वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तरुण सरसावले 

सोमवार, 29 जुलै 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  #SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : रविवारचा दिवस व पावसाची संततधार असल्याने अनेक पर्यटक सिंहगड, पानशेत, खडकवासला, वरसगाव या भागात फिरण्यासाठी व सुटीचा आनंद घेण्यासाठी सकाळी गेले; पण सायंकाळी मात्र खडकवासला धरणापासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे पाहता पाहता वाहतूक पूर्ण अडखळून गेली. किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी चौक येथे पायी चालणेसुद्धा कठीण झाले होते. 

स्थानिक तरुणांनी परिस्थिती पाहिली व वाहतूक मोकळी करण्यासाठी पुढे सरसावले. पाहता पाहता वीस ते पंचवीस तरुणांची फौज जमा झाली. तरुणांनी टप्प्या टप्प्यावर थांबून वाहतूक सरळ ओळीतून सोडण्यास सुरवात केली. तरुणांच्या सहकार्याने पर्यटकही त्यांचे आभार मानत होते. 

किरकटवाडी फाटा येथे रस्त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे व ऐन रविवारचा तेथील आश्रमाचा कार्यक्रम हे वाहतूक कोंडीचे कारण ठरले. आश्रमाच्या व्यवस्थापकांना कार्यक्रमाचा वार बदलण्याची वारंवार विनंती केली तरी त्यात सुधारणा होत नाही. ऐन गर्दीच्या वेळीच आश्रमाचा कार्यक्रम सुटतो व किरकटवाडी फाट्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आश्रमाच्या वतीने किरकटवाडी फाटा येथे बाउंसर नेमले जातात; परंतु ते केवळ आश्रमाच्या गाड्या सोडण्यासाठी रस्ता अडवतात. त्यामुळे मुख्य सिंहगड रस्त्यावरील वाहतूक खोळंबते.

प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वाहतूक नियंत्रणासाठी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारीही असतात; परंतु त्यांची संख्या कमी असल्याने पूर्ण वाहतुकीचे नियंत्रण करणे त्यांनाही शक्‍य होत नाही. तरुणांनी सहकार्य केल्याने पोलिसांनाही मोठी मदत झाली. शुभम पवळे, माजी सरपंच विजय कोल्हे, अशोक सिरवी, अशोक भड, राज सपकाळ, गणेश बोरुडे, नामदेव राऊत, हिरालाल सिरवी, प्रशांत हगवणे, तसेच इतरही अनेक अनोळखी तरुण वाहतूक सुरळीत करण्यास मदत करत होते. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी तरुणांचे आभार मानले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune