Coronavirus : भाजपही घाबरलं कोरोनाला; घेतला मोठा निर्णय!

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 19 March 2020

सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने पक्षपातळीवरील सर्व आंदोलने- सभा पुढच्या महिनाभरासाठी रद्द केल्या आहेत. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार ही घोषणा केली. 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे देशवासीयांनी अजिबात घाबरून जाऊ नये असे आवाहन करताना सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने पक्षपातळीवरील सर्व आंदोलने- सभा पुढच्या महिनाभरासाठी रद्द केल्या आहेत. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार ही घोषणा केली. 

Coronavirus : महानायकाच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय बैठकीत बोलताना अर्थसंकल्पी अधिवेशन गुंडाळण्याची कल्पना फेटाळली होती. देशभरात मॉल, सिनेमागृहे, किमान 85 रेल्वेगाड्या आदी गर्दीची ठिकाणे बंद आहेत. देशातील अनेक राज्यांत भीतीचे वातावरण व अघोषित जमावबंदीसारखी परिस्थिती असताना रोज सुमारे 2000 लोक ज्या निमित्ताने एका ठिकाणी येतात ते संसद अधिवेशन गुंडाळण्याची सरकारची बिलकूल तयारी नाही. राज्यसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी कॉंग्रेससह विरोधी सदस्यांनी कोरोनाच्या संक्रमणामुळे अधिवेशन गुंडाळण्याची मागणी केली. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही मागणी योग्य नसल्याचे सांगताच गोंधळ झाला. 

नड्डा यांनी म्हटले, की कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी स्वच्छता व सावधानता हे प्रभावी उपाय आहेत. मात्र कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी भाजप आगामी महिनाभर कोणतेही जनआंदोलन किंवा सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही. कोरोनाबाबतची जागृती व्हावी यासाठी पक्ष लोकजागृतीची निवेदने, जाहिराती यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम करेल. याबाबत पक्षाच्या राज्य शाखांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तृणमूलचे सदस्य मास्क घालून 
राज्यसभेत तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य आज चक्क मास्क लावून सभागृहात आले होते. सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांना मास्क काढण्याची सूचना केली व मास्क घालून तुम्हाला सभागृहात बसता येणार नाही अशी तंबी दिली. त्याला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तीव्र आक्षेप घेतला व ही सूचना अनुचित असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, की त्यांनी स्वसंरक्षणासाठी मास्क लावला तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. त्यांनी मास्क घातला म्हणून ते सभागृहातच बसू शकत नाहीत हे म्हणणे अतिशय अन्यायकारक आहे. त्यांच्या या स्पष्टोक्तीनंतर काही क्षण निःशब्द झालेले नायडू यांनी, संसदेचा परिसर सुरक्षित व निर्जंतुकीकरण करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी सॅनिटायजरच्या बाटल्याही ठेवलेल्या आहेत असे नमूद केले. त्यानंतर तृणमूलचे नदीम उल हक यांनी मास्क घालूनच शून्य प्रहरातील विषय मांडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will not arrange any rally or agitation for next one month due to corona