कोरोनाची धास्ती; गोव्यात काय चाललंय? राज्य सरकारचा मोठा निर्णय 

अवित बगळे
मंगळवार, 24 मार्च 2020

गोव्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, ३१ मार्चपर्यंत या सीमा बंदच राहतील. पाणी व वीज लोकांना मिळावी यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे.

पणजी Coronavirus: गोव्यात आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, महाराष्ट्र व कर्नाटकाला लागून असलेल्या गोव्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, ३१ मार्चपर्यंत या सीमा बंदच राहतील. पाणी व वीज लोकांना मिळावी यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने काल जाहीर केले होते, की आज व उद्या सकाळी ८ ते दुपारी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकाने उघडी राहतील. मात्र आज दुपारी उद्या दुकाने उघडणार नसून परिस्थिती सामान्य झाली तर ३१ मार्चनंतरच दुकाने उघडण्याबाबत विचार केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान आज सकाळी दुकाने उघडल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. जनसंचारबंदी धुडकावून लोक फिरत होते. त्यामुळे महामारी कायदा १८९७ तरतुदीनुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

गोवा सरकारने काल राज्याबाहेरून गपचूपपणे गोव्यात येणाऱ्या नागरीकांची माहिती देण्यासाठी व्हॉटसअॅप क्रमांक जारी केला होता. त्यावर काल एका दिवसात एक हजार जणांनी त्या क्रमांकावर माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे सरकारने शोध मोहिम राबवून कालच्या एका दिवसात पाचशे जणांना घऱातच स्थानबद्ध केले आहे. गोव्यात अजूनही कोविड १९ विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही, ३३ जणांच्या लाळेचे नमूने तपासण्यात आले मात्र त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

केवळ तीन जणांचा अहवाल येणे बाकी आहे. कोविड १९च्या भीतीमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. विदेशी पर्यटक सध्या परतत आहेत. त्यांच्यासाठी बस वाहतुकीस सरकारने खास परवानगी दिली आहे. रेन्ट अ बाईक आणि रेन्ट अ कार, पर्यटक टॅक्सी व काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने ३१ मार्चपर्यंत निलंबित केले आहेत. सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाची तसेच खासगी बससेवा ३१ मार्चंपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus goa state borders sealed shut down all services