ड्रेनेज, पाण्यासाठीच कुपवाडचा संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सांगली आणि मिरज या दोन विधानसभा मतदार संघात कुपवाड विभागले गेले आहे. ही विभागणी  महापालिकेच्या मध्यावर वसलेल्या औद्योगिक नगरी कुपवाडच्या विकासाबाबतही आहे. ग्रामपंचायत त्यानंतर अल्पमुदतीची नगरपालिका आणि त्यानंतर महापालिकेत समावेश झालेल्या कुपवाडसाठी अद्यापही स्वतंत्र ड्रेनेज योजनाच नाही. नागरीकरणाची सुरवातच जिथून होते ते ड्रेनेज नसणे ही बाब शहर म्हणून स्वतःला महापालिका म्हणवून घेणे भूषणावह नक्कीच नाही. सकाळ संवाद उपक्रमात हे शल्य प्रकर्षाने अधोरेखित झाले. ७५ टक्के गुंठेवारीने व्यापलेल्या भागाचा विकासाचे आव्हान पेलण्यासाठी कुपवाडकर नागरिक आणि नगरसेवकांनी दिशा ठेवून पाठपुरावा केला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली. 

नगरसेवक म्हणतात
कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी असल्याने भाजीमंडई, मैदानासाठी जागा नाही. आरक्षित जागांच्या विकासासाठी नागरिकांचा 
रेटा हवा.
- शेडजी मोहिते, विरोधी पक्षनेता.

विकासकामातील सर्वात मोठा अडसर प्रशासच आहे. पगारासाठीच सारा खर्च होत आहे. गेल्या दोन दशकात कुपवाड बदलले आहे. ते लोकांनी लक्षात घ्यावे. हा विकास परिपूर्ण आहे, असे म्हणणार नाही, मात्र सर्वच नगरसेवकांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत.
- धनपाल खोत, नगरसेवक

पदाची संधी मिळाल्यानंतर अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवल्या.  पक्षी वाचवा मोहीम असो की  फुलपाखरु उद्यान. सकाळने बळ दिले. भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका घेतली. त्यामुळेच अनेक भानगडींना ब्रेक लागला. सध्या पुढे आणलेली ड्रेनेज योजना फसवी आहे. जनतेचे विश्‍वस्त म्हणून 
काम केले.
- विजय घाडगे, उपमहापौर

उपमहापौर पदी आल्यानंतर इथले विभागीय कार्यालय पुर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि तडीस नेला. शहरातील उद्यान, चौक सुशोभीकरणाला प्राधान्य दिले. ड्रेनेज योजनेचे सर्वाधिकार आयुक्तांकडे दिले आहेत आम्ही त्यात कोणतीही कसर केलेली नाही. - प्रशांत पाटील, नगरसेवक
कुपवाडमधील तरुणांसाठी क्रीडांगणाची व्यवस्था नव्हती. त्यासाठी पाठपुरावा केले. त्यामुळेच मिनी स्टेडियम मंजूर झाले. मुख्य चौकात एलईडी दिवे बसवल्याने शहर उजळले आहे.
- गजानन मगदूम, नगरसेवक

नागरिक म्हणतात
कुपवाड परिसरातील अनेक भूखंड ढापले जाताहेत. सर्व्हे क्रमांक ३१०/ब ११ हजार चौरस फुटचा भूखंडा सध्या हडपण्याच्या तयारीत आहेत. त्यावर नगरसेवक व प्रशासनाने नजर ठेवली पाहिजे. प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या पाठिशीच नागरिक राहतील.- दिनकरराव फाळके

कुपवाड अजूनही ग्रामपंचायतच आहे अशी इथल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता आहे. औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुल उभारण्याची गरज आहे. तसेच भागात प्रशस्त भाजी मंडई, धोबी कट्टीही उभारावा. विकास आराखड्यातील डीपी रस्त्यांसाठी नगरसेवकांनी खमकी भूमिका हवी. बांधकाम विभागाने केलेले रस्ते पालिकेने ताब्यात घेत नाही. त्यांची देखभाल होत नाही.
- अण्णासाहेब उपाध्ये

अंत्यविधीच्या साहित्यांसाठी कुपवाडकरांना सांगलीत जावे लागते. त्यावर आवाज उठवूनही दुर्लक्ष आहे. कापसे प्लॅट परिसरातील गटारीचे काम निकृष्ठ झाले आहे. सुधार समितीने यावर आवाज उठवला होता. तरीही त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही.
- सचिन चोपडे 

कुपवाडसाठी व्यापारी संकुल, भाजी मंडई गरजेची आहे. गावपण गेले पाहिजे. शहर व्हावे.’’

- राजेंद्र पवार, व्यापारी. 

कापसे प्लॉटमधील लोक आजही नरकयातना भोगत आहेत. तसेच काही भागात विना मीटर पाणी पुरवठा होतो. याला प्रशासन जबाबदार आहे. हा सारा भोंगळ कारभार आहे.
- शांताराम मोरे 

कुपवाडसाठी रात्री शहरी बस सेवा नाही. शहरात सुसज्ज  बसस्थानकही नाही. कुपवाडमध्ये नवे प्रशासकीय कार्यालय असूनही पाणीपट्टी भरण्यासाठी मुख्यालयात जावे लागते. या इमारतीचा उपयोग काय? ’’- अभिजित कोल्हापुरे  
महाआघाडीच्या काळात ड्रेनेजची योजना मंजूर झाली होती. परंतू  सत्ताधाऱ्यांनी स्वार्थापोटी ती रखडवली. बेकायदेशीर ठराव घुसडणे हाच उद्योग आहे.  शहरातील भूखंड कोणी ढापले याची चौकशी व्हावी.’’ 
- किरण सूर्यवंशी 

Web Title: Esakal Citizen Journalism Sangli readers Sanwad