अखंड शिलेतून कोरलेली एकमेव मूर्ती

संजय उपाध्ये
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी डोंगरावर भगवान बाहुबली तथा गोमटेश्‍वरांची जगत्‌विख्यात मूर्ती आहे. इ. स. ९८१ मध्ये उभारलेल्या या मूर्तीला १०३६ वर्षे पूर्ण होत आहेत. या मूर्तीवर यंदा होणारा हा ८८ वा महामस्तकाभिषेक आहे.

श्रवणबेळगोळ हे गाव सुमारे २५०० वर्षांपूर्वी प्रसिद्धीस आले. भारताचे पहिले सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरू अंतिम श्रुतकेवली आणि आचार्य भद्रबाहू येथे आले. सम्राट चंद्रगुप्त सर्वसंगपरित्याग करून श्रवणबेळगोळ येथे आले. पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी. राजवस्त्रे पुत्र बिंदुसार यांच्याकडे देऊन सम्राट दक्षिणेत आले. 

श्रवणबेळगोळमधील चंद्रगिरी डोंगरावर सम्राट चंद्रगुप्त आणि आचार्य भद्रबाहू यांनी तपसाधना केली. कालांतराने जैन धर्माच्या तत्त्वानुसार सल्लेखना घेत दोघांचे महानिर्वाण झाले. त्या वेळी 
सम्राट चंद्रगुप्त केवळ ४२ वर्षांचे होते, असे सांगितले जाते. त्या काळापासूनच हे पवित्र तीर्थस्थान बनले.

दृष्टिक्षेप

  •  विंध्यगिरीवर ५८ फुटी बाहुबलीची मूर्ती

  •  चंद्रगिरी ही सम्राट चंद्रगुप्त, आचार्य भद्रबाहूंची निर्वाणभूमी

  •  १९८१ ला मूर्तीला एक हजार वर्षे पूर्ण

  •  तिसऱ्या सहस्रकातील दुसरा महामस्तकाभिषेक

श्रवणबेळगोळच्या परिसरात तल्लकडवर गंग घराणे राज्य करत होते. या गंग घराण्यातील रायमल्ल हे राजे गादीवर होते. त्यांचे प्रधानमंत्री आणि सरसेनापती चामुंडराय होत. इ. स. ९८१ ला विंध्यगिरी (इंद्रगिरी) पहाडावर अखंड शिलेतून बाहुबलीची मूर्ती कोरली. चामुंडराय यांनी आपल्या मातेच्या (काललादेवी) इच्छेनुसार शिल्पकार अरिष्टनेमी यांच्याकडून ही ऐतिहासिक मूर्ती कोरून घेतली. शिल्पकार अरिष्टनेमी यांना गुरू नेमिचंद सिद्धांत चक्रवर्ती आणि अजितसेन आचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. मूर्ती कोरून पूर्ण झाल्यानंतर इ. स. ९८१ ला प्रधानमंत्री चामुंडराय यांनी मूर्तीचा पहिला महामस्तकाभिषेक केला.

त्यावेळेपासून दर बारा वर्षांनी महामस्तकाभिषेक होत आहे. या महामस्तकाभिषेकासाठी देशभर विखुरलेले जैन श्रावक-श्राविका, साधू, साध्वी एकत्र येत असतात. इ. स. १९८१ ला मूर्तीला हजार वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी पाच लाख श्रावक उपस्थित होते. १९८१ ला दुसऱ्या सहस्रकातील शेवटचा महामस्तकाभिषेक सोहळा 
झाला. 

Web Title: Sanjay Upadya Article On Shravanbelgola