सर्वे सुखिनः भवन्तु...

सर्वे सुखिनः भवन्तु...

ते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती "तोडो फोडो और राज करो" अवलंबुन इथे भारतीयांवर राज्य केल ती निती आपल्या मनावर इतकी बिंबली आहे की घरीदारी शेजारीपाजारी राजकारणात सगळीकडे बघायला मिळते. कुणा दोघांचे चांगले पटत असेल तर तिसरा लगेच संशयाचे पिल्लू त्यांच्यामध्ये सोडतोच. मग ते भाऊभाऊ असोत नवराबायको असोत सासु-सुना असोत की दोन पक्ष असोत.... 

आपल्याला राजकारणात अजिबात शिरायचे नाहीय. आपण आपल्याबद्दल बोलु. लहानपणी संध्याकाळी दिवेलागणी झाली की शुभंकरोती म्हटल्यावर आई म्हणायची जयदेवा सगळ्यांना सुखी ठेवा अस म्हणायचे. मी लहान असल्याने माझा लगेच प्रश्न की शुभंकरोती मी म्हटले मग मला सुखी ठेव असे का नको? सगळयांसाठी का? मी भक्ती केली तर त्याच फळ मला एकटीलाच मिळायला हवे. पण आईचे त्यावरचे उत्तर खुप छान होते.

ती म्हणाली "तुच बघ तू एकटी सुखी झालीस पण घरातले कुणी म्हणजे बाबा किंवा दादा किंवा ताई आमच्या पैकी कुणी दुःखी असेल तर तुला त्या सुखात मजा वाटेल का? किंवा तुझी मैत्रीण सुद्धा काही त्रास असेल तर तू आनंदी राहु शकशील का?

मी म्हटले नाही मग माझ्याशी खेळणार कोण? मज्जा करायला ती हवीच. मग म्हणुनच सगळ्यांना सुखी ठेव म्हणायचे. कळल का? 

शिवाय त्या सगळ्यांत आपण असणारच ना वेडाबाई. त्यावेळी ते तात्पुरते पटायचे व विषय संपायचा. पण आता विचार करतांना वाटत त्या तिच्या सहज म्हणण्यात किती मोठा अर्थ आहे. 
तेव्हा एक तिळ सात जणांनी वाटुन खाण्याची गोष्ट तेव्हा पटायची नाही पण आता पटतेय. एकालाच मिळाल म्हणुन त्याने एकट्याने खायचे म्हटले तर दुसर्‍याला ती चोरण्याची इच्छा होईल.

कदाचित हिसकावून घेण्याची पण इच्छा होईल. मग एकी सोडाच त्या एका तिळाच्या हीसका-हिसकीत कुणाला काहीच मिळाले नसते व तो तिळ मातीत सांडून सापडलाही नसता परत. त्यातुन वाटल्यामुळे सगळ्यांना काही ना काही तर मिळालेच शिवाय एकीची शिकवण मिळाली ते वेगळेच. 

आई आजही बोलतांना असा काही एखादा शब्द किंवा वाक्य बोलुन जाते की कधी त्याची कविता होते तर कधी कथा. 
इंग्रजांनी जी निती वापरली तीच आज घरी दारी दिसते. एक छान घर असत. नवरा-बायको मुल-सुना नातवंडे गुण्यागोविंदाने राहत असतात. आता खरे तर ते पाहून शेजाऱ्याला पण तसे राहण्याची बुद्धी व्हावी. पण त्यातल्या कुणाला तरी पकडून त्याचे कान भरुन त्यात भांडण कसे लावता येईल व ते बघुन आपली घडीभर करमणूक कशी होईल यात त्याला इंटरेस्ट असतो.

बरे ऐकणारा पण रोजच्या जवळच्या प्रेमाच्या माणसापेक्षा त्या तिर्‍हाईत शेजारच्यावर विश्वास कसा ठेवतो हे परमेश्वर जाणे. 
माझे नविनच लग्न झाले होते. मजेत असायचो. आमच्या शेजारी एक सासुबाईंच्या वयाच्या बाई रहायच्या. एकदा त्या अशाच बसायला आल्या. बोलता बोलता म्हणाल्या अग नवर्‍यासोबत भांडण वगैरे झाले तर मला सांग हं. मी त्याला चांगली खडसावून चार समजुतीच्या गोष्टी सांगेन. काळजी करू नकोस.

मी पण त्यांना ठणकावून सांगितले हे बघा एकतर आमच्यात भांडण होणार नाही. अन् झालच तर माझ मी निस्तरायला समर्थ आहे तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. 

हे मी सांगु शकले कारण आईने असेच सहज बोलतांना सांगितले होते की गृहछिद्र कुणाला दाखवु नये. लोकांना ते बुजवण्यापेक्षा त्याचे भगदाड करण्यात जास्त रस असतो. 

या सगळ्या गोष्टी वरवर पाहता संबधित वाटत नसल्या तरी त्या जोडल्या गेल्या आहेत काही विशिष्ट सुत्राने. जसे हे घरात घडत असते तसेच समाजात आणि देशातही. आपल्या भांडणाचा परकिय उपयोग करून घेतात. एक तिळ वाटुन न खाल्ल्याने दुसरा हिसकवायला बघतो. व एकट्याने सुखी होण्याच्या विचाराने कुणीच सुखी होत नाही. 

त्यापेक्षा सर्वे सुखिनः भवन्तु. असे म्हटले तर आपण सारेच सुखी नाही का होणार.? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com