ताडोबा जंगलात... 

सुनेत्रा विजय जोशी 
शुक्रवार, 16 मार्च 2018

वाघाला इतक्या जवळून अन तेही स्वैर फिरताना बघणे म्हणजे थ्रिलिंग. नाहीतर पिंजऱ्यातले वाघ आपण बघतोच की प्राणीसंग्रहालयात. हो पण तो दिसला की आवाज नाही करायचा हं. गुपचुप बघत रहायचे अन डोळ्यात त्याचे रुबाबदार मर्दानी रुप साठवुन परत यायचे. 

ताडोबा जंगलात जंगल सफारी करून वाघ बघायला आम्ही निघालो. गेल्या गेल्या दुपारी दोन वाजताची सफारी निघाली. चार तासांची ही सफर असते. बफर एरियात गेलो. उघड्या जीपमध्ये बसताना मनात एक थ्रिल होते.

खडखडीत रस्ता आजुबाजुला दाट जंगल. अधुन मधुन एखादे हरीण तर एखादे सांबर धावताना दिसत होते. पण जो जंगलचा शेर बघण्यासाठी आम्ही उत्सुक होतो त्याचे काही दर्शन देईना. या आधी पण पन्ना नॅशनल पार्क मध्ये जंगल सफारी केली होती पण वाघ सोडून इतर प्राणीच दिसले होते. हळूहळू आम्ही सगळेच हवालदिल व्हायला लागलो. शेवटी वेळ संपली व परतलो. ज्याच्या दर्शनासाठी आतुर होतो तो दिसलाच नाही म्हणुन मनातुन खट्टू झालो. 

दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजताची सफारी होती. सकाळी निघालो. आज कोअर एरीयात जायचे होते. त्यामुळे वाघ दिसण्याचे चान्सेस बरेच होते. आमच्या जीपसोबत पंचम नावाचा गाईड होता. तो म्हणाला आजपर्यंत मी ज्यांच्या ज्यांच्या सोबत गेलो वाघ दिसलाच. आम्ही परत खुश झालो. तो म्हणाला वाघ बघायचा म्हणजे पेशन्स हवा. जिथे काॅलींग मिळेल तिथे थांबून वाट बघायला लागेल. सांबर किंवा हरीण त्यांना वाघाची चाहूल लागली की एका विशिष्ट प्रकारचे आवाज करतात व बाकी प्राणीमित्रांना अलर्ट करतात. त्याला काॅलींग म्हणतात. असे त्या गाईडने सांगितले. 

सुरवातीला एका एरीयात गेलो तिथेच तसे काॅलींग आढळले. मग जीप तिथेच थांबवली. तिथे दोन वाघ होते. पण ते झोपलेले असल्याने जमिनीवर काहीतरी आहे एवढेच वाटत होते. मग त्या दोघांची उठण्याची वाट बघत तिथेच जीपमध्ये बसून होतो. जरा वेळाने एकाने मान वर केली. आता तो नीट दिसत होता. त्या वाघाने दुसऱ्या वाघाकडे बघितले. तो झोपला आहे, हे बघुन हा परत झोपला. आम्ही एवढी झोपमोड करून याला बघायला आलो तर हाच झोपलेला. 

मग सुरू झाला इंतजार. एक वाघ अगदी गाढ झोपलेला व दुसरा कुस बदलत वर मान उचलून तो उठलाय का हे बघत परत परत झोपत असलेला. नंतर जवळपास अर्धा पाऊण तास असे झाल्यावर तो उठला व दुसऱ्या वाघाच्या दिशेने चालू लागला. चाहुल लागल्याने की कशाने माहिती नाही. पण, दुसराही उठून बसला. तोपर्यंत काॅलींग करणारे हरीण बरोबर आपल्या मार्गाने निघुनही गेले होते. आम्हाला वाटले होते की वाघ त्या हरीणाला आता नक्की खाणार. पण वाघाने त्या हरीणाकडे बघुन न बघितल्यासारखे केले. तेव्हा गाईडने सांगितले की वाघ भुक असल्याशिवाय शिकार करत नाही. आपल्याला मात्र वाटत असते की तो बघितले की खाणार. तसेच तो खुप आळशीही प्राणी असल्याची माहिती गाईडने दिली. 

मग काय आम्ही सगळेच खुश. त्या वाघाच्या बसण्याच्या, उठण्याच्या, चालण्याच्या सगळ्या अदा बघायला मिळाल्या म्हणुन. नंतर मग पुढे गेल्यावर हरणांचे कळप, मोर, रानडुक्कर गवे, सांबर बरेच प्राणी बघायला मिळाले. 

त्या प्राण्यांना प्यायला पाण्याचे तलाव नैसर्गिक आहेतच. पण काही वनविभागाने पण खोदले आहेत. पाणी प्यायला ते येतात. त्या वेळा गाईडना माहिती असतात. अन वाघ कुठे आहे हे एका गाईडला कळले की तो बाकीच्यांना सांगतो. वाघाला इतक्या जवळून अन तेही स्वैर फिरताना बघणे म्हणजे थ्रिलिंग. नाहीतर पिंजऱ्यातले वाघ आपण बघतोच की प्राणीसंग्रहालयात. हो पण तो दिसला की आवाज नाही करायचा हं. गुपचुप बघत रहायचे अन डोळ्यात त्याचे रुबाबदार मर्दानी रुप साठवुन परत यायचे. 

Web Title: Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article