Exclusive : सावधान! घरगुती माशीपासूनही कोरोना, आता पावसाळ्यात...

विकास देशमुख
Tuesday, 28 April 2020

घाणीवर घोंघावणाऱ्या घरगुती माशा तुमच्या घरात कोरोनाचे विषाणू घेऊन येऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

औरंगाबाद : कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-१९ या आजारामुळे सगळे जग चिंतेत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्यातरी सुरक्षित अंतर हाच एकमेव उपाय आहे. पण, आपण घरात राहत असलो आणि घरात, घराबाहेर अस्वच्छता आहे, तर सतर्क राहण्याची वेळ आली आहे. कारण घाणीवर घोंघावणाऱ्या घरगुती माशा तुमच्या घरात कोरोनाचे विषाणू घेऊन येऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

पुणे येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका तथा कम्युनिटी मेडिसीन, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसीनमध्ये एमडी असलेल्या डॉ. स्वाती घोंगे म्हणाल्या, ‘‘याबाबत अजून तरी ठोस संशोधन झालेले नाही. पण, घरगुती माशीपासून कोरोनाचे विषाणू इतरत्र जाण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे जे रुग्ण कोविड-१९ पासून बरे होतात, त्यांच्या विष्ठेमध्ये दोन-तीन आठवड्यांपर्यंत कोरोनाचा विषाणू सापडलेला आहे. त्यांच्या विष्ठेवर जर माशी बसली तर कॉलरा, डायरियाप्रमाणेच ती माशी कोरोनाचाही प्रसार करू शकते. पण, अद्याप तरी असा प्रकार कुठे झाला नाही. त्यावर अधिक संशोधन सुरू आहे. घरगुती माशी कोरोनाची वाहक आहे, हे ९९ टक्के निश्चित सांगता येईल. रुग्ण शौचावरून आल्यानंतर व्यवस्थित हात धुवत नसेल, उघड्यावर शौचासाठी जात असेल तरीही कोरोनाचा धोका आहे,’’ असे त्यांनी सांगितले. 

  
हे कसे शक्य आहे? 

बाधित व्यक्ती रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकली, उघड्यावर तिने विष्ठा केली, नाक शिंकरले तर विष्ठेकडे, नाकातील, घशातील द्रवाकडे घरगुती माशा आकर्षित होतात. या घाणीवर बसल्यानंतर याच माशा उघड्यावरील अन्नपदार्थ, पाण्याचे भांडे यावरही जाऊन बसल्या तर त्या विषाणूच्या वाहक ठरतात. त्यांच्या पायाला चिकटून कोरोनाचे विषाणू इतरत्र जाऊ शकतात. अशा माशा बसलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने, त्या भांड्याने पाणी प्यायल्याने सुदृढ व्यक्तीही कोरोनाबाधित होऊ शकते. परंतु, डासांपासून धोका नाही. बाधित व्यक्तीला चावलेला डास निरोगी व्यक्तीला चावला तरीही काहीही भीती नाही. डासांपासून कोरोनाचा संसर्ग होत नाही. 
 

मग उपाय काय? 

घरगुती माशा या केवळ घाणीमुळे होतात. जिथे अस्वच्छता आहे तिथे माशा असतात. त्यामुळे आपले घर स्वच्छ, हायजेनिक ठेवा. घाण करू नका. अन्नपदार्थ उघड्यावर ठेवू नका, हा यावर उत्तम उपाय आहे. रुग्णाने उघड्यावर शौचास जाऊ नये. शौचावरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, असा सल्ला पुणे येथील एमबीबीएस एमडी असलेले डॉ. दिलीप इंगोले यांनी दिला. 

हेही वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम? 

 
सध्यातरी धोका कमी 

घरगुती माशा जरी वर्षभर दिसत असल्या तरी त्यांची संख्या पावसाळ्यात अधिक वाढते. २४ ते ३० अंश तापमान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश त्यांना पोषक असतो. सध्या आपल्याकडे तापमान ३९ ते ४० अंशांच्या जवळपास पोचले आहे. त्यामुळे सध्यातरी घरगुती माशांची उत्पत्ती वाढणार नाही. पण, पावसाळा लागताच माशांची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. 
 

पावसाळ्यात धोका वाढेल 

कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढविले. ३ मे रोजी लॉकडाउनमध्ये शिथिलताही येईल; पण त्यामुळे कोरोनाचा धोका आणि संसर्ग कमी होईल, याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. उलट जून-जुलै-ऑगस्ट या पावसाळ्याच्या दिवसांत तर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Houseflies Also Causes For Covid 19