ज्योतसे ज्योत जलाते चलो.... 

सुनेत्रा विजय जोशी
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

एकदा मी एका किर्तनकाराचे किर्तन ऐकायला गेले होते. त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला तुमच्या पैकी कुणाला असा एक तरी मित्र आहे ज्याच्या जवळ तुम्ही मनातले सगळे बोलु शकता? समोर हजारोंची उपस्थिती होती पण एकही हात वर झाला नाही. माझाही... 

त्या दिवशी मिस्टर गावाला गेले होते. नेमका गाण्याचा छान कार्यक्रम होता, म्हणुन एकटीच गेले होते. शेजारच्या खुर्चीवर एक बाई येऊन बसल्या. आमचे गाव तसे लहानच त्यामुळे दोन-चारदा एखादा चेहरा दिसला तरी ओळखीचा वाटतो. मी सहजच तिच्याकडे बघुन हसले. ती पण.

तुम्ही  बॅंकेत असता ना? तिने विचारले.

हो, मी उत्तरले.

कार्यक्रम सुरू होण्यास थोडा वेळ होता. साहजिकच गप्पा सुरू झाल्या. तुमचे मिस्टर नाही आले? मी संभाषणाला सुरवात केली. नाही ते नाहीत. ती म्हणाली. साॅरी गळ्यात मंगळसूत्र दिसले म्हणुन... मी विचारले.

नाही ते नाही म्हणजे आम्ही एकत्र रहात नाही. मुलगा लहान असताना घटस्फोट झाला आहे. कार्यक्रम सुरू झाला. पण ती अस्वस्थ वाटत होती. मध्यंतर झाला. आता ती मोकळेपणाने बोलु लागली. मुलगा लहान, त्यात नोकरी. खुप एकटेपणा आणि दमछाक झाली. तेव्हा जाणवले नाही, पण आता कुणाची तरी सोबत हवी असे वाटतय असे ती म्हणाली.

मुलगा त्याच्या काॅलेजला अभ्यासात व्यस्त असतो. मी म्हटलं मग काय? तर म्हणाली एका मित्राने विचारले आहे पण... ती थोडी अडखळली. घरच्यांना सांगुन बघा मी म्हटले. नाही हो आई भाऊ म्हणतात आता कुठे तुला नसते भलतेच सुचतेय. मग मुलाशी बोलुन बघा मी परत म्हटल. त्यावर त्याच्याशी मी आडुन आडून बोललेय पण तो पण आता दुसऱ्या कुणाला वडील म्हणून नाही स्विकारणार असे वाटले. असे ती म्हणाली.

माझी काही मदत होणार असेल तर सांगा. मी अगदी सहज म्हटले.

नाही हो तुम्ही माझं म्हणणं ऐकुन माझ्या बाजुने आहात हे बघुनही बर वाटलं. मनाची घुसमट तुमच्या जवळ शेअर कराविशी वाटली. का कोण जाणे?

कार्यक्रम संपला. आम्ही आपापल्या दिशेला पांगलो. त्या नंतर ती भेटली नाही. तिचे काय झाले माहित नाही. पण मी मात्र एक केल की तिचे गुपित मनातच ठेवले. कुणाला सांगीतले नाही व सांगणारही नाही. 

मध्यंतरी एक मेसेज ग्रुपवर फिरत होता. एक तरी जिवाभावाची मैत्रिण असावी अर्थाचा. या जगात करोडो लोक आहेत. त्यात दोनशेएक नातेवाईक आहेत. शिवाय पाच दहा मित्र असतात. तरी मनातल बोलायला आणि ते समजुन घेणारी एक व्यक्ती देखील आपल्या आयुष्यात नसावी? यापेक्षा कुठले दुर्दैव असावे?

एकदा मी एका किर्तनकाराचे किर्तन ऐकायला गेले होते. त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला तुमच्या पैकी कुणाला असा एक तरी मित्र आहे ज्याच्या जवळ तुम्ही मनातले सगळे बोलु शकता? समोर हजारोंची उपस्थिती होती पण एकही हात वर झाला नाही. माझाही... 

खरे तर खुपदा आपल्याला कुणाची मदत किंवा सल्ला देखिल नको असतो. फक्त आपले म्हणणे ऐकून घेऊन त्याला तु एकटा नाहिस. मी आहे सोबत एवढे पुरेसे असत. पण आपण जखमेवर मलमपट्टी करण्याऐवजी मीठच चोळतो. अशाने त्याचा प्रश्न अधिकच अवघड होतो. कुणाला चांगले होण्यासाठी आपण मदत करु शकत नसु तर निदान वाईट बोलायला तरी नको, असे वाटते.

जर आपण प्रत्येकाने कुणाचा तरी चांगला मित्र होण्याचे ठरवले तर आपल्याला देखील तो मिळेलच ना? एखाद्याचे कौतुक आपण इतके सगळ्यांना सांगत नाही. उलट कुणाचे कौतुक बघवतच नाही. मग दुःख किंवा जखम आपण का गावभर सांगत फिरतो.? हा त्या व्यक्तीचा प्रश्न आहे तो ठरवेल ना कुणाला सांगायचे. कुणाला नाही म्हणुन का नाही सोडून देत आपण तो विषय? चांगले मित्र व्हा म्हणजे चांगले मित्र आपोआपच मिळतील.

कुणाच्या तरी ओठांवर हसु उमटवण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. अडचण दुर करु शकत नसु तर मार्गात अडथळा तरी आणु नये. काय आतापासूनच ठरवुया. तुला म्हणुन सांगते कुणाला सांगू नको, असे म्हणुन बोंब मारायची नाही. विश्वासाने कुणी काही सांगीतले असेल, तर ते मनातले मनातच ठेवा. मैत्रीची साखळी तयार होईल. यावर मला. इथे एक गाण आठवतय "ज्योतसे ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो... 

Web Title: Sunetra Vijay Joshi article

टॅग्स