बदल... 

सुनेत्रा विजय जोशी 
बुधवार, 10 जानेवारी 2018

आता मला ते सगळे आठवले व वाटले खरच आयुष्य धावतच राहत. अन आपणही. धावुन धावुन परत त्याच वळणावर येतो. मग परत मला वाटले आता भुमिका बदलल्या आहेत. मी मुलाच्या तर मुलगा माझ्या भुमिकेत आहे. पण..... पण मी जसे त्याचे हे समजुन घेतेय तसे त्याने पण मला त्यावेळच्या भुमिकेला समजुन घेतलं असेल का?

सकाळची घाईची दहा वाजताची वेळ. मुलगा आवरून ऑफीसला जाण्यासाठी तयार होतोय. तो निघाला की मी कितीही घाईत असो, कुठल्याही कामात असो, पण धावत येऊन त्याला बायबाय करायला दारात हजर. तो कुठलातरी मेसेज म्हणजे निरोप मोबाईल वर बघत असतो. काही अर्जंट काम आहे किंवा काय? मी असच काहीतरी बोलत असते ईकडच तिकडच. तो मधुनच हं हं करत असतो. मला वाटतं त्याच माझ्या बोलण्याकडे लक्ष नसावं. पण तस म्हणावं तर मी काही आणायला सांगितले असेल तर आठवणीने आणतो. औषध गोळ्या वगैरे, असेल तर काही त्रास होतोय का? देखिल विचारतो. मग तो दिसेनासा होईस्तोवर मी हात हलवित राहते. संध्याकाळी तो आला रे, आला की सहज दारातच विचारतो मग काय आज काय विशेष? मी पण त्याला उत्साहाने दिवसभरातले काहीतरी तपशील सांगत असते. तो पण ऐकुन घेतो. मध्येच अरे व्वा. वगैरे म्हणतो. मोबाईल वर त्याचे साईड बाय काहीतरी चालुही असते. पण त्याचे लक्ष नसते असे नाही. 

आजही तसेच मी त्याला टाटा करून तशीच पायरीवर बसले. माझ्या मनात विचार आला. अरेच्चा गोष्टी त्याच घडताहेत फक्त माणसांची अदलाबदल झाली आहे. हाच मुलगा लहान होता तेंव्हा मी नोकरीवर जायला निघाले की कुठेही खेळत असला तरी धावत यायचा टाटा करायला. अगदी आज तू ऑफीसला जाऊ नको, म्हणुन रडत असेल. तरी मी निघाल्यावर रडतरडत का होईना पण टाटा करायचाच. मलाही मग दिवसभर त्याचा तो चेहरा काम करतानाही आठवायचा व गलबलून यायचे. क्वचित मैत्रीण म्हणायची, पण जाऊ दे ग तो खेळण्यात विसरलाही असेल. अन तसेच असायचे. संध्याकाळी तो वाट बघत असायचा व बघुन गोड हसायचा आई आली म्हणत. त्यात चॉकलेट आणले तर मग खुशच. संध्याकाळी घरी आलो की दिवसभर काय केल ते सांगण्याची घाई. 

बाई काय म्हणाल्या, काय काय मस्ती केली, अन आपण पण हं हं म्हणायचो. मध्येच तो म्हणतोही आई तुझं माझ्याकडे लक्ष नाही. पण आपण म्हणतो ऐकतेय रे मी अन त्यातले उद्या सरांनी अमुक घेऊन या, अस जे काय कामाच असेल ते नीट ऐकून बाकीचे कानावेगळे करतो. हात कामात असतात. पण लक्ष त्याच्या बोलण्यावर नक्कीच असायचे. 

आता मला ते सगळे आठवले व वाटले खरच आयुष्य धावतच राहत. अन आपणही. धावुन धावुन परत त्याच वळणावर येतो. मग परत मला वाटले आता भुमिका बदलल्या आहेत. मी मुलाच्या तर मुलगा माझ्या भुमिकेत आहे. पण..... पण मी जसे त्याचे हे समजुन घेतेय तसे त्याने पण मला त्यावेळच्या भुमिकेला समजुन घेतलं असेल का? कारण आज मी मोठी आहे, पण तेव्हा तो तर लहान होता ना. की त्याच्या मनात तेव्हा वाईट वाटले असेल. कदाचित त्याला ते आठवतही नसेल. पण तरीही त्या विचाराने माझ्या डोळ्यात उगाचच मग पाणी येते..... 

Web Title: Sunetra Vijay Joshi article