सर्वांगीण विकासासाठी निश्‍चित धोरण हवे

 प्रा. डॉ. जालंदर पाटील 
रविवार, 31 डिसेंबर 2017

निसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात मानमान्यता मिळविलेला हा तालुका तुलनेने विकासप्रक्रियेत मागे राहिला आहे.

निसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात मानमान्यता मिळविलेला हा तालुका तुलनेने विकासप्रक्रियेत मागे राहिला आहे. वरपांगी राज्यकर्त्यांनी आणि येथील लोकनेत्यांनी विकासाच्या वल्गना आपापल्या सोयींनी केल्या. पक्षीय अभिनिवेशासाठी येथील जनतेने त्याला साथही दिली. प्रसारमाध्यमातून झळकणाऱ्या त्यांच्या छबी आणि विकासकामांचे आकडे डोळे दीपवणारेच होते. प्रत्यक्ष विकास कोणाचा झाला, हा चिंतनगर्भ प्रश्‍न आहे.

या तालुक्‍याची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण ११४ गावे, १,९९,७१३ लोकसंख्या. त्यांपैकी १,०३,१९० पुरुष, तर ९६,५२३ महिला ४२ हजार कुटुंबांत गुजराण करताना दिसतात. एक हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९३५ इतके आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या २०,७६४ इतकी असून, एकूण लोकसंख्येच्या ती १० टक्के आहे. त्यापैकी ११,३३५ मुले, तर ९,४२९ मुली आहेत. ८३२ इतके मुलींचे प्रमाण आहे. ही चिंतेची बाब असून, १०० मुलामागे १०० पेक्षा अधिक मुली असणारी अपवादानेच काही गावे या तालुक्‍यात आहेत. 

साक्षरतेच्या बाबतीत तर खूपच भयावह स्थिती दिसते. १ लाख ३८ हजार ८४७ साक्षर या तालुक्‍यात असून, ८१,३६७ पुरुष तर ५७,४८० इतक्‍या महिला साक्षर, ६०,८६६ लोक निरक्षर आहेत. त्यामध्ये २१,८२३ पुरुष, तर २९,०४३ महिलांचा समावेश आहे. आपटाळ, बारडवाडी, चक्रेश्‍वरवाडी, कोनोली, पाल अशा कितीतरी गावांतील साक्षरतेचे प्रमाण हे ६५ टक्‍क्‍यांपेक्षा खाली आहे. धामोड खोऱ्यातील मानेवाडी या गावात हे प्रमाण ४७.१८ इतके आहे. याचे कारण या गावाला लागून चार धनगरवाडे आहेत. त्या धनगरवाड्यांना स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत अजून शिक्षण व रस्तासुद्धा पोचलेला नाही. ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक साक्षरता असणारी तिटवे, कळंकवाडीसारखी अपवादानेच गावे दिसतात, तरीही ३० पटांच्या खालील वाडीवस्तीत मराठी शाळा बंद करण्याचे शासन धोरण लज्जास्पद वाटते. कुठे वीज आहे, तर रस्ता नाही. कुठे रस्ता आहे, तर त्याच्यावर खडीकरण, डांबरीकरण नाही. ऊसतोड करणारे मजूर, घरगडी असणारे गोरगरीब, साखर कारखान्यात हमाली करणारे आणि त्यांचे शोषण करणारे ठेकेदार याच वाडीवस्तीवरचे दिसतात. 

बारडवाडी, चक्रेश्‍वरवाडी अशा सात वाड्या ठिकपुर्ली गावाच्या डोंगरावर आहेत. यांच्या पायथ्यांना दूधगंगा व भोगावती नद्या वाहतात; पण स्वातंत्र्यानंतर साठोत्तरीत त्यांच्या शेतीला किंवा पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. अशी अवस्था या तालुक्‍यातील कितीतरी गावांची आहे, तरीही त्यांच्या विकास वल्गना थांबत नाहीत. हे येथील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. धामोड, म्हासुर्लीजवळच्या वाड्यावस्त्या, वाकीघोलमधील छोटी-मोठी गावे, ऐनी आणि राधानगरीच्या अवतीभोवतीचे मागासलेपण मन हेलावून टाकणारे आहे. 

पर्यटन हा शब्द तर आजकाल वापरून गुळगुळीत झाला आहे. सोयी-सुविधांअभावी ती पर्यटनस्थळे उपेक्षित राहिली आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना उपाहारगृहे, निवास, स्वच्छतागृहे अशा सुविधांची गरज आहे. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी येथे शासकीय विश्रामगृहे आहेत; पण त्यांची अवस्था शोचनीय आहे. ‘क’ वर्ग तीर्थस्थळे व यात्रास्थळे यांची राधानगरीतील संख्या ४० इतकी आहे. १९९६ मध्ये धामणी प्रकल्प मंजूर झाला. २००० मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. २०१० नंतर गेली आठ वर्षे येथील काम पूर्णपणे ठप्प आहे. १२० कोटी रुपयांचा हा मूळ प्रकल्प ७८२ कोटी रुपये खर्च झाले, तरी अजून अपूर्ण आहे.

