिक असुंतलनावर उपाय निर्माण करणारी परंतू सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या मानसशास्त्रीय आणि इतर वर्तनवादी पद्धतीपेक्षा वेगळी उपचार पद्धती आहे. वेगवेगळया क्‍लुप्त्या, तंत्रे, योजना यांचा वापर करुन मानवामध्ये मुळात निर्माण असलेल्या भिन्न विचारप्रक्रियेचा उपयोग करुन विचारशैली तसेच वर्तनशैली यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणून भावनिक संतुलन कायम राखण्यास मदत करते. 

अल्बर्ट एलिस यांचे एबीसी प्रतिमानः 
डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मांडलेल्या एबीसी प्रतिमानानुसार विचार, भावना आणि वर्तन ही वेगवेगळी कार्ये नाहीत तर एकमेकांवर आधारीत कार्ये आहेत. एबीसी प्रतिमान हा एक आशावादी दृष्टीकोन आहे की जो व्यक्तीच्या स्वागतामधून निर्माण होणारा ताण तसेच स्वतःमध्ये असणारी परिक्षण क्षमता यावर भाष्य करतो हा दृष्टीकोन मनातील चिंता, नैराश्‍य, राग इत्यादी भावनांचे परीक्षण आणि त्याच्यावर उपचारात्मक योजना करुन अविवेकी वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतो. मुळात अविवेकी वर्तन हे आपल्या अविवेकी धारणामुळे घडत असते. या धारणांची निर्मिती आपण एखाद्या घटनेकडे ज्या दृष्टीकोनातून पाहतो यावरुन तयार होत असते. मुळात आपला दृष्टीकोनच अविवेकी असतो, हे लक्षात घेतले पाहीजे. 

विवेकनिष्ठ शिक्षणाचे स्वरुप -
पदवी स्तरावरील विद्यार्थी हे जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आलेले असतात उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्यासाठी ते तयार असतात. अशावेळी त्यांना विवेकनिष्ठ विचारांची गरज लक्षात घेवून त्यांना या स्तरावरच विवेकनिष्ठ शिक्षणाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होवू शकते. यासाठी विविध शैक्षणिक तंत्रे, क्‍लुप्त्या, अध्ययन अनुभव, भूमिका पालन, प्रबलन, स्वाध्याय इत्यादी गोष्टीचा वापर करता येतो. 
एकूणच आपल्या शिक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थांचा सर्वागीण विकास हे साध्य करावयाचे असल्यास बोधात्मक व क्रियात्मक शिक्षणाकडे शिक्षक व पालकांचे जितके लक्ष आहे. तितकेच लक्ष मुलांच्या भावात्मक क्षेत्राकडे असण्याची गरज अधोरेखित होत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी विवेकनिष्ठ शिक्षण हा शिक्षण प्रक्रियेचा नवा आयाम म्हणून पुढे येत आहे. अर्थात गरज आहे ती विवेकनिष्ठ शिक्षण प्रकियेचे स्वरुप लक्षात घेवून शिक्षकांनी त्याचे आयोजन करण्याची त्याचप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी यांनी यामध्ये सहभागी होवून कृती कराव्यात जेणे करुन या विवेकनिष्ठ शिक्षण प्रक्रियेतून विद्यार्थांस आपल्या विवेकनिष्ठ विचारसरणीचा उपयोग आपल्या जीवनाची ध्येय साकारण्यसाठी करता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com