रावणाच्या कातळशिल्पात चुंबकिय विस्थापन...नवा शोध

सुधीर उर्फ भाई रिसबूड
मंगळवार, 10 एप्रिल 2018

रावण म्हणून ओळखली जाणारी ही मनुष्याकृती म्हणजे कातळात कोरलेली एक शिल्प रचना आहे. अशा रचनांना कातळ खोद शिल्प (चित्र) असे ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत यांना पेट्रोग्लिप्स्‌ असे म्हणतात. 

कोकणच्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनासाठी येथील अनेक ठिकाणे प्रसिद्ध झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हा तालुका राजापूरची गंगा, धोपेश्वर मंदिर, आडिवरे येथील महाकाली मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे. याच राजापुरात देवाचे गोठणे हे ठिकाण आहे. धोपेश्वरपासून देवाचे गोठणेपर्यंत एक पाऊलवाट गेली आहे. या पाऊल वाटेवरुन आत्तापर्यंत असंख्य माणसांनी ये-जा केली असेल. पण आमच्या बाबतीतला या वाटेवरचा अनुभव काही वेगळाच आहे. रस्त्याने जाताना हिरवागार निसर्ग, पक्षी यात काही वेगळेपण हुडकणारी आमची नजर बकुळ आणि सुरंगीच्या फुलांचा सुगंध मनात साठवीत एका अनोख्या गोष्टीचा मागोवा घेत होती. एका कातळशिल्पाच्या रुपात ती आम्हाला इथे सापडली. 

देवाचे गोठणे या गावाचा इतिहास तसा 450 वर्षांच्या भार्गवराम मंदिरातून प्रत्ययाला येतोच. हे मंदिर देखील अप्रतिम असून पाहण्यासारखेच आहे. या मंदिराच्या प्रांगणात असलेली दीपमाळ ही आगळीवेगळी असून ती देखील पाहण्यासारखी व अनुभवण्यासारखी आहे. श्री ब्रह्मेंद्रस्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवस्थानासाठी हे गाव इनाम म्हणून मिळाले. याचे मूळ नाव गोठणे पण देवासाठी गाव मिळाले म्हणून ते झाले देवाचे गोठणे असे सांगितले जाते.

याच देवळापासून सुमारे 20 मिनिटे पाखाडी चढून टेंब्यावर आले की समोरच भला मोठा पसरलेला सडा. याच सड्यावर शोध घेत असताना आम्हांला रावणाचा शोध लागला. याच शोधात आणखी भर घालण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. तो शोध म्हणजे येथील कातळातील चुंबकीय विस्थापन. भौगोलिक भाषेत राजापूर लॅटेराईट सरफेस म्हणून ओळखले जाते. या सड्यावर रावणाचे कातळशिल्प कोरले आहे. या शिल्पाच्या मध्यातून 100 ते 125 मीटर त्रिज्येचे वर्तुळ काढल्यास या भागात होकायंत्राची सुई योग्य दिशादर्शन करीत नाही, असे आम्हाला आमच्या अभ्यासात आढळले. या ठिकाणी सुई कधी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते तर कधी विरुद्ध दिशेने फिरते. हे विचलन काही ठिकाणी 200 अंशापर्यंत आढळून येते. तर काही ठिकाणी होकायंत्राची सुई स्वत:भोवती फिरतच राहते. याला चुंबकिय विस्थापन असे म्हणतात. 

चुंबकीय विस्थापन पाहण्यासाठी क्लिक करा....

रावणाचे कातळशिल्प 
इथे आढळणाऱ्या पावणेसात फुटाच्या मनुष्याकृतीला येथील स्थानिक लोक रावण असे म्हणतात. यामागील कथा अशी सांगितली जाते की, सीतेच्या शोधात रावण निघाला असता तो ठेच लागून पडला त्यावेळी त्याचा ठसा उमटला ती ही मनुष्याकृती. म्हणून त्याला नाव पडले रावण आणि सड्याला नाव पडले रावणाचा सडा. अर्थातच रावण म्हणून ओळखली जाणारी ही मनुष्याकृती म्हणजे कातळात कोरलेली एक शिल्प रचना आहे. अशा रचनांना कातळ खोद शिल्प (चित्र) असे ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत यांना पेट्रोग्लिप्स्‌ असे म्हणतात. 

इथे असलेली रचना कोणी कोरली असेल? त्याचा त्यापाठीमागचा उद्देश काय होता? बरोबर याच ठिकाणी चुंबकीय विस्थापन कसे होते? ही आकृती कोरणाऱ्याला हे माहिती होते का? चुंबकीय विस्थापन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होण्याइतके या दगडात घटक तरी कोणते आहेत? असे असंख्य प्रश्‍न आम्हाला पडले आणि या निसर्ग नवलाचा एक वेगळाच अनुभव मिळाला. महत्त्वाची गोष्ट अशी की, पुढे केलेल्या अभ्यास व मिळालेल्या माहितीमधून जांभा दगडात चुंबकीय विस्थापन असणारे हे भारतातील पहिले ठिकाण आहे ज्याचा शोध घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. 

तसे पाहता या भल्या मोठ्या सड्यावर प्राग ऐतिहासिक कालखंडातील सुमारे 125 शिल्परचना कातळ खोद शिल्प (चित्र) विविध ठिकाणी पसरल्या आहेत. यात भारतातील सर्वात लांब शिल्परचना, चित्रलिपी सारखेच मोठे शिल्पपट जे कोकणा खेरीज अन्य कुठेही आढळून येत नाहीत. दक्षिण भारतात अस्तित्त्वात नसलेल्या एकशिंगी गेंड्याचे चित्र यासारख्या विविध शिल्परचना आहेत. ज्यांचा आम्ही शोध घेतला आहे. पण चुंबकीय विस्थापन होते ते फक्त रावण या शिल्परचनेच्या परिसरातच. 

42 गावांत 900 कातळशिल्पे 
मी, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई मिळून हाती घेतलेल्या कातळशिल्पांच्या शोधात आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर व लांजा या तालुक्‍यांमधील 42 गावांमध्ये 58 ठिकाणी सुमारे 900 पेक्षा अधिक शिल्परचना आम्ही शोधल्या आहेत. त्यापैकी फक्त रावण या शिल्परचनेचे वैशिष्ट्य म्हणजे या रचनेच्या परिसरात आढळणारे चुंबकीय विस्थापन. 

याच परिसरात काही अंतरावर हजारो वर्षांपूर्वीच्या पानांचे जीवाश्‍म नुकतेच आम्हाला मिळाले आहेत. अशा या वनश्रीने नटलेल्या, ऐतिहासिक वास्तूंनी सजलेल्या आणि निसर्गाच्या चमत्काराने अद्भूतरम्य बनलेल्या परिसराला प्रत्यक्ष भेट देवून त्याचा अनुभव घेणे ही एक मोठी पर्वणीच आहे. मग चला तर, रावणाला भेटायला! 

या ठिकाणी जायचे झाल्यास रत्नागिरी-आडिवरे मार्गे जाणाऱ्या मार्गावर सोलगाव फाटा लागतो. या फाट्यापासून 10 किमी अंतरावर देवाचे गोठणे गाव आहे. राजापुरातून देवाचे गोठणे अशी बससेवा उपलब्ध आहे. 

Web Title: Esakal Citizen Journalism Sudhir Risbud Article