पूरपट्टा-विस्तारित परिसर विकासापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

शहरातील पूरपट्टा आणि इतर विस्तारित भागाचा प्रभाग १२ अस्तित्वात आला आहे. माधवनगर जकात नाक्‍यापासून जुना बुधगाव रस्तामार्गे मगरमच्छ कॉलनीपर्यंत सर्वाधिक विस्तारित भाग येतो. प्रत्येक भागात निरनिराळ्या समस्या भेडसावतात. २० वर्षांत प्रभाग विकासापासून वंचितच आहे. नदीशेजारी असून दत्तनगर-काकानगर आणि इतर परिसरात पाणी प्रश्‍न अचानक गंभीर बनतो. गुंठेवारी भाग अधिक असून तेथे नियमितीकरण व विकास बाकी आहे. सार्वजनिक शौचालये नाहीत. खुले भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. विस्तारित भागात ड्रेनेज, गटारी नाहीत. कामगार आणि नोकरदार वर्ग अधिक आहे. वखारभागाचा समावेश झाला आहे. तेथेही समस्या आहेत. समस्यांचे आगर असलेल्या प्रभागाचा विकास करण्याचे आव्हान महापालिका, नगरसेवक आणि लोकांच्यासमोर असल्याचे ‘सकाळ’ संवादातून स्पष्ट झाले. 

गटारी आणि रस्त्याची कामे बऱ्यापैकी झाली आहेत. भाजीमंडईत महिला स्वच्छतागृह उभारले. महापालिकेची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. काही कामे शिल्लक राहिल्याची खंत वाटते. आयुक्तांनी काही कामाच्या फायलीवर सह्या नाहीत. प्रभागात पाणी प्रश्‍न अचानक उद्‌भवतो. पाण्याची वेळ निश्‍चित केली जाईल.
- नगरसेविका सौ. आशा शिंदे

प्रभागात अनेक नागरी समस्या आहेत. खुले भूखंड कोठे आहेत? ते अनेकांना माहीत नाही. नगरसेवकांनी ते कोठे आहेत? दाखवावे. असे भूखंड विकसित करण्याची आम्ही जबाबदारी घेऊ. प्रभागातील शिंदेमळा आणि उपनगरात अद्याप पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांना कसरत करावी लागते. उपनगरातील नागरी समस्या सोडवा.
-मनोज कोरडे

प्रभागात स्वच्छतेचा मोठा प्रश्‍न आहे. गटारी स्वच्छ नाहीत. डास प्रतिबंधक फवारणी होत नाही. शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. आमदार निधीतून सध्या रस्ते झाले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे अधिक व्हावीत. महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवावा.
- माधुरी कोरडे

कर्नाळ रस्त्यावर अडीच कि.मी. ची पाईपलाईन मंजूर केली. भविष्यातील ५० वर्षांचा पाणी प्रश्‍न सुटेल. ८० टक्के गटारी व रस्ते पूर्ण आहेत. विस्तारित भागात घंटागाडी सुरू केली. उर्वरित रस्ते मंजूर आहेत, परंतु आयुक्तांची सही बाकी आहे. प्रतिवर्षी नालेसफाई होते. स्वच्छ व सुंदर प्रभागासाठी प्रयत्न 
सुरू आहे.
- नगरसेवक बाळासाहेब काकडे

प्रभागात तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करणाऱ्या नगरसेवकांची आवश्‍यकता आहे. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. वाल्मीकी आवासमध्ये पोलिस चौकी आवश्‍यक आहे. रस्ते आणि पथदिव्यांची सोय सर्वत्र करावी. महिलांसाठी उद्योग निर्माण करावेत. वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र हवे. नागरी सुविधा वेळेवर द्या.
-हेमलता मोरे

