esakal | माणसांनाच पाणी नाही, तर उद्योगांचे काय? 
sakal

बोलून बातमी शोधा

माणसांनाच पाणी नाही, तर उद्योगांचे काय? 

माणसांनाच पाणी नाही, तर उद्योगांचे काय? 

sakal_logo
By
जागृती कुलकर्णी

पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर उद्योग जगताची काय वेगळी अवस्था असू शकते. उद्योजकांना पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा मोजावा लागत आहे. त्यामुळे अनेक उद्योजकांनी उद्योग स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. 
नऱ्हे येथील उद्योगांना वापरण्याचे पाणी विकत आणावे लागते. यापूर्वी सात हजार लिटर पाण्याचा टॅंकर चारशे रुपयांना मिळत होता. आता तो टॅंकर सहाशे ते सातशे रुपयांना मिळत आहे. शिवाय टॅंकर घेताना टॅंकरवाल्यांची मनमानीही सहन करावी लागत असल्याचे उद्योजकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. टॅंकरचोरी पकडल्यानंतर टॅंकरचे दर वाढल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याचीदेखील नेहमी वानवा होते. 
गावात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. यात लहान-मोठ्या अनेक ग्रह प्रकल्पांचा समावेश आहे. गृहप्रकल्प उभे राहिल्याने नऱ्हे येथील पाणी लोकसंख्येलाच पुरेसे नाहीत. आशा वेळी उद्योग-व्यवसायांना पाणी मिळणार तरी कुठे? 
नऱ्हेगावची लोकसंख्या सुमारे दीड लाख असून, मतदारांची संख्या केवळ 16000 एवढीच आहे. या गावात बाहेरून येणारा वर्ग अधिक वास्तव्यास आहे. 
नऱ्हे गावासाठी मानाजीनगर येथे 50 हजार लीटर, पिराजीनगरला 2 लाख लीटर, नऱ्हे गाव गावठाणला 1 लाख लीटर आणि दरोडे जोग परिसरात अडीच लाख लीटर, तक्षशिला येथे अडीच लाख लीटर पाण्याच्या टाक्‍या सध्या अस्तित्वात आहेत. तक्षशीला सोसायटीच्या अमेनिटी स्पेस येथेच 20 लाख लीटर पाण्याच्या टाकीचे काम सध्या सुरू आहे. 
महामार्गालगत असलेल्या तक्षशीला गृह प्रकल्पाच्या परिसरात या पाण्याच्या टाकीचे काम सुरू असे असले तरी अद्यापही बऱ्याच उद्योगांना पाण्याची सुविधा नाही. जे उद्योग निवासी झोन विभागात येतात, अशांना काही प्रमाणात पाणी मिळते; मात्र ज्या उद्योगांच्या आसपास निवासी भाग नाही अशांना पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी उद्योग-व्यवसायांना पुरेसे पाणी देण्याची आवश्‍यकता आहे. नऱ्ह्यासोबतच धायरी, नांदेड फाटा या भागातील अवस्थाही काही प्रमाणात सारखीच आहे. 

या भागात उद्योग-व्यावसायिकांना पुरेशा प्रमाणात गरजेच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या भागातून उद्योग दुसरीकडे न्यावे लागत आहेत. आमची कंपनी आम्ही खेड शिवापूर येथे स्थलांतरित केली आहे. उद्योगांसाठी पाण्याची व्यवस्था केली तर उद्योगाला नक्कीच हातभार लागेल. 
- कालिदास सोनवणे, संचालक, विश्‍वकर्मा एंटरप्रायझेस