Coronavirus : बाळाला जन्म देऊन २२ दिवसांत कामावर रुजू झाल्या आयुक्त

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम महापालिकेच्या आयुक्त सृजना गुमाला या बाळाला जन्म दिल्यावर २२ दिवसांत कामावर परत रुजु झाल्या आहेत.

विशाखापट्टणम : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे संकट आणखी फोफावू नये यासाठी सर्वच स्तरावर मोठे प्रयत्न होताना दिसत आहेत. अशात एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम महापालिकेच्या आयुक्त सृजना गुमाला या बाळाला जन्म दिल्यावर २२ दिवसांत कामावर परत रुजु झाल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिनाभरापूर्वी सृजना यांनी मुलाला जन्म दिला. पण करोनाविरोधात लढण्यासाठी त्यानंतर लगेच केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. या काळात महापालिकेला त्यांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता पुन्हा ड्युटीवर रुजू होण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना त्यांचे पती आणि सासू या दोघांनीही उत्तम साथ दिली आहे. देशभरात आज अनेक खरे सुपरहिरो आहेत, जे खरोखर देशाला कोरोनाच्या संकटातून वाचवण्यासाठी दिवसरात्र एकत्र करून काम करत आहेत. आपल्या कुटुंबाच्या काळजीपेक्षा देशाला महत्त्व देऊन हे 'कोरोना कमांडो' काम करत आहेत. पोलिस, डॉक्टर, नर्सेस तर आपली कामं करतच आहेत, पण त्याचबरोबर महापालिका अधिकाऱ्यांची कामही वाढली आहेत. अशीच आयुक्त जी श्रीजना यांची आदर्श कहाणी आहे.

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर थोड्या दिवसातच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आयुक्तांची जबाबदारी या परिस्थितीत महत्त्वाची असताना, श्रीजना यांनी कोणतीही तक्रार न करता 22 दिवसांच्या आतच ऑफिस गाठले. श्रीजना यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, त्या त्यांच्या जबाबदऱ्या पार पाडत असताना यामध्ये त्यांचे वकिल पती आणि आई सहकार्य करत आहेत. त्याचप्रमाणे त्या दर 4 तासांनी मुलाला स्तनपान करण्यासाठी घरी जातात आणि पुन्हा ऑफिसमध्ये परततात. या कठिण काळात महापालिकेचे काम करणे किती आवश्यक आहे याची जाणीव असल्यामुळे कामावर रूजू झाल्याची प्रतिक्रिया श्रीजना यांनी दिली आहे.

श्रीजना यांनी सांगितलं की कोरोना व्हायरसला संक्रमणापासून थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, जीव्हीएमसीकडून सॅनिटायझेशनसाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गोरगरिबांपर्यंत आवश्यक सेवा देखील पुरवण्यात येत आहे. सर्व स्तरावरील अधिकारी समन्वयाने काम करत असून विशाखापट्टणममध्ये कोरोनाला रोखण्यापासून कसं यशस्वी व्हायचं यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner puts duty before self returns to office within 22 days of giving birth