हेमलकसा एक चिंतन प्रकल्प..... 

हेमलकसा एक चिंतन प्रकल्प..... 

हेमलकसाला जाण्याचा योग आला. हा योग येण्याचा पण योगच यावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात एक छोटेसे गाव. आदिवासी लोकांची वस्ती. गडचिरोली म्हटले की नक्षलवादी भीती मनात येतेच. पण त्या सगळ्या वातावरणात राहुन, तिथल्या घाबरणाऱ्या माणसाला "माणसात" आणण्याचे ते ही सर्वार्थाने असा प्रयत्न करणाऱ्या डॉ. आमटेंना आणि त्यांना साथ देणाऱ्या मंदाताईंना सलाम.  कारण योग्य साथ असेल तरच माणुस समाधानाने कुठलेही काम करू शकतो. 

डॉ प्रकाश आमटेे यांच्या कार्यावर एक चित्रपट देखील झाला. त्यामुळे आता अनेकांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती आहे. त्या चित्रपटामुळे त्यांना मदतीचा हात देखील मिळत आहे. त्यांच्याशी तास-दिडतास मनमोकळ्या गप्पा मारत असताना ते अजुन जास्त समजले. जे चित्रपट आणि पुस्तक पण नाही सांगु शकत ते. इतका साधेपणा सच्चेपणा आणि कामाचे झपाटलेपण. त्यात आपण खुप काही करतोय याची जाणीव देखील होऊ न देणे. हे विशेष कौतुकास्पद. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे एवढी एकच भावना. आता त्यांची मुले सुना ते कार्य तेवढ्याच जोमाने पुढे नेत आहेत. 

आम्ही तिथे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहोचलो. तिथल्या सचिन सरांनी आम्हाला सांगितले की आता साडेसहाला प्रार्थना होईल. मग सातपासुन जेवण. त्या वसतिगृहात साधारण अडीचशे  मुली रहात होत्या. प्रार्थनेला कुणी सर समोर नसुनही अगदी वेळेवर प्रार्थना सुरू झाली. एका तालात आणि सुरात शिस्तबद्ध रीतीने. मला लक्षात राहिले त्यांचे "हम लोग है ऐसे दिवाने दुनियाको बदलकर मानेंगे." खरच डाॅ. आमटे तसेच असावेत असे मला वाटले. 

नंतर जेवण साधच पण स्वच्छ आणि रूचकर. आपली ताटवाटी आपण घ्यायची. हवे तेवढे जेवायचे आणि धुवून ठेवायची. 
दुसऱ्यादिवशी सकाळी सहाला चहा काॅफीसाठी मशिन आहे. सातला नाश्ता. आणि मग आठ वाजता डाॅ. सपत्नीक आमच्या सोबत गप्पा करायला आले. सगळ्या लोकांशी ओळख करून घेतली. नाव गाव काय करता वगैरे. एक हाफ चड्डी आणि बनियन व मंदाताईंची साधी साडी पदर खोचलेला. कमी गरजा अन जास्त समाधान. 

गप्पा गप्पात मग एक एक गोष्टी कळत गेल्या. आणि त्यांच्या कामाचे महत्त्व जाणवत राहिले. आपल्याला समाज जसा हवा असे वाटते तसे आपण होऊन आपल्यापासून सुरवात प्रत्येकाने केली पाहिजे हे जाणवले. ते म्हणाले मी डाॅक्टर असल्याने खरे तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इथे आलो पण मग लोकांचा विश्वास बसत गेला व त्यांच्या इतर गोष्टीत पण लक्ष घालावे लागले. त्यातुनच मग शाळा सुरू करण्यात आली. 
पण नदी व नाले पार करून मुले शाळेत कशी येणार मग वसतीगृह करायला लागले. शिकणारी मुले खुप पण यंत्रणा कमी पडते. जागा शिक्षक सगळे तोकडे. मग शाळेत प्रवेश देतांना घरटी एका मुलाला तरी प्रवेश मिळेल असे करण्यात येते.

