तालेवार बल्लवाचार्य...!

राजू मेवेकरी 
सोमवार, 11 डिसेंबर 2017

वसंतराव जोशी... हे नाव तसं राधेश्‍याम मंगल कार्यालय म्हटलं की, चटकन सर्वांसमोर येते. वेडिंग मॅनेजमेंट ही संकल्पना अलीकडच्या काळात रुजली असली तरी त्यांनी १९७० मध्येच ती कोल्हापुरात आणली. ‘एकाच छताखाली सर्व सुविधा’ हे त्यांचे ब्रीद. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना हा उजाळा...

कोल्हापूर हे तालेवार खवय्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी येथे तालेवार बल्लवाचार्य असल्यानेच इथली खाद्यसंस्कृती अधिक समृद्ध होत गेली. वसंतराव जोशी हे असेच एक बल्लवाचार्य. त्यांचा जन्म लिंगनूरचा. कुरुंदवाडच्या संस्थानिकांकडे आई राधाबाई स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या आणि इतर घरची कामेही त्या घेत. तोच गुण वसंतरावांतही. आयुष्यात काही तरी करून दाखवायचे, असा निश्‍चय करून त्यांनी १९४८ मध्ये कोल्हापूर गाठले आणि जेवणाची छोटी-मोठी कामे घ्यायला सुरुवात केली. मग भागीदारीत लक्ष्मी मंगल कार्यालय आणि १९७० साली जोतिबा रोडवर राधेश्‍याम मंगल कार्यालय उभे केले. येथे त्यांनी पहिल्यांदाच ‘शुभकार्यासाठी एकाच छताखाली सर्व सुविधा’ ही संकल्पना पुढे आणली आणि लग्नकार्यात दारातील रांगोळीपासून ते वधूच्या पाठवणीपर्यंत साऱ्या सुविधा येथे मिळू लागल्या. माफक शुल्कात त्यांनी सुरू केलेली ही सुविधा नंतरच्या काळात अधिक व्यापक होत गेली.

 ‘आबा’ या नावाने ते परिचित. अल्पशिक्षित असले तरी कल्पकता आणि वेगळी वाट चोखाळण्याची त्यांच्यातील धमक भारी. भाऊ आणि मुलांसाठी त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांच्या हातची चवच इतकी भारी की, कोल्हापुरात कोणीही मोठी व्यक्ती आली की, त्यांच्या हातचे जेवण ठरलेले. अगदी यशवंतराव चव्हाण, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यापासून ते शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधींपर्यंत अनेकांना त्यांच्या हातच्या जेवणाने भुरळ घातली. स्वतः मांसाहारी नसले तरी त्यांच्या हातचा तांबडा-पांढरा रस्सा म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच.

एकीकडे व्यवसाय विस्तारताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. गरिबांचे मोफत विवाह, गरजूंना शैक्षणिक मदत, विविध मंदिरांच्या उभारणीत त्यांचे योगदान मोठे राहिले. दिवाळीत घरगुती फराळ एकाच छताखाली विक्रीची संकल्पनाही त्यांनी सुरू केली. आजही या योजनेतून फराळासाठी किमान महिनाभर अगोदर नोंदणी करावी लागते. मनीषा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना भारतासह नेपाळ, चारधाम यात्रा घडवून आणली.

Web Title: Raju Mevekari article on Vasantrao Joshi