खजुराहोला शिल्पजगतात...

सुनेत्रा विजय जोशी 
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

खजुराहोला शिल्पजगतात सौंदर्याचा नवीन आविष्कार बघायला मिळाला. वेस्टर्न टेंपल समुह म्हणजे बारा देवळांचा समुह  येथे आहे. पण ती देवळे पुजेची नाहीत. येथील आतील व बाहेरील कोरीव काम बघुन थक्क व्हायला होते.

खजुराहोला शिल्पजगतात सौंदर्याचा नवीन आविष्कार बघायला मिळाला. वेस्टर्न टेंपल समुह म्हणजे बारा देवळांचा समुह  येथे आहे. पण ती देवळे पुजेची नाहीत. येथील आतील व बाहेरील कोरीव काम बघुन थक्क व्हायला होते. देवळाच्या दर्शनी भागाला तोरण कोरलेले आहे, तर कळसाला विविध आकाराची कमळे आहेत. याचे दगड वेगवेगळ्या ठिकाणांहून आणले असल्याने त्यात विविध रंगछटा आहेत. त्यातही प्रेम अनुनय याला फिका तर उत्कट अवस्थेत तापमान वाढल्याने त्या लेणी थोड्या गडद रंगाची. प्रत्येक लेणीत स्त्रियांची केशरचना वेगवेगळी आहे. आता वापरतो तशी लेगीन्स तेव्हाही होती. एका चित्रात लिपस्टिक लावताना पण आहे. ज्या चित्रात तिच्या अंगावर विंचु आहे ती कामातुर झाली असा त्याचा अर्थ आहे. यावरून मला मधुमती मधील गाण "हाय हाय रे चढ गयो रे पापी बिछुआ...' आणि त्या तालावर मदमस्त झालेली ती अदाकारा आठवली. तेव्हाच्या त्या गाण्याचा अर्थ आता मला यावरून कळला. 

जिच्या दारासमोर पोपट असलेला पिंजरा असेल ती नगरवधु. म्हणजे वेश्‍या. पण त्याकाळात तिलाही मान असे. आपल्याला जी मैथुन शिल्प वाटतात. ती एकमेकांना उर्जा देण्यासाठी केलेली आसने आहेत. तसेच जिच्या डोक्‍यावर नाग साप आहे त्या विषकन्या होत्या. शत्रुला तिच्या सौंदर्याने जाळ्यात ओढले जायचे व तिच्याशी तो रत होताच गतप्राण व्हायचा. 

शिव मंदिर आणि लक्ष्मण मंदिर खुपच प्रेक्षणीय. लक्ष्मण म्हणजे रामाचा भाऊ नव्हे तर ज्याच्या मनात अशा वास्तु  उभा करणे आले, तो राजा लक्ष्मण. एका ठिकाणी हत्ती हसतो आहे. कारण त्याच्या समोरच एक जोडपे प्रेमलीला करत आहेत. तर एका ठिकाणी प्रेमी प्रेमिकेला ती रुसली म्हणून मनवतो आहे. अगदी तुम रुठी रहो, मै मनाता रहु स्टाईलमध्ये. तर एका लेणीत ती जवळ यावी म्हणुन तो माकडाला जवळ बोलावतो. म्हणजे ती घाबरून जवळ येते.

आमच्या सोबत असणाऱ्या गाईडने अजुन एक छान सांगितले की, त्या शिल्पांकडे तुम्ही ज्या नजरेने बघाल, तुम्हाला ती तशी दिसतील.. खरंच त्यात कुठेही अश्‍लीलता जाणवली नाही. नग्नतेत देखिल सौंदर्यच जाणवते. तेव्हाचा काळ देखिल खुप प्रगत होता. आजच्या इतकाच किंबहुना त्याही पुढचा हे प्रत्येक लेणी बघुन जाणवले. आणि हो अजुन एक जिच्या पोटावर चाकुचे चिन्ह आहे. ते म्हणजे भुक दर्शक. मग ती अन्न प्रेम किंवा अजुन कशाचीही असु शकते. बघायला सहा तास लागले. काही ठिकाणी काही माणसे आकाराने छोटी आहेत तर ती दर्जाने लहान आहेत. म्हणजे सेवक किंवा दास दासी वगैरे म्हणुन. त्या काळी युद्धात मनुष्य हानी प्रचंड प्रमाणात झाली होती. लोकांची जगण्यावरची वासनाच उडाली. म्हणुन मग ही मैथुन शिल्पे कोरली. ही शिल्पे पाहून का होईना पुन्हा मनात जगण्याची उर्मी यावी असे त्या शिल्पाचे प्रयोजन. शिवाय बाहेर हे बघुन सर्व वासना बाहेरच ठेवून आत परमेश्वराचे दर्शन घ्यावे असाही हेतु आहे.

धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही संकल्पना देखिल ती शिल्पे बघुन खुप छान समजते. बारकाईने बघायचे म्हटले तर प्रत्येक देवळाला एक दिवस पण पुरणार नाही. पण मग इतर ठिकाणी तेच तेच चित्र कोरलेली असल्याने आपण पुढे पुढे जात राहतो. त्या काळातल्या सारखे कोरीव काम अजुन तरी कुठे कुणी नंतर करू शकले नाही. इतके प्रगत आणि कुशल कारागीर. त्यांना मनापासून सलाम. सौंदर्याचा एक नविन आविष्कार बघितला नव्हे अनुभवला. ऐकले होते त्या पेक्षा कितीतरी पटीने ते असामान्य अलौकिक असे सौंदर्यस्थळ आहे.... 

Web Title: Sunetra Vijay Joshi article