माझ्या बानं मरणाला दावं लावलं.... 

 रवींद्र शिवाजी गुरव
सोमवार, 18 जून 2018

ती दिवाळी २०१६सालची. लक्ष्मीपूजनाचा तो दिवस. माझ्या आबाला होय बाबाला रक्ताच्या उलट्या झाल्या. गाव मदतीला धावलं. मीही तीन दवाखाने पालथी घातले; आबाला कवेत मारून.. सगळ्यांच्या मदतीनं. "काय झालय सांगा? खरं...."

ती दिवाळी २०१६सालची. लक्ष्मीपूजनाचा तो दिवस. माझ्या आबाला होय बाबाला रक्ताच्या उलट्या झाल्या. गाव मदतीला धावलं. मीही तीन दवाखाने पालथी घातले; आबाला कवेत मारून.. सगळ्यांच्या मदतीनं. "काय झालय सांगा? खरं...."

"लेका, मला काही नाही झालय... लेका... रक्ताच्या उलट्या तेवढ्या..." आबा सुदीवर येत पुटपुटला. दुपारीच श्रुती लेकीची रिंग आर्यननं कानफाडात मारून पाडली होती. ती हुडीकतानं माझ्या पायाखाली अस्सल नाग आलेला. मी वरडून टाणक्यान बाजूला झालो. आईला सांगितलं आबाला सांगू नको. आबा तवा घराकडं रिंगच हुडकाय गेलेला. खरं साप असलेल्या ठिकाणी किटणाच्या हो शेणकीच्या मागं आबा अचानक जाईल, सापावर पाय बिय पडल आणि....तसं तेचं नि सापाचं हडवैरच...जसं साप मुंगसाचं वैर तसं...आबाला एकदा साप चावल्यापासनं सापाला जिवंत न सोडण्याचा विडाच उचललाय जणू....चावलेल्या अवस्थेत सापाला कापून टोपीत घालून आणलेला. तवा चौगल्यांची कल्पाआक्का गावच्यापुढं धावून आलेली. एकदा तर आबान बूट घातलेल्या पायाणच नागीण चिखलून मारली होती...मळणीच्या भातात ती होती.

ताडपदरी उघडून भात वाळत घालायला लागला ताव; तर त्यातनं ती बाय बाहेर पडली. मी ताडपदरी वडून तिला आत ढकलत होतो. पळता.. पळता पाडत होतो...आर्यन आबाच्या पायात 'कायते..कायते?' करीत घुटमळत होता ...आबा पायानं तिला तुडवून मारत होता... पोरा बिरासनी कायतरी करील ..व्हईल म्हणून जिवाव उदार झालेला...जीवघेणा प्रसंग होता

तो..बोबडीच वळलेली सगळ्यांची..कुणालाच काय धड सुधरत नव्हतं ...त्या नागिणीला मारून गप बसला नाही. तिला बाभळीवर व्हलपटली..वाळतच घातली. आज आमच्या माघारी तोच दिसलेला साप आबाला चावला की आणखी काय? अशातच शेतकरी आत्महत्येची सगळीकडं चर्चा...नाना प्रश्नच थैमान घालत होते...त्याच अवस्थेत बाला ३५ मिनिटात कोल्हापूरला घेऊन जावं लागलं.

अतिदक्षता विभागात बा गेला; नि मी त्या दाराच्या फटीतनं आत बघत राहिलो. बाचा एक डोळा माझ्याकडं त्याच फटीतनं बघत होता..."लेका मरणाला दावं लावीण" बाचं वाक्य संगतीला होतं. अखेरची घटका मोजत होता तो. मी त्याची बाहेर वाट बघत होतो. दुसरीकडं नातवंडं आबान फटाकड्या कपाटात ठेवल्यात म्हणून त्याची  वाट बघत होती...आईसकट घरही तसंच..मरणकळा सोसल्या चार दिवसात आयसीयुच्या दारात बसून. आईला दोनदा सांगावा धाडला, "आई, आबाचं काय खरं नाही बघ." ...शासनाच्या १०८ रूग्णवाहिकेसह सगळ्या नातेवाईक, मित्र आणि  गावकऱ्यांनी मदत केली. ती नावांची यादी खूप मोठी आहे. मनात कोरून ठेवली आहे. मला त्या सर्वांच्या उपकारातच जगायचं आहे. नाही परतफेड करता येणार त्याची. त्यावेळी संपलं सगळं गावकडच्या ओढीचं एक पान गळलं; असं वाटलं नि काय आश्चर्य आबा आयसीयुतून बाहेर पडला; ते चक्क मरणाला दावं लावून..."

पोराला माझ्या लय तरास झाला. लय शिव्या दिल्या दवाखान्यातनं बाहेर काढ म्हणून..." तो घरादाराला आनंदाश्रुंनी हसवून सांगत होता. बा जिवंत बघून माझा तरास कवाच पळाला. तो समोर  हाय यावर विश्वासच बसत नव्हता. आज घडीला आबा सुखरूप आहे ...तरी मनात भिती कायमच...किती दु:ख झालं होतं ते...मोजमाप न करता येणारं..हेच नव्हं तर आबाची आई गेली, बाबा गेला, तीन भनी गेल्या, थोरला भाऊ गेला, एकदा साप चावला, दोनदा कुत्री चावली. कोर्ट कचेरी, कटकारंस्थानं आरोप सोसलं. कर्ज उपसत राहिला. कर्जात जगत राहिला. फेडत राहिला. पैशाच्या दुष्काळात कष्ट उपसत राहिला. खरं खचला नाही हा बापगडी कशालाच. येतील ती सगळी संकटं हेपलत...कोलवत मरणाला दावं लावणारा जगाला जगायचा धडा शिकवणारा हा माझा बाप माझ्यासाठी आयडॉल.. हिरो..ठरला...घरचा पोशिंदाच ठरला. फादर्स डेच्या निमित्तानं त्याच्या जिद्दिला हा स्मरणातलाच शब्द सलाम उजाळा.
 

Web Title: Esakal Citizen Journalism Ravindra Gurav article