मुंढवा परिसरात खड्डेच खड्डेच 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 August 2019

पुणे : सतत आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे मुंढव्यातील रस्त्यांची चांगलीच चाळण झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे अख्खी उपनगरे खड्ड्यांत गेल्याचा अनुभव पुणेकर घेत आहेत. 
 

पुणे : सतत आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे मुंढव्यातील रस्त्यांची चांगलीच चाळण झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे अख्खी उपनगरे खड्ड्यांत गेल्याचा अनुभव पुणेकर घेत आहेत. 

मुंढवा ते पिंगळे वस्ती रस्ता, ताडीगुत्ता ते कोरेगाव पार्क रस्ता, ताडीगुत्ता ते जहॉंगीरनगर रस्ता, केशवनगर ते मांजरी रस्ता यांसह उपनगरांतील प्रमुख व छोट्या-मोठ्या अंतर्गत रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. या रस्त्यांवर छोट्या स्वरूपात मात्र दर्जेदार डागडुजी केल्यास रस्ते चांगल्या स्थितीत येऊ शकतात. मात्र, या महत्त्वाच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला महापालिका प्रशासनाला वेळ नाही, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. 

मुंढवा येथील रेल्वे उड्डाण पुलावर, संघर्ष चौक, महात्मा फुले चौक, मुळा-मुठा नदीवरीलपुल ही ठिकाणे वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच या रस्त्यांवर खड्ड्यांची भर पडली आहे. त्यामुळे वाहतुकीची अधिक वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

महापालिकेचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता विजय वायसे यांना तीन वेळा फोन करूनही त्यांनी तो उचलला नाही.

 मुंढवा रेल्वे उड्डाण पुलावर पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणा नसल्यामुळे पाणी वाहून न जाता रस्त्यावरील खोलगट भागात साठते. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साठून खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी चालकाला पाण्यात पडून अपघातास सामोरे जावे लागते. पुलावरील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था पालिकेने करावी.
- देविदास लोणकर, नागरिक 

मगरपट्टा ते नगर रस्ता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे कोंडी नित्याचीच. परंतु सततच्या पावसामुळे या रस्त्यावर व मुंढवा जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहतूक संथ होऊन पान मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्धा तर कधी पाऊण तासांचा वेळ लागतो. खड्डे तातडीने बुजवावेत.
- प्रशांत भंडारी, नागरिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many pitches In the Mundhwa area