अनुत्तरीत... 

सुनेत्रा विजय जोशी 
मंगळवार, 16 जानेवारी 2018

आपली सेवा करावी या हेतुने आईवडील मुलांना मोठे करत नाहीत. त्यांचे कर्तव्य असते आणि कर्तव्यभावनेने नाही तर प्रेमभावना असते. आनंद देखिल. पण मुलांनी देखिल याची जाणीव जरूर ठेवावी. ते काय म्हणतात इतके निदान ऐकुन तरी घ्यावे. नाही पटले तर द्यावे सोडून, पण त्या बोलण्याचा विचार तरी करून पहावा.

माझ्याकडे कामाला म्हणजे धुणीभांडी करायला येणाऱ्या बाई आज अगदीच बापुडवाण्या दिसत होत्या. मला वाटले बहुदा आज परत नवऱ्याने दारू ढोसुन धिंगाणा घातला असावा आणि मारझोड केली असावी. चहा देतांना विचारलेच, काय ग, आज रोजचा मुड दिसत नाही. एरवी काही ना काही बोलत असतेस. आज काय झालं? मुलगा तर आता बरा आहे ना? 

तिचा मुलगा चांगला बी एस्सी झालाय यंदा. तिला वाटत होते आता तो काही नोकरी करेल तर आपले थोडे कष्ट कमी होतील. थोडे थोडे पैसे भरून सोनाराकडील मंगळसूत्र सोडवुन आणता येईल. पण आज आठ महिने झाले, तो घरीच आहे. बरं काही वाईट काम करत नाही. की कुठे जात नाही. पण नोकरी करायची तर मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची. 

आता एकदम कशी हवी ती नोकरी मिळणार? त्याला सांगुन बघितले की बाबा रे आता मिळतेय ती नोकरी सुरू कर. अन नोकरी करत करतच तुला हव्या त्या नोकरीसाठी परीक्षा देत रहा. पण तो काही ऐकायला तयार नाही. तिला दमदाटी करण्याची भिती वाटते. तो घरातुन निघुन जाईल किंवा जीवाचे बरेवाईट करेल अशीही धाकधुक राहाते. एवढया मोठ्या मुलाला रागावणार तरी कसे. 

अजुन एक ओळखीचे गृहस्थ आहेत. त्यांची बायको वारली. ते मुलाकडे असतात. मुलगा सुन एक तारखेला त्यांची चेकवर सही घेतात व बॅंकेत जाऊन त्यांची सगळी पेंशन काढुन आणतात. त्यांना नीट वेळेवर खायला प्यायला देखील देत नाहीत. कुठे बाहेर जाऊ देत नाहीत. कुणाला भेटू सुध्दा देत नाही. ते सांगतील म्हणुन. चेकवर सही नाही करत म्हणाले तर दमदाटी करतात. ते ऑफिसर होते. करारी असे. पण मुलापुढे काही चालत नाही. कुणाला सांगायचे तर अब्रू जाईल असे वाटते. शिवाय मुलाला कुणी नावे ठेवु नयेत असेही. अगदी विश्वास म्हणुन बोलले एकदाच. आज ते हयात नाहीत पण तोंड उघडले नाही. 

प्रसंग वेगवेगळे पण दोन्ही मध्ये आईबाबांची कोंडी. मुलांनी आईबाबांना घाबरायचे तर आईबापच मुलांना घाबरतात. मुख्य म्हणजे हे घाबरणे भितीपोटी नव्हे तर मायेपोटी असते. आपल्या मुलाची बदनामी होऊ नये म्हणून. किंवा आपले मुल आपल्यापासुन दुरावू नये म्हणुन. आपण काही बोललो तर जाईल घर सोडून. त्याला काय तरूण आहे चार पैसे मिळवून राहील वेगळा. 

आपली सेवा करावी या हेतुने आईवडील मुलांना मोठे करत नाहीत. त्यांचे कर्तव्य असते आणि कर्तव्यभावनेने नाही तर प्रेमभावना असते. आनंद देखिल. पण मुलांनी देखिल याची जाणीव जरूर ठेवावी. ते काय म्हणतात इतके निदान ऐकुन तरी घ्यावे. नाही पटले तर द्यावे सोडून, पण त्या बोलण्याचा विचार तरी करून पहावा. कारण ते आपल्या भल्यासाठीच असणार. आईवडीलांच्या प्रेमाचा ते गैरफायदा घेतात का? डोक विचार करून सुन्न झाले. खुप कमावतात तरी आईवडीलांचा पैसा लाटण्याचा विचार का करतात. ते पैसे त्या मुलांनाच मिळणार असतात ना... तसे नॉमिनेशन पण करुन ठेवले असते. 

काही आईवडीलांचे पण चुकत असेल. पण थोडे समजुन घ्यावे. थोडे समजावुन पहावे. असा मध्यमार्ग नाही का काढता येणार. जसे इतर अनुभवी लोकांची चरित्रे वाचुन तुम्ही प्रेरणा घेता. तसेच आईवडीलांच्या अनुभवातुन तुम्ही का नाही प्रेरणा घेत. हे सगळे प्रश्न अजुनही डोक्‍यात अनुत्तरीत आहेत... 

Web Title: Sunetra Vijay Joshi article

टॅग्स