सांगलीवाडीत खेळाचे मैदान, मंडई हवी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

चला, बनू या सिटिझन जर्नालिस्ट...

सकाळ संवाद Android ॲप आजच मोबाईलवर डाउनलोड करा

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा

www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp - 9130088459 

सकाळ संवाद उपक्रमांतर्गत येथील श्री दर्शन मंगल कार्यालयात वाडीतील तीन विद्यमान नगरसेवकांसमवेत जागृत  नागरिकांनी नागरी सुविधा व समस्यांबाबत मते मांडली. नगरसेवक दिलीप पाटील, पांडुरंग भिसे आणि वंदना कदम यांनी पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. चर्चेअंती पुढे आलेल्या प्रमुख अपेक्षा - खेळाचे मैदान विकसित करावे. महिलांसाठी व्यायामशाळा असावी, कचरा डेपोस कुंपण भिंत उभी करून तेथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण करूनच नदीत सोडावे, पेठ रस्त्यावरील स्पीड ब्रेकर शास्त्रीय पद्धतीचे असावेत. सांगलीवाडीचे गावपण सरून एका नियोजित शहराचे स्वरुप येण्यासाठी गुंठेवारी भागाकडे लक्ष दिले पाहिजे अशा अनेक अपेक्षा व्यक्त केल्या.

नगरसेवक म्हणतात.
दिलीप पाटील ः सांगलीवाडीत पाच वर्षांत सुमारे नऊ कोटींची विकासकामे झाली आहेत. दिलेल्या अाश्‍वासनांपैकी जवळपास ८० टक्के कामे पूर्ण झाली. सांगलीवाडीतील प्रत्येक गल्लीत आज पुरेसे आणि मुबलक पाणी मिळू लागले आहे. ही आमची सर्वात मोठी कामगिरी आहे.

पांडुरंग भिसे ः आम्ही तीनही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नवखे होतो. मात्र कामांमध्ये आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही. काही कामांच्या फायली अडल्या आहेत त्या प्रशासनाने कोंडी केल्यानेच. मात्र आम्ही यापुढेही कामाचा पाठपुरावा करीत राहू.

वंदना कदम ः मध्यवर्ती बाजारपेठेच्या ठिकाणी स्वच्छतागृहे झाली. महिलांसाठीही ती होणार आहेत. वाडीतील कोणतीही नागरिकांच्या समस्या सोडवणुकीसाठी आम्ही पाच वर्षे सतत उपलब्ध होतो. ड्रेनेज योजनेचे काम पूर्ण झाले नाही ही उणीव आहे; मात्र वाडीच्या इतिहासात या पाच वर्षांत सर्वाधिक कामे झाली आहेत.  

विलास हरुगुडे : वाडीतील पालिका शाळांची दयनीय अवस्था बघवत  नाही. कृष्णा नदीचे प्रदूषण ही आपली गंभीर चूक असून पात्रात मिसळणारे सांडपाणी तत्काळ रोखले पाहिजे. येथील पंपिग स्टेशन बंद पडले आहे. महापालिका नागरिकांना ज्या सेवा देण्यास बांधील आहे त्याबाबत अनास्था दिसते. नगरसेवकांनी पुढे येऊन लोकांना विधायक कामांसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. पूर्वी १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला लोक स्वतःहून रस्ते साफ करायचे. ही जाणीव आता निर्माण झाली पाहिजे.

दत्ता पाटील : वाडीत काही दिवसांपूर्वी पुठ्ठ्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीतून धडा घेऊन विस्तारित भागासाठी इथे अग्निशमन दलाचे उपकेंद्र सुरू करावे. शाळा क्रमांक नऊ मागील जागेत खेळाचे मैदान तयार होऊ शकते. कचरा डेपोमुळे भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव होत असून त्याकडे लक्ष द्यावे. 

ॲड. रघुनाथ कोकाटे : बायपास रस्त्याला बाजूपट्ट्या न केल्याने अनेक अपघात होत आहेत. शहर बस वाहतुकीचे थांबे केले पाहिजेत.  रेन ट्री ऐवजी पिंपळ, कडुनिंबाचीच झाडे लावण्याची  सक्ती केली पाहिजे. आयर्विन पुलाच्या डागडुजीकडे लक्ष दिले पाहिजे. 

विष्णू पाटील : गेली साडेचार वर्षे ड्रेनेज कामाचे भिजत घोंगडे पडले आहे. पंपिग स्टेशनची जागाच निश्‍चित नव्हती तर रस्ते खोदलेच कशासाठी? मध्यंतरी अळ्यामिश्रित पाणी पुरवठ्यांमुळे पसरलेली गॅस्ट्रोची साथ नगरसेवकांना भूषणावह नाही.  

शाहीर पाटील : सांगलीवाडीचे राजकारण जातीपातीच्या चौकटीतून बाहेर पडले पाहिजे. काम करणाऱ्याच्या मागे उभे राहिले  पाहिजे. सलग पाच वर्षे नागरिकांना दबाव केवळ नगरसेवकांवर नव्हे तर प्रशासनावरही हवा.  

राजेंद्र कुंभार : पाच वर्षांत झालेली कामे समाधानकारक आहेत.  वाडीतील सर्व स्मशानभूमींमध्ये निवारा शेडची उभारणी झाली आहे. रस्त्यावर भरणारा बाजार स्थलांतराचा प्रश्‍न सोडवला पाहिजे.

तुकाराम भिसे : ड्रेनेज प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेली अनेक वर्षे माझ्या शेतात थेट सांडपाणी सोडले जाते.  
शंकर पवार : पतंगराव कदम महाविद्यालयासमोरील स्पीड ब्रेकर शास्त्रोक्त पद्धतीने नाहीत. त्यामुळे इथे नित्य अपघात होतात. नव्याने स्पीड ब्रेकर व्हावेत. आष्टा नगरपालिकेने शासननिधीतून सुसज्ज बाजारपेठ तयार केली आहे. आपल्याला का ते शक्‍य नाही. 

सुनील कदम : स्मशानभूमीच्या परिसरातही स्वच्छतागृहे झाली पाहिजेत. चावडीजवळ महिला स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत.

बजरंग फडतरे : बहुतेक कामांचा निपटारा झाला आहे. युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी कामे झाली पाहिजेत.  

रेंगाळलेले ड्रेनेज
रेंगाळलेल्या ड्रेनेज योजनेचा प्रश्‍न सांगलीवाडीकरांसाठी संवेदनशील असल्याचे चर्चेतून पुढे आले. विष्णू पाटील यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. त्यांनी जोतिबा मंदिराजवळील पंपिग स्टेशनची जागा निश्‍चित नव्हती तर रस्ते का खोदले असा थेट सवाल केला. त्यावर आता हा प्रश्‍न मार्गी लागला असून  चव्हाण कन्या शाळेजवळील जागा निश्‍चित झाल्याचे नगसेवक वंदना कदम यांनी सांगितले. शाळेजवळ ड्रेनेज करणे योग्य आहे का या प्रश्‍नावर त्यांनी प्रशासनाने ही जागा सोयीची असून तक्रार असेल तर तुम्ही प्रशासनाकडे करा असे सुचवले.

Web Title: Esakal Citizen Journalism Sangli readers Sanwad