मुठीएवढे ह्रदय... 

सुनेत्रा विजय जोशी 
रविवार, 14 जानेवारी 2018

एखादे फुलपाखरू कसे या फुलांवरून त्या फुलावर उडताना छान दिसते. पण त्याला चिमटीत पकडण्याचा मोह होऊन तुम्ही पकडले तर ते जखमी होते. उडूही शकत नाही. कधी मरून जात. तसेच प्रेमाचेही आहे. ती मुक्त अव्यक्त भावना मनात आहे, तोपर्यंत सुंदर असते. आपल्याला जगण्याची उर्मी देत असते. 

प्रेम हा शब्दच इतका वेगळा आहे की त्या शब्दात देखील प्रेमाचा भास होतो. आपण जन्माला येतो तेव्हा लहानपणी आपले आपल्या आईवडिलांवर पराकोटीचे प्रेम असते. त्यात कुणी वाटेकरी चालत नाही, पण तेच आपण भावंड झाल्यावर त्याच्यावरही तितकच प्रेम करत असतो. शेजारच्या कुणी बाळ माझे आहे म्हटले तरी त्याला मारायला धावतो. किंवा भोकाड पसरतो. नंतर शाळेत असताना कुणीतरी आपले मित्र किंवा मैत्रीण होत. आपण बेंचवर तिची जागा अडवून ठेवतो. दुसऱ्या कुणाला बसु देत नाही. तेव्हा त्या मित्रावर पण आपल तितकच प्रेम असत. 

पुढे वयात येताना एखाद्या सिनेनट नटीच्या प्रेमात पडतो. कधी एखादा खेळाडू खुप आवडतो. तर कधी एखादा लेखक. इतकचं काय तर शिकवणारे सर किंवा बाई पण खुप आवडतात. प्रत्येक वेळी आपल्या प्रेमाची तिव्रता तेवढीच असते. मग कुणीतरी आपल्याला इतका आवडतो कि, मनासोबत सहवासाचाही भाग त्यात येतो. आणि एक नवे नाते तयार होते. मुले झाली की त्यांच्यावर पण प्रेम करतो. आपल्या आयुष्यातील प्रवासात वेगवेगळ्या कारणपरत्वे अनेक लोक येत राहतात. ती वेगवेगळ्या कारणांमुळे आवडतात. त्यांच्यावर पण आपण प्रेम करतो. हे प्रेम एवढ्‌यावरच थांबत नाही, तर साने गुरुजी म्हणतात तसे अवघ्या विश्‍वावर केले तरी हृदयात असलेले प्रेम संपत नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ज्या दिवशी प्रेम हाच एकच धर्म होईल, तेव्हा कुठलीही समस्या उरणार नाही जगात. हृदयात प्रेम करण्याची अमर्याद शक्ती आहे. प्रेम हे मुक्त झऱ्यासारखे आहे. प्रत्येक प्रेमाला बंधनाचे नाव असतेच असे नाही.... 

एखादे फुलपाखरू कसे या फुलांवरून त्या फुलावर उडताना छान दिसते. पण त्याला चिमटीत पकडण्याचा मोह होऊन तुम्ही पकडले तर ते जखमी होते. उडूही शकत नाही. कधी मरून जात. तसेच प्रेमाचेही आहे. ती मुक्त अव्यक्त भावना मनात आहे, तोपर्यंत सुंदर असते. आपल्याला जगण्याची उर्मी देत असते. 
एखादे सुंदर फुल झाडावर छान दिसते. पण तोडले की एका दिवसात ते सुकून जाते. पाकळ्या गळतात. आपण ते टाकुन देतो. त्यापेक्षा ती सुंदरता मनात भरून घेतली तर आयुष्यभर आठवणीत ते फुल राहील व प्रत्येक वेळेस तेवढेच सुंदर आठवत राहील. प्रेम प्रत्यक्ष परमेश्वरावरही बसु शकत. प्रेम म्हणजे राधा. प्रेम म्हणजे मीरा. प्रेम म्हणजे बासरी. प्रेम वाहती धारा. प्रेम म्हणजे निर्व्याज मन. प्रेम म्हणजे देशासाठी तन-मन-धन. 

या एका मुठीच्या आकाराच्या हृदयात इतक अमर्याद प्रेम आहे. सृष्टीच्या कणाकणावर केलत अन सगळ्या जगावर केल तरी पुरून उरेल. प्रेमावर कवी गुलजारजींनी खुप छान लिहिलयं. त्यांनी ती भावना नेमक्‍या शब्दात मांडली आहे. खामोशी सिनेमातले गाणे "हमने देखी है उन आखोंकी महकती खुशबु, हाथसे छु के उसे रिश्‍तोका इल्जाम न दो. सिर्फ अहसास है ये रुह से महसुस करो प्यारको प्यारही रहने दो कोई नाम ना दो."..... अशा या प्रेमाला शब्दात बांधायला शब्द अपुरे पडतात. 

तर अशी ही नितांतसुंदर भावना. माझ्याच भाषेत सांगायचं झालं तर... 
श्वास म्हणजे जगणे नाही, जगणे म्हणजे जीवन नाही. 
संपत नाही प्रेम मनातील, करण्यास जीवन पुरत नाही. 

 

Web Title: Sunetra Vijay Joshi article