पाऊस थांबलाय आता तरी रस्ते दुरुस्ती करा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 November 2019

पुणे : मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता आणि खड्ड्यांमुळे झालेली रस्त्याची चाळण यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. पाऊस थांबून आठवडा झाला तरी महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीची कामे होत नसल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

पुणे : मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता आणि खड्ड्यांमुळे झालेली रस्त्याची चाळण यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. पाऊस थांबून आठवडा झाला तरी महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीची कामे होत नसल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. 
नागरिक अमित अग्रवाल म्हणाले, मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्ता ते आठवले चौक ते प्रभात रस्त्याकडे जाणाऱ्या कालवा रस्त्याची चाळण झालेली आहे. माझ्या पत्नीला तिचा काहीही दोष नसताना विधी महाविद्यालय रस्त्यावर अपघात झाला. विधी महाविद्यालय रस्त्यावर वाहनांची एवढी गर्दी असते की रस्ता ओलांडणे ज्येष्ठ नागरिकांना अवघड होते. वाहतूक पोलिसांचा अभाव, नादुरुस्त रस्ते, बेशिस्त वाहतूक याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. वाहनांचे छोटेमोठे अपघात तर रोजचेच आहे. वाहतुकीच्या समस्येवर योग्य उपाययोजना न केल्यामुळे जनतेला काय त्रास होतो, हे अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे. 
गिरीश गुमास्ते म्हणाले, गुलमोहोर पथावरून नळस्टॉपला जायचे असेल, तर जाता येत नाही. भक्ती मार्ग आणि शांतीशीला या सोसायट्यांनाही हाच त्रास आहे. लॉ कॉलेजकडून गुलमोहोर सोसायटी, एसएनडीटी कॉलेजमध्ये जाण्यासाठी दहा फुटी रस्ता ठेवलेला आहे. त्यातसुद्धा अनेक वेळा वाहतूक पोलिस नसेल, तर वाहनचालकांची वादावादी होते. 
पंकज खोपडे म्हणाले, पौड रस्त्यावर पडलेले खड्डे महापालिकेने आता तरी बुजवावेत. दुरुस्तीसाठी कोणाची वाट पाहात आहात. वाहनचालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली आहे. लोकांना मणक्‍याचे त्रास होऊ लागले आहेत. तातडीने उपाययोजना करावी. 
कुणाल वेडेपाटील, "नळस्टॉप चौकात आंदोलन करत त्याला खड्डास्टॉप असे नाव कोथरूडकरांनी दिले होते. पावसामुळे रस्ते दुरुस्ती होत नाही, असे समजून नागरिकांनी सहकार्य केले. आता पाऊस थांबला आहे. तातडीने रस्ते दुरुस्ती करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी; अन्यथा लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. 
संजय जाधव, लॉ कॉलेज रस्त्यावरून अभिनव चौकाकडे जाताना गाडगीळ बंगला ते अभिनव चौक ड्रेनेज लाइनचे काम करून तीन आठवडे झाले आहेत. तरीसुद्धा हा रस्ता दुरुस्त झालेला नाही. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: repair the roads now