Coronavirus : देश लॉक तर केला; पण पूर्वतयारीचे काय?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 11 April 2020

एकवाक्यता नाही
मदत पोचविण्याबरोबरच देखरेख करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये एकसारखे व्यवस्थापनाचे मॉडेल  केंद्र सरकारला अपेक्षित होते. परंतु त्याप्रमाणात व्यवस्था होऊ शकलेली नाही. यामुळे कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरविणे, रुग्णांची ओळख पटवून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविणे यातही अडचणी वाढल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर सरकारने लॉकडाउन लागू केला असला तरीसुद्धा यासाठी पुरेशी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती, त्यामुळे आता यंत्रणांवर दबाव येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एक सारखी रणनीती असावी आणि त्याआधारेच तयारी केली जावी, असे केंद्राकडून वारंवार सांगूनही तयारी झाली नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जाते. जिल्हा पातळीवर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशी रुग्णालये नसणे, विलगीकरण केंद्रांचा अभाव अशा असंख्य त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. राज्यांनीही पुरेशी व्यवस्था न करताच लॉकडाउन वाढविण्याची मागणी केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हा सांभाळा
एका रुग्णाच्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण तयारीला बसण्याच्या भीतीमुळे जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा सांभाळण्यास तसेच हद्द सील करण्यास सांगण्यात आले आहे. यात आता लोकांनी घराबाहेर पडू नये आणि संक्रमणाचा धोका वाढू नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, असे सांगण्यात आले आहे. 

अडथळ्यांची शर्यत
सर्वसामान्य जनतेमध्ये कोरोनाच्या मुकाबल्याचे पुरेसे गांभीर्य नसणे, संचारबंदीचे उल्लंघन करून खुलेपणाने फिरण्यात धन्यता मानण्याचे प्रकार अद्याप घडताना दिसत आहेत, त्यासोबतच कोरोनाच्या वाढता उपद्रव पाहता राज्यांमध्ये समर्पित रुग्णालये, विलगीकरण केंद्रांची उभारणी, नियंत्रण कक्ष, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन, पुरेशा प्रमाणात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यांच्यासाठीची सुरक्षा साधने व त्यांची स्वतंत्र व्यवस्था, संशयितांच्या चाचण्या याबाबतची तयारी जिल्हापातळीवर अपेक्षित प्रमाणात झालेली नाही.

अधिकाऱ्यांची चिंता
एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या व्यापक तयारीसाठी राज्यांकडे पुरेशी साधने नसल्याचा मुद्दा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच गृहसचिवांशी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यांच्या मुख्य सचिवांनी निदर्शनास आणला तर जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधिक्षकांनीही अशा प्रकारची संचारबंदी, संक्रामक रोगाच्या साथीमध्ये करावयाच्या उपाययोजनांबद्दलचा अनुभव नसल्याचे मान्य केले.

ठळक त्रुटी

  • जिल्हापातळीवर आपत्ती व्यवस्थापन नाही
  • केंद्र स्थापण्यास विलंब, तयारीचाही अभाव
  • जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्या  सुसूत्रता नाही
  • गरीब, वंचित घटक, स्थलांतरित मजुरांचा विचार नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus If the country is locked but what about the preparations