Coronavirus : कोरोनाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 9 April 2020

विषाणूवर ‘द्रवा’ची मात्रा
मुंबई आयआयटीच्या बायोसायन्स आणि बायइंजिनिअरिंग विभागातर्फे कोरोना विषाणूला निष्क्रिय करणारा एक द्रव (जेल) तयार करण्यात येत असून केंद्र सरकारच्या सायन्स अँड इंजिनिअरिंग रीसर्च बोर्डातर्फे त्या प्रकल्पाला मदत दिली जात आहे. ही ‘जेल’ किंवा द्रवपदार्थ नाकाला लावण्याचा आहे. कोरोना विषाणूचा प्रवेश मुख्यतः नाक व तोंडाद्वारे होत असतो. या जेलमुळे हा विषाणू निष्क्रिय होणे अपेक्षित आहे. येत्या नऊ महिन्यात ही ‘जेल’ उपलब्ध होईल असे सांगण्यात येते.

नवी दिल्ली - ‘कोविड -१९’ (कोरोना) विषाणूचा जनुकीय आराखडा (जीनोम सिक्वेन्सिंग) तयार करण्याचे काम भारतातील दोन प्रमुख संस्थांतर्फे संशोधन सुरू करण्यात आले आहे. ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्‍युलर बायॉलॉजी’(सीसीएमबी -हैदराबाद) आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्‍स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी’ (आयजीआयबी - नवी दिल्ली) अशी संस्थांची नावे आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विषाणूच्या संपूर्ण गुणतत्त्व रचनेचा तक्ता तयार करण्याचे काम या संस्थांनी सुरू केले आहे. हा विषाणू कसा उत्क्रांत किंवा विकसित झाला, तो किती चैतन्यशील आहे आणि किती वेगाने त्याची वाढ होते यावर हे संशोधन प्रामुख्याने केंद्रित राहणार आहे. यावरूनच त्याच्या भविष्यातील विकसनाबाबतचे आडाखे मांडणे शक्‍य होईल असे या ‘सीसीएमबी’ संस्थेचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले.

एखाद्या जीवाची वैशिष्ट्यपूर्ण रचना समजून घेण्यासाठी जनुकीय आराखडा किंवा गुणतत्त्व रचनेची पद्धती अवलंबिली जाते व यातून संबंधित जीवाच्या ‘डीएनए’ची मालिकाही निश्‍चित केली जाऊ शकते. यासाठी ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्याकडील काही नमूने घेण्यात आले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी मोठ्या प्रमाणात नमुन्यांची आवश्‍यकता भासते. जर मोजक्‍या नमुन्यांचा उपयोग केल्यास निश्‍चित निष्कर्ष किंवा अनुमान लावणे अवघड होते किंवा त्यात त्रुटी राहतात व त्यामुळेच नमुन्यांची संख्या मोठी लागते आणि विविध रुग्णांकडून ते गोळा करावे लागतात. शेकडो नमुन्यांच्या तपासणीनंतर त्यातील समान धागा शोधणे शक्‍य होते आणि त्यानंतरच त्याच्या प्रतिकाराबाबतच्या उपायांवर विचार करता येतो.

पुढील तीन ते चार आठवड्यात किमान दोनशे ते तीनशे नमुने संशोधकांकडे जमा होणे अपेक्षित आहे. आताही संशोधनाचे काम चालूच आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध रुग्ण तसेच भारतासारख्या विशाल देशाची भौगोलिकता लक्षात घेऊन वेगवेगळ्या राज्यातूनही नमुने गोळा करण्यात येत आहेत. त्या आधारेच व्यापक चित्र स्पष्ट होणे शक्‍य आहे. यातूनच या विषाणूची कमजोरी तसेच मजबुती या दोन्हीचा अंदाज लावणे शक्‍य होईल. त्या आधारेच या विषाणूला नष्ट करण्याची रणनीती तयार करता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to model the genetic structure of the corona