नूतन गंधर्वांच्या स्मृती जागवताना...

सुधांशु नाईक
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे हे कोल्हापूरकरांना सुपरिचित असे व्यक्तिमत्त्व. मैफलीतले त्यांचे प्रसन्न गायन आणि अत्यंत विनम्र स्वभाव यामुळे आप्पासाहेबांना भेटलेला माणूस त्यांचा होऊन जात असे. १९२५ मध्ये संकेश्वरमध्ये जन्मलेल्या अप्पासाहेबांना ईश्वराने संगीताचं जन्मजात वरदान देऊनच पाठवलं होतं.

नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे हे कोल्हापूरकरांना सुपरिचित असे व्यक्तिमत्त्व. मैफलीतले त्यांचे प्रसन्न गायन आणि अत्यंत विनम्र स्वभाव यामुळे आप्पासाहेबांना भेटलेला माणूस त्यांचा होऊन जात असे. १९२५ मध्ये संकेश्वरमध्ये जन्मलेल्या अप्पासाहेबांना ईश्वराने संगीताचं जन्मजात वरदान देऊनच पाठवलं होतं. घरात संगीताची आवड होती. वडील पेशाने होमिओपॅथीचे डॉक्‍टर. वयाच्या  सहाव्या-सातव्या वर्षी एकदा वडिलांनी ग्रामोफोनवर गाणं लावलेलं.पलीकडे बसलेले. अचानक त्यांच्या लक्षात आलं की लहानगा विनायक तसाच त्यासोबत गातोय... त्यांनी ग्रामोफोन बंद केला आणि मुलाला गायला सांगितलं. ते संपूर्ण गाणं मुलाने पूर्ण केलं. वडिलांना अपार आनंद झाला आणि तिथून मग लहानग्या विनायकाचे संगीत शिक्षण सुरू झालं. संकेश्वरातले शंकरराव पेंटर, पं. उमामहेश्वरबुवा कुंदगोळकर आणि पं. नागेंद्र बुवा पोतदार यांच्याकडे आप्पासाहेबांचे प्राथमिक संगीत शिक्षण झाले. १९३६ मध्येच काँग्रेसचे हुदली येथे ग्रामोद्योग प्रदर्शन होते. गांधीजी स्वतः आलेले. त्यांना कुणीतरी सांगितलं की एक लहान मुलगा आलाय, तो छान गातो. तेंव्हा आप्पासाहेबांना गाण्याची संधी मिळालेली. गांधीजींनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं. स्वतःच्या हाताने सुताचा हार गळ्यात घातला. तसंच पुण्यात न. चिं. केळकर यांच्यासमोरही त्यांना गाणं ऐकवायची संधी मिळाली.

इतकंच नव्हे, तर तेव्हा गाजत असलेल्या कुमार गंधर्वांच्या सोबतही आप्पासाहेबांनी हुबळी, धारवाड आदी ठिकाणी मैफली केल्या होत्या. त्यांच्या वडिलांनी संकेश्वरमधील आपला दवाखाना बंद करून कोल्हापूरकडे प्रस्थान केलं. आप्पासाहेबांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. सवाई गंधर्वांचे शिष्य कागलकर बुवा, निवृत्तीबुबा सरनाईक, सुप्रसिद्ध गायिका आझमबाई यांचं मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँसाहेबांचे सुपुत्र भूर्जीखासाहेब यांच्याकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. किराणा, जयपूर, ग्वाल्हेर, आग्रा आदी विविध घराणी संगीत क्षेत्रात गाजलेली. आप्पासाहेबांनी या चारही घराण्यांचे शिक्षण घेतले आणि स्वतःची एक खास गायकी निर्माण केली. बालगंधर्वांच्या गायकीतले सहजपण, स्वर-लयीवरील हुकुमत आप्पासाहेबांच्या गाण्यातही दिसून येते. १९५८ मध्ये प्रत्यक्ष शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना ‘नूतन गंधर्व’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Sudhanshu Naik article