अखंड प्रबोधनाचा जागर...

प्रा. रवींद्र ढाले
शनिवार, 14 एप्रिल 2018

सांगलीत १९७५ मध्ये स्थापन झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचा प्रबोधनाचा जागर अव्याहतपणे सुरू आहे. सांगलीच्या ऐतिहासिक, वैचारिक, वैभवशाली परंपरेची स्वाभिमानी विचारधारा प्रखर करणारे मंडळ आपल्या कार्यानेच लौकिकप्राप्त बनले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वाटचालीचा आढावा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक एकत्रितपणे जयंती साजरी करणारे एकमेव मंडळ, अशी पश्‍चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. वैचारिक, स्वाभिमानाचे अधिष्ठान आहे. सन १९७५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळ म्हणून स्थापना झाली. डी. एल. थोरात, एम. एच. पद्माळकर, शंकरराव थोरात, भगवान जगन्नाथ भिसे, चिंचणीचे माने आणि ए. सी. बनसोडे यांचा सहभाग होता.

आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून हे एकत्र आले. आज त्याचे रूप ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ’ असे भव्य दिव्य झाले. नंतरच्या काळात प्रा. मोहन साबळे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्यासह नेते व कार्यकर्त्यांनी मंडळाशी स्वतःला जोडून घेतले. सर्वांनी वैचारिक, सांस्कृतिक चळवळीचा चेहरा दिला. आज मंडळ पिंपळवृक्ष बनले आहे.
दरवर्षी नवनवीन कार्यकर्ते जोडले जातात.

अनेक भागातील छोटी मोठी मंडळे या पिंपळवृक्षाखाली आता सामावली आहेत. परिवर्तनाच्या विचारांचा जागर, प्रबोधन चळवळीला दिशा देणारे कार्य सुरू आहे. दरवर्षी १३ एप्रिलला रात्री एस. टी. स्टॅंडजवळ  ‘भीमांगण’ परिसरात पूर्णाकृती पुतळ्यास रात्री १२ वाजता पुष्पहार अर्पण केला जातो. त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादनासाठी हजारो स्त्री-पुरुष एकत्र जमतात. शांती आणि समतेचा संदेश देतात.

१४ एप्रिलची ‘सोनेरी सकाळ’ तर वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय. पहाटे ६ वाजता सांगलीवाडीच्या समता चौकातून प्रभातफेरी सुरू होते. प्रभातफेरीची संकल्पना मंडळाचीच. हजारोंच्या उपस्थितीत सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादन केले जाते. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असतो. एकदा तर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

आंबेडकरी चळवळीत कार्यरत प्रत्येकाच्या अंत:करणात या घटना ताज्या, टवटवीत आहेत. त्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.
आंबेडकरी चळवळ प्रयोगशाळा आहे. विचारांची पेरणी करण्याची प्रेरणा जुन्या, जाणत्यांनी तरुणांना दिली. जयंती महोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य करते आहे. त्यातून नव्या दमाचे, संकल्पनेचे, सम्यक विचारांचे कार्यकर्ते तयार होताहेत. महाराष्ट्रातील अनेक वक्‍त्यांना प्रबोधनासाठी बोलावले गेले.

प्रामुख्याने डॉ. एम. डी. नलावडे, प्रा. लक्ष्मण माने, प्रा. अरुण कांबळे, डॉ. टी. एस. पाटील, बबन कांबळे, प्रतिमा परदेशी, प्रा. सुषमाताई अंधारे, प्रा. श्रीमंत कोकाटे, डॉ. नंदा पारेकर, गंगाधर बनभरे, डॉ. कृष्णा किरवले, प्रा. रामनाथ चव्हाण, सत्यपाल महाराज, प्राचार्य अरुण गाडे अशा अनेकांनी या मंचावर विचारांचा जागर केला. ४३ वर्षे पक्ष संघटना, गट-तट विसरून लोक मंडळाच्या झेंड्याखाली एकत्र येताहेत. संवादाला प्राधान्य दिले  जाते. ना वाद, ना संघर्ष. मंडळाची संपत्ती आणि सुंदरता हीच आहे. नवतरुणांनी उत्साहाला वैचारिक आणि क्रांतिकारी बदलाच्या सम्यक मार्गावर आणण्यासाठी कृती प्रवण व्हावे हीच अपेक्षा.

मंडळ वर्षभर बुद्ध जयंती, छत्रपती शाहू महाराज जयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, छत्रपती शिवजयंती, धम्म चक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन, रोहिदास जयंतीच्या निमित्ताने विविध स्पर्धा उपक्रम राबवत असते. त्यात  मुस्लिम समाज, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाजातील सामाजिक संघटनाचा सहभाग असतो. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, दीपस्तंभ सांस्कृतिक संघ, श्रावस्ती विहार, डॉ. आंबेडकर वाचनालय, सिद्धार्थ अकॅडमी अशा अनेक संस्थांचा हा एकत्रित अविष्कार असतो.

Web Title: Esakal Citizen Journalism Prof. Ravindra Dhale article