आजही ती मुल आपल्याकडे कुतुहलाने बघतात. आपण जसे एलियनयकडे बघु तसे. आपले कपडे बोलणे वगैरे त्यांच्यासाठी वेगळे आहे. आता तर त्यांना इंग्रजी आणि संगणक देखील शिकवण्यात येत आहे. काही तरूण-तरूणी एखाद्या वर्षासाठी येऊन मुलांना शिकवतात. काही डाॅक्टर एखादे वर्ष सेवा करण्यासाठी येतात. त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय होतेच शिवाय काही मानधन पण मिळतेच. त्यांना सिनेमा वगैरे इंटरनेटवर दाखवतात. आता ती मुले खुप काही शिकली आहेत पण बाहेरच्या जगात वावरायला, त्यांना अजुन खुप काही शिकवावे लागणार आहे. त्यांच्या बोलण्यातून समजले की खरच प्रत्येकाने आपल्या जीवनातील एक वर्ष जरी त्यांच्या या कामासाठी दिले तरी हे काम वेगाने होईल. पैशाची मदत मिळत आहे पण मनुष्यबळ नाही. दुर्गम भाग असल्याने कुणी इकडे यायला बघत नाही. आले तरी टिकत नाहीत. त्यात नक्षलवाद्यांच्या भितीपोटी पण यायला घाबरतात. पण आपण त्यांच्या वाटेला गेले नाही तर ते काही करत नाहीत. हा डाॅकटरांचा अनुभव. 

सगळ्यांना सारखे जेवण. आमच्या सोबतच त्यांची दोन वर्षाची नात पण वरणभात खात होती. तिथल्या आदिवासी लोकांच्या शरीरावर उपाय करता करता त्यांच्या मनाचीही मशागत करण्याचे काम करता करता डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांचा परिवार तिथल्या लोकांच्या मनात भक्कमपणे देवागत वसतोय. 

शरीरावरचे व्रण दुर करून मनावरचे भीतीचे गैरसमजाचे आवरण पण अलगदपणे न दुखावता काढण्याचे काम हे दाम्पत्य अविरत न थकता करत आहे. आता कुठे सुरुवात झाली, असे ते मानतात. आता मुला-सुनांकडे कारभार सोपवुन विचारल्यावरच सल्ला देतात. हे देखील आपल्याला शिकण्यासारखे आहे. विशेषतः ज्येष्ठांना. 

आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन काही करू शकत नसू तरी जिथे राहतो तिथल्या आजुबाजुला असणाऱ्या दुर्गम भागातील लोकांसाठी काही करू शकता येत असेल तरी ते करून बघायला काय हरकत आहे? 

आमटे दाम्पत्याने त्या आदिवासींना नुसता मदतीचा हातच दिला नाही. कारण फुकट काही मिळालं की आळशीपणा येतो. म्हणुन त्यांना शेतीचे प्रशिक्षण तसेच प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक पाड्यातील काही लोकांना दिले. ते बाकीच्या लोकांना शिकवत आहेत. सुविधा उपलब्ध करून त्यांना शिकवुन त्या वापरायला पण शिकवित आहेत. जितके लिहावे तितके कमीच आहे. मानवावरच नव्हे तर प्राण्यांना देखील प्रेम लावले, तर कळते. हे त्यांच्या वाघ, हरीण, घोरपड, साप, अस्वल वगैरे प्राण्यांसोबत ते लहानग्या नातीसोबत खेळताना बघुन कळते... खरचं जगावर प्रेम कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. परत एकदा त्यांना मानाचा मुजरा... खुप काही शिकवल्याबददल. परीसाच्या स्पर्शाने लोखंडे सोने होते तसेच त्यांच्या सहवासात एक तास मनाला विचारांना उजळून गेला एवढे मात्र नक्की... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com