संत साहित्याचे व्यासंगी

प्रा. वैजनाथ महाजन
Wednesday, 5 December 2018

डॉ. ल. रा. नसिराबादकर यांना समूहाला मंत्रमुग्ध करणारी वाणी प्राप्त होती. व्याख्यानमालांना गर्दी खेचणारे हे वक्ते होते. संत साहित्याच्या अभ्यासाची परंपरा त्यांनी पुढे नेली. 

विद्यापीठीय चर्चा-व्याख्यानांमध्ये रमणारे वक्ते लोकसमूहाचा ठाव घेऊ शकत नाही, या समजला छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. ल. रा. नसिराबादकर. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यापीठीय क्षेत्रातील मराठी अध्यापकांच्या तीन पिढ्यांचे पोषण केले. त्याचवेळी त्यांनी खेडोपाड्यातील व्याख्यानमालांमध्ये हजेरी लावत संत साहित्यांची गोडीही समाजाला लावली. 

डॉ. नसिराबादकर कोल्हापुरात स्थायिक झाले, त्याला काही दशके लोटली. ते ज्यावेळी रयतच्या शाहू महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले; तेव्हापासूनच त्यांच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांचा गोतावळा असे. अस्खलित भाषा, गाढा व्यासंग हे त्यांचे वैशिष्टय होते. इचलकरंजीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या  संमेलनातील एका परिसंवादात त्यांनी केलेल्या प्रभावी मांडणी साहित्यविश्‍वात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. याच दरम्यान त्यांचा ‘प्राचीन वाङ्‌मयाचा इतिहास’ हा त्यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण असा ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. विद्यापीठातील मराठीच्या तीन पिढ्या या ग्रंथाने पोसल्या. या क्षेत्रातील नसिराबादकर सरांचा शब्द अंतिम मानला जात असे.

खरे त्यांनी हे पुस्तक तृतीय वर्ष मराठीच्या  अभ्यासक्रमास समोर ठेवून लिहिले होते. मात्र ते क्रमिक अभ्यासक्रमाचे पुस्तक न राहता त्याला संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली. सखोल मांडणीमुळे आजही ते विद्यार्थी जगतात प्रिय आहे. पुढे त्यांनी एमफील आणि त्याच बरोबर प्राध्यापकांना सक्तीचे असलेल्या उजळणी वर्गांसाठीही (रिफ्रेशर कोर्स) उत्तम अशी कामगिरी व लेखन केले. आपल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक म्हणून संधी मिळावी, यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. राज्यभर त्यांच्या हाताखाली घडलेले शेकडो विद्यार्थी उमेदीने अध्यापन करीत आहेत. सरांचा व्यासंगाचा विषय आणि अभ्यासाचा विषय जरी प्राचीन वाङ्‌मय असला तरी  त्यांचा आधुनिक साहित्याचाही त्यांचा मोठा अभ्यास होता. मराठीतील आजच्या अनेक कवींबद्दल आस्था  होती. शांता शेळके, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, बा. भ. बोरकर अशा कवींच्या कविताही ते तितक्‍याच समरसतेने शिकवत. रयत शिक्षण संस्थेचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता आणि तो वारसाही ते मानतही होते. 

आयुष्यभर त्यांनी जी ज्ञानोपासना केली ती आजच्या पिढीला खूप प्रेरणादायी आहे. डॉ. विजयकुमार निंबाळकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘खांडेकरांचे साहित्य विचार’ या विषयावरील शोधनिबंध मार्गदर्शक मानला जातो. उत्तम हस्ताक्षर आणि तितकीच लोभस वाणी या गुणांमुळे डॉ. नसिराबादकर सदैव लक्षात राहतील. संत साहित्याच्या व्यासंगाने त्यांना शिक्षण 
क्षेत्राबाहेरचे वलय दिले. समूहाला मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांना प्राप्त होती. गावोगावच्या व्याख्यानमालांना गर्दी खेचणारा हा वक्ता होता. संत साहित्याच्या अभ्यासाची परंपरा त्यांनी पुढे नेली. या परंपरेतील ते कडी होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof Vaidnath Mahajan article on La Ra Nasirabadkar