औदुंबरची साहित्य ‘गंगोत्री’!

उदय कुलकर्णी
गुरुवार, 11 जानेवारी 2018

‘सदानंद साहित्य मंडळा’चे ‘अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन’ उद्या (ता. १२) पासून तीन दिवस होत आहे. संमेलनाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. तसेच हे संमेलन सुरू करणाऱ्यांपैकी एक असलेले कवी सुधांशू यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे...

‘कृष्णेच्या काठावर रोज सूर्य सोन्याचा।
कृष्णेच्या काठावर रोज सूर सृजनाचा।
कृष्णेच्या काठावर रोज घोष मंत्राचे।
शेतातून धर्मबिंदू कृषिकांच्या कष्टांचे।
किरणातून रुणझुणती श्रीहरीचे मृदू पैंजण
वाऱ्यातून भिरभिरते लोकगीत-रामायण

कृष्णेच्या काठावरील औदुंबर इथं बाकी सारं काही होतं; पण तेथील आसमंतात सृजनाचा सूर कायमस्वरूपी विहरत राहावा याची सुरुवात झाली. ती १९३९ रोजी. ही सुरुवात करणाऱ्यांमध्ये जसे म. भा. भोसले गुरुजी होते, ग. न. जोशी, प्रभाकर सामंत, किशोर सामंत होते; त्याचप्रमाणे ज्यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे, ते ह. न. जोशी म्हणजेच कवी ‘सुधांशू’ होते. सदानंद सामंत या आपल्या मित्राच्या स्मृती जपण्यासाठी या सगळ्या मित्रमंडळींनी कृष्णेच्या तीरावर औदुंबर व वडाच्या छायेत कष्टकऱ्यांच्या व भाविकांच्या जगण्याशी शब्दांचे मैत्र जुळवले.

‘सदानंद साहित्य संमेलन’ दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी भरविण्यास प्रारंभ झाला. पुढे मौज प्रकाशनशी निगडित झालेल्या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी नव्या पिढीच्या साथीनं ही परंपरा समृद्ध केली. वरील कवितेच्या ओळी ज्यांनी लिहिल्या, त्या कवी सुधांशू यांनीच कृष्णेच्या काठावर सृजनाचा सूर विहरत राहण्यात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
कृष्णेच्या काठावरील या सृजनशील तपस्व्याने एके काळी जी लोकप्रियता मिळवली होती, त्याचा अनुभव १९६३ साली खुद्द तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घेतला होता.

ते अमेरिका दौऱ्यावर गेले, तेव्हा तेथे त्यांच्या स्वागतासाठी ‘गुरुदत्त पाहिले कृष्णातीरी...’ हे कवी सुधांशूंचं गीत कोणीतरी ग्रामोफोनच्या तबकडीवर लावलेलं होतं. यशवंतराव या प्रकारानं थक्क झाले. कवी सुधांशूंच्या अनेक रचना आर. एन. पराडकर, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर यांनी आकाशवाणीसाठी गायल्या. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘या मुरलीने कौतुक केले, गोकुळाला वेड लावले’ अशी त्यांची अनेक गाणी इतकी लोकप्रिय झाली होती की, एकदा खुद्द लता मंगेशकरांनी सुधांशूंना सांगितलं, ‘मला तुझी दोन गाणी माझ्या स्वरात गाण्याची इच्छा आहे!’ कवी सुधांशूंची साहित्य संपदा वैविध्यपूर्ण आहे. ‘कौमुदी’, ‘विजयिनी’, ‘जलवंती’, ‘स्वर’, ‘भावसुधा’ यांसारखे कवितासंग्रह, ‘गीतसुगंध’, ‘गीतसुवर्ण’, ‘दत्तगीते’, ‘गीतसुधा’, ‘गीतसुषमा’, ‘गीतदत्तात्रेय’, ‘भरली चंद्रभागा’, ‘कालिंदीकाठी’, ‘दत्तगुरुंची गाणी सुंदर’ यासारखे गीतसंग्रह, ‘खडकातील झरे’ सारखा कवितासंग्रह, ‘नेताजींचा स्वातंत्र्यसंग्राम’ हा पोवाडा, ‘सुभाष कथा’ व ‘चतुरादेवी’ ही लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके तसेच ‘औदुंबर दर्शन’, ‘औदुंबर कथामृत’ यासारखे औदुंबरचे माहात्म्य सांगणारी पुस्तके हे सगळं कवी सुधांशूंचं साहित्य वैभव.
१९१७ साली प्लेगनं थैमान घातलं होतं. त्यात औदुंबरमधलं जोशी कुटुंबीयांचं घर उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली. सुधांशूंच्या घरातील त्यांचे वडील, बहीण व भाऊ असे तिघेजण एका आठवड्यात प्लेगनं दगावले. या धक्‍क्‍यानं सुधांशूंच्या आजोबांची स्थिती वेड्यापिशा माणसासारखी झाली. त्यांनी कृष्णेच्या डोहात उडी घेऊन आयुष्य संपवण्यासाठी डोहाकडे धाव घेतली. पण गावकऱ्यांनी त्यांना रोखलं. सुधांशूंची आई त्यावेळी आठ महिन्यांची गरोदर होती. कोणीतरी सांगितलं, ‘काळजी करू नका. सुनेला मुलगा झाला तर तुमचा वंश सुरूच राहणार आहे.’ त्यांचं म्हणणं खरं ठरलं. 

