श्रवणबेळगोळ - अडीच हजार वर्षांपासूनचे ऐतिहासिक तीर्थस्थळ

संजय उपाध्ये
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

भारतीय शिल्पकलेचे सर्वोकृष्ट आणि अद्‌भुत उदाहरण म्हणून ओळखल्या गेलेल्या श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली तथा गोमटेश मूर्तीच्या महामस्तकाभिषेकाला १७ फेब्रुवारीपासून भव्य-दिव्य स्वरूपात प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त श्रवणबेळगोळची ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा याबद्दल घेतलेला आढावा...

श्रवणबेळगोळ हे दक्षिण कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील चन्नरायपट्टण तालुक्‍यातील पाच हजार लोकवस्तीचे निसर्गसंपन्न गाव. नारळीची झाडे आणि छोट्या मोठ्या तलावांमुळे गाव रमणीय बनले आहे. गावात चंद्रगिरी आणि विंध्यगिरी असे दोन डोंगर आहेत. या दोन्ही डोंगराच्या मधोमध पायथ्याला पुष्करणी आहे. तसेच गावाचा विस्तारही येथेच आहे. समस्त जैन धर्मियांचे अतिशय पवित्र असे हे तीर्थस्थान बनले आहे.

दृष्टिक्षेप

  •  श्रवणबेळगोळला अडीच हजार वर्षांचा इतिहास

  •  गावात चंद्रगिरी आणि विंध्यगिरी असे प्रसिद्ध डोंगर

  •  दोन्ही डोंगरांच्या मधोमध ऐतिहासिक पुष्करणी

  •  विंध्यगिरी डोंगरावर ५८ फूट उंचीची बाहुबली मूर्ती

या पुष्करणीवरूनच गावाला नाव पडले ‘बेळगोळ’. कन्नडमध्ये ‘बेळ’ म्हणजे पांढरे आणि ‘कोळ’ (जुन्या कन्नडमध्ये. नंतर त्याचे ‘गोळ’ झाले) म्हणजे पांढरे तलाव, तळे, पुष्करणी, म्हणजेच धवलतीर्थ. हीच त्या गावाची ओळख बनून राहिली. अडीच हजार वर्षांपासून श्रवणबेळगोळला अनेक नावांनी ओळखले जाते. बोलीभाषेत नुसतेच ‘बेळगोळ’ म्हटले जाते. येथे सापडलेल्या संस्कृत भाषेतील शिलालेखात ‘श्‍वेतसरोवर’, ‘धवलसरोवर’, ‘धवलसरसा’ अशा नावांनीही हे गाव ओळखले गेले आहे. काही शिलालेखांत नुसते ‘बेळगुळा’ असेही लिहिले आहे. त्याशिवाय ‘देवर बेळगोळ’ (देवाचे श्‍वेतसरोवर), गोम्मटपुरम (गोमटेश्‍वराचे नगर) असाही काही शिलालेखांत आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. येथे येणारे आणि वास्तव्य करणाऱ्या साधू, मुनी, श्रमण यांच्यामुळे ‘श्रवणबेळगोळ’ असे या गावाचे नामाभिधान झाले.

श्रवणबेळगोळ हे गाव गेल्या अडीच हजार वर्षांपासून जैनधर्मियांचे केंद्रस्थान बनून राहिले आहे. त्याचे कारण म्हणजे येथील विंध्यगिरी डोंगरावरील ५८ फूट उंचीची अतिभव्य गोमटेश्‍वर तथा भगवान बाहुबली यांची मूर्ती होय.
सुमारे इ. स. पूर्व २३०० वर्षांपूर्वी भारताचे पहिले सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे आपली राजधानी पाटलीपुत्र सोडून येथे आले. त्यांच्यासोबत अंतिम श्रुतकेवली आणि आचार्य भद्रबाहू हे त्यांचे गुरूही होते. सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि आचार्य भद्रबाहू यांनी येथे तपसाधना केली.

कालांतराने जैन धर्माच्या तत्त्वांचे आचरण करत सल्लेखना घेत दोघांचे महानिर्वाण झाले. त्यामुळे हे गाव प्रसिद्ध झाले आणि समस्त जैनधर्मियांचे आदराचे आणि पवित्र स्थान बनले. भारतवर्षात ते आता सर्वधर्मियांचे एक महत्त्वाचे तीर्थस्थानही बनून राहिले आहे. गेल्या २३०० वर्षांपासून या तीर्थस्थानाला केवळ भारतच नव्हे, तर जगभरातून श्रावक भेट देतात. दर बारा वर्षांनी होणाऱ्या महामस्तकाभिषेकाचे औचित्य साधून जगभरातून श्रावक श्रवणबेळगोळला येतात. मूर्तीच्या पायावर नतमस्तक होतात.

Web Title: Sanjay Upadya article on Shravanbelgola