२८०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा हा प्रकल्प पूर्णत्वास जात नाही, हे चिंताजनक वाटते. वन्यजीव विभागाकडून राजापूर, वलवणजवळच्या जलाशयात पर्यटकांसाठी बोटिंग व्यवस्था झाली होती, त्या बोटी कुठे आहेत, हे शोधायला हवे. 
२०१२ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले दाजीपूर अभयारण्य हे या तालुक्‍याचे भूषण आहे. राजर्षी छत्रपती शाहूंनी दाजीराव अमृतराव विचारे या अभियंत्याचे नाव या जंगलाला दिले. जवळजवळ ३५ प्रकारचे वन्यप्राणी या अभयारण्यात आहेत. १८०० प्रकारच्या वनस्पती, १५०० पेक्षा जास्त फुलझाडे आणि ३०० प्रकारच्या वनौषधी या जंगलात पाहायला मिळतात. या जंगलाची स्वच्छता मोहीम लोकसहभागातून ‘सकाळ’ समूहाला राबवावी लागते.

जैवविविधतेचा मोठा साठा असणारा हा तालुका जगाच्या नकाशावर जर आणला, तर जागतिक बॅंका त्याला अर्थपुरवठा करतील. कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठाराचा विकास करणे शक्‍य आहे. दर सात वर्षांनंतर येथे कारवी फुलते, ते नयनरम्य दृश्‍य ही येथील निसर्गाची कमाल आहे. राऊतवाडीच्या धबधब्यासारखे येथील डोंगरदरीत शेकडो धबधबे पावसाळ्यात दिसतात; पण देशी, विदेशी पर्यटकांना त्याची माहिती कोण देणार? येथे पर्यटनाचे माहिती केंद्रच नाही. गरम पाण्याचे झरे हे येथील आणखी एक आकर्षण आहे. काळम्मावाडीकडे जाताना असे झरे दिसतात, हे पाणी सल्फरयुक्त आहे. त्या पाण्याला सल्फरचा वास येतो. त्याचे तापमान ४३ ते ५८ सेल्सिअस असते. त्यात २२ टक्‍के घनपदार्थांचे कण असतात. हे पाणी औषधी असून, संधिवात, कातडीचे विकार, मधुमेह, इत्यादी रोगांवर चांगल्या प्रकारे उपयुक्त असून, त्यांचे जतन करायला हवे.

वाकीघोलमधील राजर्षी शाहू छत्रपतींचे विश्रांतीस्थान, जिंजी निवास, त्या परिसरातील प्राचीन गुंफा दुरवस्थेत आहेत. चाफोडी ते राधानगरीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व्हायला हवे. विकासाअभावीच वाकीघोलातील नागरिक आपल्या विभागाचा समावेश भुदरगड तालुक्‍यात करण्याची मागणी करत आहेत. १९०३ मध्ये छत्रपती शाहूंनी वाकीघोल परिसराचा तज्ज्ञांना घेऊन सर्व्हे केला होता. हा परिसर कॉफी लागवडीसाठी उपयुक्त असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिलेला होता. उशाला धरण असूनही या परिसरात पाणी नाही. बोअरवेलनेच तो शेतीत आणि पिण्यास पाणी वापरतो. खनिज संपत्तीचा मोठा खजिना या तालुक्‍यात आहे. बेसुमार बॉक्‍साइटची, बांबूची लूट करण्याकडेच उद्योगजगताचा कल आहे. राज्यकर्ते आणि येथील लोकप्रतिनिधींचा आवाज मात्र याबाबतीत मूक आहे.

काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी, धामणी आणि छोट्या-मोठ्या लघुपाटबंधारे प्रकल्पांमुळे धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. संपूर्ण तालुक्‍याला दळणवळणासाठी अद्ययावत रस्ते हवेत. पर्यटनासाठी पर्वणी असणारा हा तालुका सोयी-सुविधांनी सुसज्ज केल्यास जगभरातील पर्यटक इकडे आकर्षित होऊ शकतो. कोकणचे आकर्षण पर्यटकांना असले, तरी त्याच्या सावलीत वाढलेल्या या तालुक्‍यातील कोल्हापूर- फोंडा- गोवा हा सुरक्षित रस्ता अद्ययावत करण्याची गरज आहे. 

गगनबावड्यातील अणदूर ते धामणी प्रकल्प, तुळशी प्रकल्प ते दाजीपूर अभयारण्याला जोडून राधानगरी धरण, वाकीघोलातून पाटगावचे धरण ते झुलपेवाडीवरून आजऱ्याच्या चित्री-उचंगी धरणापर्यंतचा रस्ता झाल्यास एक मोठा सुकर प्रवास घडेल. या मार्गावरून पर्यटकांना आनंद घेत सहज गोव्यात जाता येईल. विकास आराखड्यात या मार्गाचा उल्लेख आम्ही केला आहे; पण अद्याप याचे महत्त्व शासनाला कळलेले नाही. २००९ -१० मध्ये राज्यात २१ लाख २६ हजार ९३३ विदेश पर्यटक येऊन गेले, त्यांपैकी कोल्हापूरला केवळ १५३७ पर्यटकांनी भेट दिली. ही गंभीर बाब आहे. यातून इथल्या पर्यटन स्थळांचे मार्केटिंग व्हायला हवे, हे दिसून येते. एकीकडे कुंभ, सिंहस्थ मेळ्यांसाठी शेकडो कोटी खर्च होतात; पण सामान्यांच्या हाताला काम देणाऱ्या इथल्या पर्यटनविकासावर दमडीही खर्च होत नाही. तसा विचार झाल्यास इथे विकासाचा सूर्य निश्‍चित उगवेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalandhar Patil article