टेकडी बचाव आंदोलनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 May 2019

पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे पाषाण-बाणेर टेकडी बचाव जनआंदोलनातून आवाज उठविला. 

पुणे : पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक या भागात काम करत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी टेकडीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने बांधकाम केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. या नाराजीतूनच बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे पाषाण-बाणेर टेकडी बचाव जनआंदोलनातून आवाज उठविला. 

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले बांधकाम हे टेकडीच्या नैसर्गिक स्वरूपाला बाधा आणणारे असून, यापुढे या ठिकाणी कोणतेही काँक्रीटचे काम किंवा मानवी हस्तक्षेप होता कामा नये यासाठी हे आंदोलन केले गेले. यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत विविध संघटना, व्यक्ती आणि नागरिक सहकुटुंब सहभागी झाले होते. बाणेर बालेवाडीचा टेकड्यांचा परिसर हा शहराची फुफ्फुसे असून, यावर कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये, यासाठी प्रशासनाने काम करणे गरजेचे असताना टेकडीला बाधा पोचेल असेच कृत्य केले जात असल्याने नागरिकांनी त्यास विरोध केला. या वेळी नागरिकांनी मानवी साखळी केली. तसेच स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. कायद्याने टेकडीवर बांधकाम करता येत नसल्याने सुशोभीकरणाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या कामामुळे टेकडीचे वैभव लोप पावेल आणि भावी पिढ्या नैसर्गिक प्राणवायू मिळविण्यासाठी झगडतील. वेळीच जागे झालो नाही तर अशीच छोटी छोटी बांधकामे करून टेकड्या संपवल्या जातील आणि भावी पिढी याचा आपल्याला जाब विचारेल, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. 

कंत्राटदाराने रात्रीतून काम उरकले :
विशेष म्हणजे नागरिकांचा या कामाला विरोध असतानाही कंत्राटदाराने रात्रीच्या वेळेत हे काम केल्याने सर्वच जण संभ्रमात पडले आणि तेव्हापासून नागरिकांनी अधिकच प्रखर विरोध करायला सुरवात केली. विशेष म्हणजे या ठिकाणी फक्त सलग समतल चर बनवले जावेत, अशी सूचना पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केली होती. असे असताना, या ठिकाणी कॉंक्रीटचे बांधकाम करून अशास्त्रीय पद्धतीने मुरूम टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. शेवटी, यापुढे टेकडीला बाधा आणणारे कोणतेही काम केले जाणार नाही, असे आश्‍वासन स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिले. 

महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवून उधळपट्टी :
प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्‍न सोडवणे बाकी असताना महापालिका प्रशासन गरज नसलेली कामे का करत आहेत, असा सवाल जमा झालेल्या नागरिकांनी उपस्थित केला. बाणेर-पाषाण लिंक रस्त्यासह काही अंतर्गत रस्ते अजूनही पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु महापालिका त्याकडे दुर्लक्ष करते आणि गरज नसतानाही या टेकडीवरील कॉंक्रिटीकरणावर उधळपट्टी होत असल्याची टीका एका नागरिकाने केली.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही विविध कामे करत असतो यापुढे येथे कोणतेही काम केले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. टेकडीवर पालिकेचे पाण्याचे टॅंकर वरती जाण्यास अडचण व्हायची, त्यामुळे थोडासा मार्ग मोकळा केला आहे. येथे होणारे जवळपास ऐंशी टक्के काम रद्द करण्यात आल्याने जी गोष्ट होणारच नाही त्याचा बागुलबुवा करणेही योग्य नाही. यापुढे टेकडीवर कुठलीही हानी न पोचता पर्यावरण राखूनच विकास केला जाईल हे आश्‍वासन देतो.
- अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेवक 

आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही. जेथे गरज असेल तिथे करायला हरकत नाही. परंतु टेकडीचे नैसर्गिक रूप बदलण्याच्या प्रकाराला आमचा विरोधच असेल. कारण आपल्याला शुद्ध हवा मिळते, समतल चरनिर्मितीमुळे पाण्याची वाढणारी पातळी ही जमेची बाजू असताना टेकडीवर कुठलेही काँक्रीटचे काम होऊ नये, यासाठी आम्ही आंदोलन केले. 
- माधव सायनाकर, (निवृत्त) कर्नल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spontaneous response to the hill rescue movement by punekars