सुधांशूंचा जन्म झाला. सुधांशूंची आई कवी वृत्तीची. तिच्याकडूनच ही वृत्ती सुधांशूंकडे आली. बारामतीला मामांकडे शिकत असताना मुलामुलांनी एक मेळा काढायचे ठरवले. त्यावेळी मेळ्यासाठी गाणी कोणी लिहून देईना. गाणी नाहीत म्हणून मेळ्याचा बेत रद्द होणार असे वाटून सगळेच हिरमुसले झाले. पण अचानक सुधांशूंनी ते आव्हान स्वीकारलं. गाणी लिहिली आणि ती लोकांना आवडलीही. आपण कविता व गाणी लिहू शकतो याचा साक्षात्कार सुधांशूंना झाला. दरम्यान आजोबांच्या आजारपणामुळे सुधांशूंना शिक्षण अर्धवट सोडून औदुंबरला परतावे लागले. जगण्याच्या संघर्षात कवितेशी नातं तुटणार की काय असं वाटायला लागलं. पण सदानंद सामंत यांच्या सहवासात सुधांशू, म. भा. भोसले, ग. न. जोशी, प्रभाकर सामंत, किशोर सामंत आदींना पुन्हा साहित्य आणि कवितेचा स्पर्श लाभला. ही मंडळी लिहिती झाली.

औदुंबरमध्ये वाचनालय, हस्तलिखित मासिक असे उपक्रम ‘बालशारदा साहित्य मंडळा’च्या माध्यमातून सुरू झाले. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ यांसारख्या मासिकांधून औदुंबरवासीयांचे साहित्य प्रकाशित होऊ लागले. पण अचानक विषमज्वराच्या आजाराने सदानंद सामंतांची साथ सुटली आणि त्यांच्याच स्मृती जपण्यासाठी ‘बालशारदा साहित्य मंडळ’ ‘सदानंद साहित्य मंडळा’त रूपांतरित झालं.  १९३९ साली ‘सदानंद साहित्य मंडळा’ने पहिल्या ‘सदानंद साहित्य संमेलना’चे आयोजन केले. संमेलनाध्यक्ष व पाहुणे म्हणून महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. या संमेलनाविषयी स्वत: कवी सुधांशू सांगत, ‘संमेलनाचा कसलाच अनुभव नव्हता. माणसं जमतील की नाही हेही माहिती नव्हतं. मात्र पहिल्याच संमेलनाला खेड्यापाड्यांतील पुष्कळ माणसे आली होती. खुद्द दत्तो वामन पोतदारांनाही औदुंबरचा परिसर अतिरम्य वाटला.

वर्षामागून वर्षे उलटत राहिली. दरवर्षी नित्यनियमानं कृष्णेच्या काठावर संक्रांतीला साहित्य-काव्याचा मेळा भरत राहिला. श्री. म. माटे, वि. स. खांडेकर, पंडित महादेव शास्त्री-जोशी, महाराष्ट्र कवी यशवंत, अनंत काणेकर, गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे, कवी अनिल, विजय तेंडुलकर, अरुण साधू, ना. धों. महानोर, विजया राजाध्यक्ष, प्रा. डॉ. यू. म. पठाण अशा अनेक दिग्गजांनी औदुंबरच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावली. वादविवाद, निवडणूक याशिवाय अध्यक्षांची एकमतानं निवड हे वैशिष्ट्य या संमेलनानं आजतागायत जपलंय. या वेळी या संमेलनाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ‘पद्मश्री’प्राप्त कवी सुधांशू यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षीच अमृतमहोत्सवी ‘सदानंद साहित्य संमेलन’ होणं हा एक आगळा योग आहे. कोणीही पांथस्थानं यावं आणि औदुंबरच्या साहित्य सरितेतील सलीलानं आपली ओंजळ भरून घ्यावी. तृप्त व्हावं हीच औदुंबरची परपंरा आहे. ही परंपरा अशीच अखंड राहावी हीच इच्छा!

Web Title: Uday Kulkarni article