कोरोनामुळे बदलली अंत्यसंस्काराची प्रथा; दफनविधीपेक्षा दहनविधीवर भर

पीटीआय
Thursday, 7 May 2020

चीनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवरील अंत्यसंस्काराच्या पद्धतीत बदल करण्यात आला. नागरिक कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असे सांगितले आहे.

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू राहिलेल्या चीनमध्ये आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवरील अंत्यसंस्काराच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने संसर्गाला बळी पडलेल्या नागरिकांन दफन करण्याऐवजी दहन करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित नागरिक कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असे सांगितले आहे. याशिवाय युरोप, अमेरिका देशातही बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नियमावली केली आहे. इटलीत नातेवाईकांना पार्थिव पाहण्याची देखील परवानगी नाकारली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये डिसेंबरपासून कोरोनाचा हाहा:कार माजला आहे. सद्यस्थितीत रुग्णांचे आणि मृतांचे प्रमाण कमी झाले असले तरी फेब्रुवारी, मार्च महिन्यात हा आकडा दररोज शेकड्याने, हजाराने वाढत असे. मृत व्यक्तींची वाढलेली संख्या आणि संसर्गाची भीती लक्षात घेता दफनविधी ऐवजी दहन करण्याचे आदेश दिले गेले. रुग्णालयात एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी आणि मृतदेह स्मशानभूमित नेताना काय काळजी घ्यावी, याबद्धलही सूचना राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिल्या. अर्थात चीन सरकारच्या आदेशावरून मोठा वाद झाला होता. पण या आदेशाला मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी विरोध करुनही सरकारने आपला आदेश कायम ठेवला. वुहानमध्ये जसजशी मृतांची संख्या वाढत गेली तसतसे मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार केले जावू लागले. एवढेच नाही तर मृतांचे नातेवाईक येण्यापूर्वीच संबंधितांवर अंत्यसंस्कार केले गेले. याशिवाय अस्थी नेण्यासाठी रुग्णालयात येण्याची नातेवाईकांनी परवानगी मागितली असता प्रशासनाकडून मनाई करण्यात आली. चीनमध्ये सुरवातीच्या काळात कोरोनाने थैमान घातलेले असताना सर्व धर्मातील मृत नागरिकांना अग्नि देऊनच अंत्यसंस्कार केले गेले. वास्तविक हिंदू धर्मात मृतदेह दहन करण्याची प्रथा आहे. मात्र अब्राहमिक रिलिजियन (यहुदी, ख्रिश्‍चन आणि इस्लाम) यात दफनविधी केला जातो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बेल्जियम: बेल्जियम येथे मृत व्यक्तींचा दफनविधी केला जातो. परंतु आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना दफन करण्याऐवजी अग्नि देऊन अंत्यसंस्कार केले जात आहेत. चीननंतर दोनशेहून अधिक देशात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. सध्याच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तीवर सरकारचा अधिकार राहत आहे. त्याला तातडीने क्वारंटाइन केले जाते आणि दुर्देवाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार कसे करावेत, याबाबत सरकार निर्णय घेते. 

स्थलांतरितांसाठी धावल्या एवढ्या रेल्वे; किती लोकांनी केला प्रवास वाचा

श्रीलंका: श्रीलंकेत देखील मृत कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. जर मृताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्याच्या अंगी काही कोरोनाचे लक्षण आढळून आली असली तरी त्याला अग्नि दिला जात आहे. या ठिकाणी मुस्लिमांनी विरोध केला, परंतु सरकार आपल्या आदेशावर कायम राहिले. 
इंडोनेशिया: कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे नातेवाईक दूर थांबतात आणि आरोग्य कर्मचारी दफनविधी करतात. अमेरिकेला देखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. तेथे अंत्यसंस्कारासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. तेथे रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी आहे, परंतु तेथे दहापेक्षा अधिक नातेवाईक असू नये असे सांगितले आहे. अमेरिकेत अन्य देशाच्या तुलनेत नियम लवचिक आहेत. 

अमेरिका: अमेरिकेतील सीडीसीने बाधित व्यक्तीच्या मृतदेहास हात लावू नये, असे म्हटले आहे. मृतदेहास स्पर्श केल्याने फैलाव होत नाही, परंतु त्यानंतर हात धुण्याची सूचना केली आहे. मृतदेहाचे चुंबन घेणे, अंघोळ घालणे या कृतीवर बंदी आणली आहे. जर एखाद्या प्रथेत अंघोळ घालण्याचा रिवाज असेल ती पीपीई किट घालण्याचा सल्ला दिला आहे. यात गॉगल्स, फेस मास्क, हातमोजे आवश्‍यक आहेत. 

ब्रिटन: युरोपात ब्रिटनला देखील कोरोनाने पछाडले आहे. यात मृतव्यक्तीच्या कुटुंबीयास अंत्यसंस्काराच्या वेळी हजर राहण्याची परवानगी आहे. या ठिकाणी लवकरात लवकर अंत्यसंस्कार करावेत, अशी सूचना दिली आहे. 

इटली: इटलीत कारोनाचा प्रसार वाढल्यानंतर अंत्यसंस्काराचे नियम कडक करण्यात आले. रुग्णालयात मृतदेहास कॉफिनमध्ये ठेवण्यात येते. या वेळी दोन ते चार जण असतात. त्यांना मृतदेह पाहण्याची परवानगी दिलेली नाही. मृत बाधित व्यक्तीस रुग्णालयाच्या पेहरावातच दफन केले जाते. 

इराण: इराणमध्ये ट्रकमधून मृतदेह आणले गेले. कोणतीही प्रथा न पाळता दफनविधी केले गेले. मात्र परिस्थिती कमी झाल्यानंवर कुटुंबीयांसमोर खड्डा खोदून दफनविधी होऊ लागले. 

दक्षिण कोरिया: एखाद्याचा मृत्यू झाल्यास तीन दिवस प्रार्थना केली जाते. साधारणपणे रुग्णालयातच अंत्यसंस्कार केले जातात. आता मूठभर लोक शोकसभेला येतात आणि तेथे श्रद्धांजली वाहिली जात आहे. 

इराक: इराकमध्ये बाधित रुग्णांचा दफनविधी करण्यासाठी नजफ शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर कब्रस्तान तयार केले आहे. बहुतांश देशात अंत्यसंस्काराला कमीत कमी लोक राहावेत, अशा सूचना दिल्या आहेत. फ्रान्स आणि ब्राझीलमध्ये ही संख्या दहापर्यंत आहे. फिलिपिन्समध्ये तर कोरोनाबधित रुग्णाला बारा तासाच्या आत दफनविधी करण्याचे आदेश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China there has been change in the funerals on people who have died from corona