महापालिकेने अनेक जागांवर आरक्षण टाकले. परंतु ते भूखंड विकसित केले नाहीत. नदी शेजारी असूनही पाणीप्रश्‍न गंभीर आहे. गळतीचा प्रश्‍न सतावतो.  सार्वजनिक शौचालय 
नाहीत. महापालिकेच्या दोन शाळा बंद पडल्या आहेत. गुंठेवारीचा विकास झाला नाही. बरेच प्रश्‍न जैसे 
थे आहेत.
- शशिकांत नागे

डेव्हलपमेंट प्लॅन गेल्या २०-२५ वर्षांत मंजूर नाही. त्यामुळे स्वच्छतागृह, क्रीडांगण कोणत्या जागेत करायचे हा प्रश्‍न सतावतो. त्यामुळे प्लॅन मंजूर करणे आवश्‍यक आहे. प्रभाग विस्तारित आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. कर्नाळ रस्ता सध्या राज्यमार्ग बनला आहे. परंतु अपघात टाळण्यासाठी गतिरोधक आवश्‍यक आहे.
-माजी नगरसेवक नंदकुमार अंगडी

पूर्वीचा प्रभाग क्रमांक एक केवळ नावालाच एक नंबर होता. इथे विकास झाला नाही. त्यामुळे सर्वत्र भकास  चित्र दिसते. नगरसेवकांनी प्रयत्नच केले नाहीत.  सर्वाधिक विस्तारित भाग असल्यामुळे सुविधांची वानवा आहे. ड्रेनेज व्यवस्था अद्याप प्रभागात पोहोचली नाही. सांडपाण्याचा निचरा होत नाही. आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
-अशोक गोसावी

प्रभागात नगरसेवक फिरकत नाहीत अशा नागरिकांच्या तक्रारी ऐकायला येतात. १५ वर्षांत येथे कामे झाली नसल्याचे ते सांगतात. परंतु मतदारांनी आता ओरड  करून काय उपयोग? काम करणाऱ्यांना निवडून द्या. काम करणारा उमेदवार कोण? हे तपासून त्याच्या पाठीशी उभे राहावे. राजकारण न करता विकासकामे करावीत.
-प्रकाश सूर्यवंशी

प्रभागातील प्रत्येक भागात विविध समस्या भेडसावतात. नदीकाठाला मगरीचा तर इतर भागात डास, अस्वच्छतेचा धोका आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची समस्या कायम आहे. खुल्या जागेवर उद्याने विकसित करणे आवश्‍यक आहे. मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न हवेत. तसेच लोकसहभागही हवा.
-प्रा. कृष्णा आलदर

गुंठेवारीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. नियमितीकरणामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामुळे विकासातही अडथळे येतात. पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. विस्तारित भागामुळे नगरसेवकांचा निधी अपुरा पडतो. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गुन्हेगारीकडे तरुण वळतात. तरुणांच्या हाताला काम द्यावे.
-अंकुश जाधव

गटारी, रस्ते अद्याप बाकी आहेत. मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाहीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही. खुले भूखंड आहेत, परंतु ते विकसित केले नाहीत. नगरसेवक प्रभागात फिरकत नाहीत. विकासाचा ध्यास असणाऱ्यांना निवडून द्यावे.
-प्रदीप सरगर

निवडणूक जवळ आली की नगरसेवक मते मागायला येतात. परंतु इतरवेळी समस्या जाणून घेत नाहीत. नदी शेजारी असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. गटारी, डास, अस्वच्छता सर्वत्र आहे. भटक्‍या कुत्र्यांचा त्रास कायम आहे. नगरसेवक इतरवेळी फिरकतच नाहीत.
-सुधाकर साळुंखे

आयुक्तांनी ठरवले तर आरक्षित जागेवर शौचालय होऊ शकते. त्यासाठी जागा आरक्षित कराव्या लागतील. प्रशासनाने समस्या सोडवल्या पाहिजेत. आधुनिक भाजीमंडई उभी करावी. राज्यमार्गावर गतिरोधक निर्माण करावेत. पाणीप्रश्‍न अधून-मधून गंभीर होतो.
-रामचंद्र सूर्यवंशी

Web Title: Esakal Citizen Journalism Sangli readers Sanwad