धक्कादायक : देशात 52 टक्के नोकऱ्या संकटात; अर्थव्यवस्थेला झटका!

टीम ई-सकाळ
Sunday, 5 April 2020

संस्थेने देशभरातील प्रमुख कंपन्यांच्या 200 सीईओंच्या मतांचे एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार पहिला परिणाम, अनेकांच्या नोकऱ्यांवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली Coronavirus : कोरोना व्हायरसमुळं भारतच नव्हे तर संपूर्ण जग ठप्प झालंय. अनेक व्यवसाय बंद आहेत. सरकारी कार्यालयं, बँका काही तास सुरू आहेत. पण, त्यामुळं अर्थव्यवस्थेला मोठा दणका बसला आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यामुळं आता हा लॉकडाऊन हटल्यानंतर अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वेक्षण काय सांगते?
सार्वजनिक ठिकाणी कोरोना पसरण्याचा धोका असल्यामुळं भारतात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलाय. त्याचा अर्थव्यवस्थेवर सर्वांत मोठा परिणाम होणार आहे. या संदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले आहे. संस्थेने देशभरातील प्रमुख कंपन्यांच्या 200 सीईओंच्या मतांचे एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार पहिला परिणाम, अनेकांच्या नोकऱ्यांवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉक डाऊनच्या काळात अनेक उत्पादनांची मागणी घटलीय. त्याचबरोबर लॉक डाऊन हटल्यानंतरही मागणीमध्ये फारसा उठाव होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं खासगी कंपन्या अनावश्यक पदांवरील व्यक्तींना कमी करतील. नव्या आर्थिक वर्षातील पहिली तिमाही अर्थात एप्रिल, मे आणि जूनमध्ये कंपन्यांच्या मिळकतीत 10 टक्के आणि त्यापेक्षा जास्त घसरण पहायला मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीतही अशी घसरण असणार आहे. त्यामुळं कंपन्यांचा नफा 5 टक्क्यांपेक्षा अधिक घसरू शकतो. 

आणखी वाचा - जग महामंदीच्या उंबरठ्यावर; वाचा काय घडणार?

अशी होणार कामगार कपात!
सीआयआय संस्थेच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत कंपन्यांच्या मिळकत आणि नफा यांच्यात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था, आर्थिक प्रगती यावर होणार आहे. रोजगाराचा विचार केला तर, 52 टक्के नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लॉक डाऊननंतर देशातील 47 टक्के कंपन्यांमध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त कामगार कपात होण्याची शक्यता आहे. तर, 32 टक्के कंपन्यांमध्ये या पेक्षा जास्त म्हणजेच, 15 ते 30 टक्के कामगार कपात होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - चीनच्या लॅबवर संशय बळावला; ब्रिटनने व्यक्त केली शंका!

जगात काय घडलंय?
केवळ भारताच्या नव्हे तर, जगाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. त्यामुळं त्याचा भारतातच नव्हे तर जगात परिणाम दिसत आहे. आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशननं जर, कोरोना व्हायरस कंट्रोल झाला नाही तर, 2 कोटी 20 लाख लोकांना तातडीनं नोकऱ्या गमवाव्या लागण्याचा धोका आहे. यात युरोपमधील ऑस्ट्रियासारख्या छोट्या देशापासून अमेरिकेसारख्या महासत्तेपर्यंत सगळ्यांना याचा फटका बसणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus huge job loss after lock down Indian economy